Saturday, May 14, 2011

डॉ. बाबासाहेब आंबेडकर:चित्रमय चरित्र

डॉ. बाबासाहेब आंबेडकर


डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चित्रमय चरित्र खंडाच्या प्रकाशन कामाची धुरा प्रा. हरी. नरके यांच्याकडे देण्यात आली. कामाची सुरुवात ते खंडांचे वितरण या महाप्रक्रियेतील अनुभव वाचा त्यांच्याच शब्दांत...
-----
बाबासाहेब आंबेडकर यांच्या चित्रमय चरित्राचा खंड प्रकाशित करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने दि. 20 जानेवारी, 1995 रोजी एक उपसमिती स्थापन केली होती. दि. 30 एप्रिल, 1997 पर्यंत सुमारे सव्वा दोन वर्षं या उपसमितीचे कामकाज चालले. या समितीमध्ये काही मान्यवरांचा समावेश होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे दुर्मिळ फोटो समितीकडे पाठविण्याचे आवाहन डॉ. बाबासाहेब यांचे अनुयायी, छायाचित्रकार, संग्राहक आणि सर्व नागरिकांना देशातील वृत्तपत्रे आणि आकाशवाणी व दूरदर्शनवरून करण्यात आले. समितीला चांगला प्रतिसाद मिळाला.
अनेक वृत्तपत्रे, नियतकालिके, ग्रंथ यातून प्रकाशित झालेल्या छायाचित्रांच्या झेरॉक्स प्रती लोकांनी समितीकडे पाठविल्या. बरीचशी छयाचित्रे मूळ नसून रिप्रिंटवरून रिप्रिंट मारल्यामुळे अस्पष्ट झालेली आणि छापण्यास अयोग्य अशी होती. काही चांगली व छापण्यायोग्य छायाचित्रेही मिळाली. उपसमितीच्या सदस्यांनीही त्यांच्याकडील काही छायाचित्रे समितीला उपलब्ध करून दिली. उपसमितीचे एक सदस्य श्री. केवलदास बनसोड यांच्याकडे हा सर्व संग्रह सुपूर्त करण्यात आला. समितीच्या कामाची धुरा ऑगस्ट 2002 मध्ये माझ्याकडे आल्यानंतर या चित्रमय चरित्राच्या छपाईला अग्रक्रम द्यायचे ठरवून मी ही छायाचित्रे सप्टेंबरमध्येच शासकीय मुद्रण व लेखन सामग्री विभागाकडे सोपवली. यातील बहुसंख्य छायाचित्रे छापण्यायोग्य करण्यासाठी त्यावर फार मोठी मेहनत करावी लागेल असे त्यांनी कळविले.
दरम्यान हा छायाचित्रांचा खंड क्रमाने सर्वात शेवटी छापण्याचा समितीने निर्णय घेतल्याने खंड 21 च्या प्रकाशनानंतर तो छपाईला घ्यावा असा आदेश समितीच्या अध्यक्षांनी दिला. उपसमितीने तयार केलेली डमी अध्यक्षांना प्राथमिक व असमाधानकारक वाटली. त्यामुळे ती बाजूला ठेवावी लागली. अत्याधुनिक यंत्रसामग्री वापरून हे सर्व फोटो रिटचिंग, प्रोसेसिंग करून घ्यावेत व हा अल्बम आंतरराष्ट्रीय दर्जाचा व्हावा यासाठी नव्याने तज्ज्ञांचा शोध घेण्याचे आदेश ना. दिलीप वळसे पाटील, तत्कालीन मंत्री (उच्च व तंत्र शिक्षण तथा अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रंथ प्रकाशन समिती) यांनी दिले.
