Saturday, May 14, 2011

शिवरायांच्या प्रजाहित दक्ष कारभाराचा आदर्श घ्या -डॉ. हरी नरके

http://loksatta.in/index.php?option=com_content&view=article&id=137343:2011-02-18-18-06-37&catid=48:2009-07-15-04-02-19&Itemid=59

औरंगाबाद, १८ फेब्रुवारी/खास प्रतिनिधीशेतकऱ्यांची गरज बघून त्यांना शून्य टक्के व्याजदराने कर्ज द्यावे आणि प्रसंगी त्याला कर्जमाफीदेखील द्यावी, असा निर्णय छत्रपती शिवाजी यांनी आपल्या कार्यकाळात घेतला होता. छत्रपती शिवरायांच्या नावाने जयजयकार करणाऱ्या नेत्यांनी या प्रजाहित दक्ष कारभाराचा आदर्श घ्यावा, असे आवाहन ज्येष्ठ विचारवंत डॉ. हरी नरके यांनी केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन केंद्रातर्फे ‘छत्रपती शिवाजी व शिवकाल’ या विषयावरील राष्ट्रीय चर्चासत्राचे उद्घाटन डॉ. नरके यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. कुलगुरू डॉ. विजय पांढरीपांडे हे अध्यक्षस्थानी होते. या चर्चासत्रात सव्वाशे प्रतिनिधी सहभागी झाले आहेत.
छत्रपती शिवराय आणि फुले-शाहू-आंबेडकर चळवळ या विषयावर डॉ. हरी नरके यांचे भाषण झाले. स्वराज्याचे म्हणजेच स्वदेश स्वातंत्र्याचे संकल्पचित्र रेखाटणारे आणि त्याला मूर्त स्वरूप शिवराय यांनी दिले. शिवरायांच्या अनेक पैलूंची आठवण आजही आपल्याला त्यांच्या द्रष्टेपणाची जाणीव देऊन जाते. आज देशात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. शिवरायांचा शेतकऱ्याकडे बघण्याचा दृष्टिकोण काय होता, या संदर्भात शोध घेणे उद्बोधक ठरणार आहे, असे डॉ. नरके म्हणाले. राजांनी प्रभावळीचे सुभेदार रामाजी अनंत यांना लिहिलेले ५ सप्टेंबर १६७६ चे पत्र आजही मार्गदर्शक ठरावे असेच आहे. पेरणीच्या वेळी शेतकऱ्यांना गरजेप्रमाणे पत्र द्यावे. पीक आल्यावर त्यांच्याकडून मुद्दल तेवढे घ्यावे, व्याज घेऊ नये. यासाठी सरकारी खजिन्यातून दोन लाखांपर्यंत रक्कम खर्च पडली तरी हरकत नाही. शेतकऱ्याला जर मुद्दलही फेडणे शक्य नसेल तर त्याला तेही माफ करावे, असे शिवाजी महाराजांनी पत्रात म्हटले होते. याचा अर्थ शेतकऱ्यांची गरज बघून त्याला शून्य टक्के व्याजदराने कर्ज द्यावे आणि प्रसंगी त्याला कर्जमाफी द्यावी, असा हुकूम शिवाजी महाराजांनी केला होता. महाराजांचा जयजयकार करताना त्यांच्या या प्रजाहित दक्ष कारभाराचा आदर्श घ्यावा, असे आवाहन डॉ. नरके यांनी केले.
इतिहासाकडे केवळ शैक्षणिक दृष्टिकोणाकडून न पाहता नव्या दृष्टीने विचार करता आला पाहिजे. महापुरुषांचे कार्य हे कुठल्याही चौकटीत न अडकविता देशाच्या हितासाठी असते. इतिहासाचे विकृतीकरण करता कामा नये, असे कुलगुरू डॉ. विजय पांढरीपांडे म्हणाले. यावेळी कुलसचिव डॉ. मानवेंद्र काचोळे यांचे भाषण झाले. प्रारंभी संचालक डॉ. नीरज साळुंके यांनी प्रास्ताविक केले. या चर्चासत्रात पहिल्या दिवशी डॉ. सर्जेराव भामरे, अ‍ॅड. अनंत धारवाडकर, डॉ. जिगर मोहंमद, डॉ. रामभाऊ मुटकुळे, डॉ. संजयनाथ शर्मा, डॉ. इमारतवाले यांनी मार्गदर्शन केले.