Friday, August 12, 2011

आरक्षण:शिक्षणाच्या बाजारीकरणाची कहाणीAdmagnet-X
आरक्षण - शिक्षणाच्या बाजारीकरणाची कहाणी
प्रा. हरी नरके
Friday, August 12, 2011 AT 07:39 AM (IST)

बहुचर्चित "आरक्षण' चित्रपटाला विरोध करणाऱ्यांनी बुधवारी हा चित्रपट पाहिला आणि आपली भूमिका मागे घेतली. या कार्यकर्त्यांचा विरोध का मावळला, याविषयी... संधी मिळाली तर मागासवर्गीयही उत्तम गुणवत्तावान होतात; यश प्राप्त करू शकतात, असाच संदेश "आरक्षण' चित्रपटाने दिला आहे. एका ध्येयवादी शिक्षकाच्या झुंजीची ही कहाणी आहे. जातीय तेढ, सामाजिक फाळणी किंवा आरक्षणाला विरोध, असे त्याचे स्वरूप नाही. हा चित्रपट आजपासून प्रदर्शित होत असला तरी त्याला प्रदर्शनपूर्व विरोध खूप झाला. चित्रपट न्यायालयात गेला. चळवळीतील काहींनी आरक्षणाचा मुद्दा घेऊन त्याला विरोध केला. शेवटी बुधवारी हा चित्रपट विरोधकांनी पाहिला आणि हिरवा झेंडा दाखविला.

प्रकाश झा यांचे चित्रपट समकालीन प्रश्‍नांवर असतात. "दामुल', "गंगाजल', "अपहरण', "राजनीती' या चित्रपटांनी झा यांचे हिंदी चित्रपट क्षेत्रातील स्थान पक्के केलेले आहे. "आरक्षण'मध्ये सामाजिक तेढ निर्माण करणारे आणि घटनात्मक हक्कांना बाधा आणणारे आरक्षणविरोधी चित्रण असल्यास त्याला शांततामय मार्गाने विरोध करू, अशी भूमिका राष्ट्रीय अनुसूचित जाती व जमाती आयोगांनी, तसेच समता परिषदेचे अध्यक्ष सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ आणि रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले यांनी घेतली होती. प्रकाश झा यांनी या मंडळींसाठी खास खेळाचे आयोजन केले होते. भुजबळांसह सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे, महिला व बालकल्याणमंत्री वर्षा गायकवाड, खासदार समीर भुजबळ, रिपब्लिकन पक्षाचे गौतम सोनवणे, भाजपचे आमदार प्रकाश शेंडगे, कृष्णकांत कांदळे, डॉ. जब्बार पटेल आदींसमवेत मीसुद्धा हा चित्रपट पाहिला. प्रत्यक्ष चित्रपट पाहिल्यानंतर काही दृश्‍ये आणि प्रसंग काढण्याच्या अटीवर भुजबळांनी विरोध मागे घेतला. "आरक्षण हे घटनात्मक वास्तव असून, शिक्षणाचे बाजारीकरण होण्यास आरक्षण जबाबदार आहे का, याचा शोध मी चित्रपटातून घेतला आहे,' असे झा या वेळी म्हणाले.
जागतिकीकरणामुळे झालेले शिक्षणाचे बाजारीकरण, कोचिंग क्‍लासेसचे वाढते महत्त्व आणि आरक्षणाबाबतचे सामाजिक ताणतणाव या कथानकावर चित्रपट उभा राहतो. प्रभाकरन (अमिताभ बच्चन) हा ध्येयवादी शिक्षक एका नामवंत खासगी महाविद्यालयाचा प्राचार्य आहे. मंडल आयोगाच्या अंमलबजावणीमुळे उच्च शिक्षण संस्थांमध्ये २७ टक्के आरक्षण आले. मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा आनंदोत्सव केल्यामुळे उच्चवर्णीय मुले भडकतात. तणाव निर्माण होतो. हातघाईची वेळ येते. महाविद्यालयातील आरक्षणविरोधी लॉबीला मानवतावादी प्रभाकरन अडचणीचे वाटत असल्याने ते कटकारस्थान करून त्यांना राजीनामा द्यायला भाग पाडतात. उपप्राचार्य मिथिलेश सिंग (खलनायक मनोज वाजपेयी) प्राचार्य बनतात. ते खासगी कोचिंग क्‍लासेस चालवत असतात. अमिताभचे घरच त्यांनी बळकावलेले असते. ते परत मिळविण्यासाठी अमिताभची ससेहोलपट आणि त्यांचा शैक्षणिक आदर्शवाद यांची टिपिकल हिंदी मसाला चित्रपटाची सगळी भट्टी वापरण्यात आली आहे.
गुंतागुंतीच्या प्रश्‍नांचे सुलभीकरण, आदर्शवादी मांडणी, मनोरंजनाची फोडणी आणि आरक्षण या ज्वालाग्राही प्रश्‍नाचा मार्केटिंग स्ट्रॅटेजी म्हणून केलेला वापर, या चित्रपटात बघायला मिळतो. दीपक (सैफ अली खान) हा मागासवर्गीय युवक प्रभाकरनच्या मदतीमुळे अभ्यासात टॉपर आहे. परंतु त्याला नोकरीत डावलण्यात येते. शेवटी प्रभाकरन त्याला आपल्या महाविद्यालयात नोकरी देतात. आरक्षण प्रश्‍नावरून निर्माण झालेल्या संघर्षात दीपक गप्प बसू शकत नाही. ज्या उच्चवर्णीय मुलांना प्रवेशात अडचणी येतात, त्यांच्याशी त्याचा थेट सामना होतो. प्रभाकरनशी वाद होतात. महाविद्यालय सोडावे लागते. प्रभाकरनची मुलगी पूर्वी (दीपिका पदुकोण) दीपकच्या प्रेमात असते. परंतु वडिलांच्या बाजूने ती उभी राहते आणि आरक्षणाच्या प्रश्‍नावरील मतभेदामुळे ते दोघे दुरावतात.

