Saturday, May 14, 2011

विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनासाठी परीक्षा हाच सर्वोत्तम पर्याय- हरी नरके

नाशिक, दि.२३ (प्रतिनिधी) - शिक्षण क्षेत्रात कमालीची घसरण सुरू असून, याच काळात नेमका शालेय स्तरावर परीक्षाच न घेण्याचा निर्णय अत्यंत घातक ठरणारा आहे. विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करण्यासाठी परीक्षा हाच सर्वोत्तम पर्याय असून, परीक्षाच बंद झाल्याने नजीकच्या भविष्यात शाळा आहे, शिक्षक आहेत; पण शिक्षणच नाही अशी परिस्थिती उदभण्याची भीती असल्याचे प्रख्यात विचारवंत हरी नरके यांनी सांगितले. माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांच्या सत्तराव्या वाढदिवसानिमित्त झालेल्या अभीष्टचितन सोहळ्यात ते बोलत होते.
येथील रावसाहेब थोरात सभागृहात हा अभीष्टचितन सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी बोलताना नरके यांनी शिक्षण जोपर्यंत तळमळीने दिले जाणार नाही, तोपर्यंत ते तळागाळापर्यंत पोहोचणार नसल्याचे सांगितले. १८८२ साली महात्मा फुले यांनी केलेली शिक्षण मोफत, सक्तीचे आणि सार्वत्तिक करण्याची मागणी पूर्ण होण्यास २०१० साल उजाडावे लागले हे दुर्दैव असल्याचे सांगितले. पूर्वीच्या चातुर्वर्ण्य पध्दतीप्रमाणे आता शिक्षण क्षेत्रातही इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकलेले, कॉन्व्हेंट व इंग्लिश मीडियममध्ये शिकणारे, मनपा-जि.प. शाळांमध्ये शिकणारे आणि आश्रमशाळांमध्ये शिकणारे असे चार वर्ण निर्माण होण्याची स्थिती असल्याचेही नरके यांनी नमूद केले.
सत्कार सोहळ्याप्रसंगी बोलताना माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी मी केवळ अपघातामुळे राजकारणात आल्याचे सांगितले; मात्र या राजकीय कारकिर्दीत सर्वसामान्यांचे हित एवढेच ध्येय नजरेसमोर ठेवून कार्य केल्याचे सांगितले. सगळ्यांचे प्रेम आणि आदर हीच आयुष्यातील जमेची बाजू असल्याचेही दिघोळे यांनी नमूद केले. यावेळी उद्योजक अशोक कटारिया, आमदार डॉ. सुधीर तांबे आदिनीदेखील दिघोळे यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी व्यासपीठावर सौ. आशा दिघोळे, बाळासाहेब बोडके, शिरसाठ आदि मान्यवर उपस्थित होते.