Saturday, May 14, 2011

ओबीसींनी आपले खरे नायक ओळखावेत - हरी नरके

ओबीसींनी आपले खरे नायक ओळखावेत - हरी नरके
सकाळ वृत्तसेवा
Thursday, February 24, 2011 AT 12:00 AM (IST)
Tags: obc,   hari narke,   marathwada
कन्नड - डॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळे महात्मा फुले आणि महात्मा फुल्यांमुळे छत्रपती शिवाजी महाराजांची ओळख जगाला झाली. ओबीसींनी आपले खरे नायक कोण हे ओळखण्याची गरज आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध विचारवंत हरी नरके यांनी ताडपिंपळगाव (ता. कन्नड) येथील समता परिषदेच्या मेळाव्यात रविवारी (ता. 20) केले. श्री. नरके म्हणाले की, महाराष्ट्रात ओबीसींचा मोठा वर्ग आहे. मात्र तो संघटित नाही. ओबीसींचे खरे नायक छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हेच आहेत; मात्र ओबीसींना या आपल्या नायकांची ओळख नाही. त्यामुळे हा वर्ग विखुरलेला आहे. जाती-पोटजातींना तिलांजली देऊन समतेसाठी निर्णायक लढाई पुकारण्याची जबाबदारी ओबीसींवरच आहे. खासदार समीर भुजबळ हे लढाऊ असल्याने त्यांनी जनगणनेत ओबीसींची गणना करावी, ही मागणी संसदेत मान्य करून घेतली, असे 27 टक्के खासदार संसदेत गेले, तर भारतीय राज्यघटना प्रामाणिकपणे अंमलात आणण्यासाठी दबाव निर्माण होईल. लोकसभा आणि विधानसभेत ओबीसींना 27 टक्के आरक्षण असावे यासाठी देशपातळीवरील आंदोलन सुरू करण्यात येणार आहे. प्रास्ताविक सरपंच मच्छिंद्र काळे यांनी केले.

या वेळी व्यासपीठावर समता परिषदेचे मराठवाडा प्रदेश अध्यक्ष डॉ. संजय गव्हाणे, बनेखॉं पठाण, जिल्हा अध्यक्ष जयराम साळुंखे, जिल्हा परिषद सदस्य देवीदास जाधव, माजी उपसभापती प्रभू जाधव, देवगाव रंगारीचे सरपंच गोरखनाथ गोरे, देवळाणा सरपंच सोमनाथ सोनवणे, माळीवाडगावचे सरपंच विजय तुपे, समता परिषदेच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा संजीवनी घोडके, महिला संघटक शशिकला खोबरे, कारभारी भांडवलदार, कन्नड, कारखान्याचे संचालक अनिल सिरसाठ, चतरसिंग मेहेर, साहेबराव गवळी आदींची उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या सुरवातीस गावातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. समजा परिषदेच्या शाखेचे उद्‌घाटन करण्यात आले. पदाधिकारी कार्तिक गोरे, श्रीकांत शेळके, श्रीकांत काळे, रामदास मेहेर यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी विवेक भांडवलदार, राजेंद्र नेवगे, डॉ. बाळासाहेब जाधव, प्रवीण गायकवाड, साईनाथ करवंदे, कैलास फाळके, कारभारी बनकर, संदीप गोरे, डॉ. विलास दाबके, गणेश सोनवणे आदींसह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. अरुण सोनवणे यांनी केले. आभार कृष्णा सोनवणे यांनी मानले.

1 comment:

  1. OBC CHALVALILA DISH DENARY AAPLY SARKHE LOK PAHILY VAR SAMADHAN VATATE

    ReplyDelete