फोटो अत्यंत जीर्ण अवस्थेत होते. त्यातील अनेक पूर्णपणे खराब झालेले होते. डॉ. आंबेडकरांसारख्या हिमालयाच्या उंचीच्या महापुरुषाच्या छायाचित्रांची भव्यताही तेवढीच असणे गरजेचे होते, त्यासाठी हिंगे यांनी मेहनत घेऊन महिनोन्‌महिने काम केले. फोटोंसोबत फक्त तळटिपा देण्याऐवजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संक्षिप्त जीवनचरित्र दिल्यास गं्रथाची उपयुक्तता वाढेल, असा विचार श्री. वळसे पाटील यांनी मांडला. त्यांनी हे चरित्र लिहिण्याचे काम संगिता पवार यांच्याकडे सोपविले. मी माझ्याकडील अनेक संदर्भ ग्रंथ पवार यांना उपलब्ध करून दिले. प्रा. दत्ता भगत व श्री. शु. द. आहेर यांच्याशी झालेल्या चर्चेतून अनेक चांगल्या सूचना पुढे आल्या.
मंत्रालयीन पातळीवरील मंजुरीचे सोपस्कार पार पाडण्यात उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ना. राजेश टोपे आणि विशेषतः राज्यमंत्री ना. वर्षा गायकवाड यांनी जी तडफ आणि जिद्द दाखविली त्याला तोड नाही. त्यांच्या पाठपुराव्याविना हा ग्रंथ दि. 14 एप्रिल 2010 रोजी प्रकाशितच होऊ शकला नसता. समितीकडे जमा असलेल्या सर्व साहित्य, छायाचित्रे, पत्रे यांचे काम अनेक अडचणींमधून पूर्ण झाले. याचे मला अतिव समाधान वाटते.
मी खंड 21 चा पत्रव्यवहाराचा आगळावेगळा खंड प्रकाशित केला. एकूण 9 गं्रथ माझ्या कार्यकाळात नव्याने प्रकाशित झाले. मराठी अनुवादाचे काम फार काळ रखडलेले होते. खंड 1 ते 4 व 6 एकाच वेळी प्रकाशनासाठी होती घेण्याचे मी ठरवले. या कामात असंख्य अडचणी होत्या. खंड 1 चे अनुवादाचे काम अतिशय सदोष झालेले होते. त्यातील बरेचसे काम परत करवून घ्यावे लागले. खंड 2 च्या अनुवादकांचे (प्रा. प्र. श्री. नेरुरकर) निधन झालेले असल्याने त्यांच्याशी सल्लामसलत करता येत नव्हती. खंड 3 चे काम करणारे प्रा. आ. ना. पेडणेकर यांचेही दरम्यानच्या काळात निधन झाले. खंड 4 व 6 ची मुद्रिते स्वतः अनुवादकांनी नजरेखालून घालून दिल्याने हे काम मार्गी लावता आले. अनुवादाचे खंड अनुक्रमाने छापावे असा विचार असल्याने हे खंड अधे- मधे छापणे उचित वाटले नाही. या पाचही खंडांचे मुद्रितशोधन करून प्रकाशनाच्या दृष्टीने ग्रंथांचे सुमारे 85 टक्के काम पूर्ण करण्यात आले. समितीकडे एकही संशोधक व संपादन सहाय्यक नसल्याने हे सर्व काम मला एक हाती करावे लागले. या काळात माझ्याकडे महात्मा फुले व राजर्षी शाहू या समित्यांचेही काम होते. त्यांच्याही ग्रंथ प्रकाशनाची कामे मी करीतच होतो.
सहा वर्षांच्याअल्प कारकिर्दीत प्रतिकूल वातावरणातही माझ्या हातून हे काम पार पडले. या काळात मला आंबेडकरी अनतेचे अपार प्रेम लाभले. मी त्या सर्वांचा कृतज्ञ आहे. अनुकूल वातावरण मिळते तर यापेक्षाही अधिक काम करता आले असते असे मला वाटते. या चित्रचरित्राच्या मराठी आवृत्तीच्या तीन हजार प्रती व इंग्रजी आवृत्तीच्या दोन हजार प्रती हातोहात संपल्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे इतके देखणे, प्रसन्न आणि विविध भावमुद्रा असलेले दुसरे पुस्तक नाही. सुमारे 250 छायाचित्रांचा समावेश असलेल्या या ग्रंथात बाबासाहेबांच्या 12 हास्यमुद्रा आहेत. त्यांच्या एवढ्या हास्यमुद्रांचा दुसरा ग्रंथच जगात नाही. हे काम करता आले हा माझ्या आयुष्यातील कृतज्ञ क्षण आहे! कृतार्थ क्षण आहे!
-----
प्रा. हरी नरके