शिक्षणापासून वंचित असलेल्या आणि विशेषतः प्रतिकूल परिस्थितीतील मुलांचे मोफत अभ्यासवर्ग प्रभाकरन म्हशींच्या गोठ्यात चालवतात. दीपक, पूर्वी आणि त्यांचे मित्र मदतीला पुढे येतात. त्यामुळे खासगी कोचिंग क्‍लासेसचा धंदा बसतो. मग कटकारस्थाने आणि संकटांची मालिका व शेवटी नेहमीप्रमाणे अनपेक्षित वळण घेऊन गोड शेवट, अशी मांडणी आहे. आरक्षण प्रश्‍नावरील काही प्रचलित गैरसमज भडकपणे मांडले जातात. त्यांची धारदार उत्तरेही दिली जातात. काही प्रसंग आणि समूहदृश्‍ये प्रभावी आहेत. काही दृश्‍ये व संवाद वादग्रस्त किंवा आक्षेपार्ह ठरू शकतात. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आदर करून त्यावर चर्चा, वादविवाद होऊ शकेल. झा यांनी खासगी क्षेत्रात येऊ घातलेले आरक्षण रोखण्यासाठी हा चित्रपट बनवला आहे काय, त्यांनी कोचिंग क्‍लासेस आणि बाजारीकरणाचे खापर आरक्षणावर फोडणे अनुचित नाही काय, त्यांनी आरक्षण या प्रश्‍नाच्या गाभ्यालाही हात न घालता एक टिपिकल हिंदी मसालापट बनवून सरधोपट मार्गाने या प्रश्‍नांचे गांभीर्य कमी केले आहे काय, असे प्रश्‍न उद्‌भवू शकतात. झा यांच्याशी प्रतिवादही होऊ शकेल. तो केलाही पाहिजे. परंतु त्यांनी एका समकालीन प्रश्‍नाला हात घालण्याचे (टिपिकल हिंदी मसाला पद्धतीने का होईना) धाडस केल्याचे गुण त्यांना द्यावेच लागतील. चित्रपटाची हाताळणी खूप लाऊड आहे. संवाद मात्र धारदार आणि टाळ्या घेणारे आहेत. कष्टाचे महत्त्व उच्चवर्णीयांनी कष्टकऱ्यांनाच सांगावे यातला उपरोध नेमका टिपला आहे. एकूण काय, तर एका ध्येयवादी शिक्षकाच्या झुंजीची आरक्षणाच्या पार्श्‍वभूमीवरील टिपिकल हिंदी मसाला कहाणी म्हणजे "आरक्षण' होय.
टीव्हीवरील प्रोमो पाहून हा चित्रपट आरक्षणविरोधी असावा, असे वाटत होते. मात्र, चित्रपट पाहिल्यानंतर गैरसमज दूर झाला. काही दृश्‍ये आणि प्रसंगांमध्ये सुधारणा करण्याची तयारी झा यांनी दाखविल्याने समता परिषदेने विरोध मागे घेतला आहे.
- छगन भुजबळ, सार्वजनिक बांधकाममंत्री