Saturday, May 14, 2011

सर्वप्रथम शाहू व सयाजीराजांनी शिक्षण सक्तीचे केले: हरी नरके

ऐक्य समूह
Sunday, February 27, 2011 AT 11:48 PM (IST)
Tags: news
सातारा, दि.27 : वसतिगृह शिक्षणातून जाती-पाती आपोआप नष्ट होऊन "मानव हीच एक जात' निर्माण करण्यास मदत होत असल्याने कर्मवीरअण्णांनी अशा प्रयोगाचा पहिल्यांदा प्रयत्न केला होता, असे प्रतिपादन प्रा. आर. के. शिंदे यांनी केले.
येथील जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या यशवंतराव चव्हाण सांस्कृतिक सभागृहामध्ये आयोजित केलेल्या 16 व्या राज्यस्तरीय कामगार साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी व परिसंवादाच्या सातव्या सत्रात "कर्मवीर भाऊराव पाटील यांचा शिक्षण व श्रमसंस्कृतीचा दृष्टिकोण' या विषयावर प्रा. आर. के. शिंदे बोलत होते. अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्थेचे कायदेशीर सल्लागार ऍड. केशवराव पाटील होते. यावेळी प्रा. डॉ. हरी नरके, आ. शशिकांत शिंदे व दीपक जगताप उपस्थित होते.
शिंदे म्हणाले, भविष्यकाळात विद्यार्थी आदर्श नागरिक बनण्यासाठी जातीव्यवस्था अडथळा निर्माण करत होत्या. त्यामधून समाजाची सुटका व्हावी, तसेच समाजाचे आपण काहीतरी देणं लागत असल्याने कर्मवीर अण्णांनी वसतिगृह शिक्षण योजना राबविण्यास सुरूवात केली. त्यामध्ये विद्यार्थ्यांनी स्वत: काम करून शिक्षणासाठी लागणारा पैसा स्वत: कमवून शिक्षण घेण्याचा पहिल्यांदा वेगळा उपक्रम राबविला.
प्रा. डॉ. हरी नरके म्हणाले, महात्मा फुले यांनी 1882 मध्ये हंटर कमिशन समोर पहिल्यांदा प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत व्हावे, ही मागणी केली होती. त्यानंतर बडोद्याचे सयाजीराजे गायकवाड, कोल्हापूरचे छ. शाहू महाराज आदींनी याबाबतचे कायदे बनवून घेतले. कर्मवीर अण्णांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना करून मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय केली. त्यासाठी अण्णांनी सरकारी सेवा ज्या ठिकाणी पोहोचत नाहीत, अशा ठिकाणी शाळा काढल्या. शिक्षणाच्या माध्यमातून देशाचे भविष्य प्राथमिक शाळेच्या खोलीत घडवले जाते. सध्या महाराष्ट्र राज्यात 72 हजार 53 प्राथमिक शाळा, 20 हजार 339 माध्यमिक विद्यालय सुरू आहेत. या माध्यमातून केरळ राज्याच्या लोकसंख्येपेक्षा मोठ्या राज्यात महाराष्ट्रात शिक्षणाचा चांगला प्रसार व प्रभाव दिसून येतो.  नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणात लोकसंख्येच्या 77 टक्के लोक साक्षर असणारे राज्य म्हणून ओळखले जाते. 
प्रा. डॉ. नरके म्हणाले, मोठ्या राज्यांच्या तुलनेत साक्षरतेचे प्रमाण जास्त असलेल्या राज्याचा विकास महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, शाहू महाराज, कर्मवीर भाऊराव पाटील, पंजाबराव देशमुख व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यामुळे झाला आहे. कर्मवीर अण्णांनी मोफत शिक्षणाची मागणी केली, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या 45 व्या कलमात त्याची तरतूद केली. अलीकडेच शिक्षणाचे धोरण बदलत आहे. त्यात इयत्ता 1 ली ते 8 वी पर्यंत परीक्षा घ्यायची नसल्याचे धोरण आहे. यामुळे भविष्यकाळात शिक्षण  क्षेत्रावर खूप मोठा विपरीत परिणाम होणार आहे. अलीकडेच शिक्षण संस्था काढणे, त्यातून फायदा मिळवणे हा शिक्षण सम्राटांचा हेतू दिसून येत आहे. वाळू माफिया, तेल माफिया, भूखंड माफिया असेच माफिया दिसून येत होते परंतु अलीकडेच शिक्षण संस्था चालक शिक्षण माफिया झाल्याचे आपणास दिसून येत आहेत.
ऍड. केशवराव पाटील म्हणाले, शिक्षणाचा प्रसार करण्याच्या हेतूने झपाटून निघालेल्या अण्णांनी स्वत:चे शिक्षण किती आहे यापेक्षा बहुजन समाजातील लोकांच्या शिक्षणाकडे लक्ष केंद्रित केले. त्यांच्या शैक्षणिक कार्याचा स्वावलंबी व स्वाभिमानी शिक्षणाच्या कार्याबद्दल सखोल माहिती दिली. अण्णांनी महात्मा गांधींजींच्या नावाने 101 माध्यमिक शाळा सुरू केल्या. महात्मा गांधी विद्यापीठ काढण्याची त्यांची इच्छा अपुरी राहिल्याची माहिती ऍड. पाटील यांनी दिली.
परिसंवादाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी भागातील नवोदितांचे कविसंमेलन भरवण्यात आले होते. आठव्या सत्रात "चला यशस्वी होऊ या !' या विषयावर विवेक म्हेत्रे यांचा कार्यक्रम झाला. नवव्या सत्रात प्रा. डॉ. श्रीकांत तिडके यांच्या अध्यक्षतेखाली व ऍड. गणेश हलकारे, दिलीप सोळंकी व अरूणा सबाणे यांच्या उपस्थितीत संत गाडगे महाराजांच्या विचारातून अंधश्रध्दा निर्मूलन या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. दहाव्या सत्रात कवी प्रसाद कुलकर्णी यांचा आनंदयात्री मनोरंजनात्मक कार्यक्रम झाला.