Tuesday, November 15, 2011

महाराजा यशवंतराव होळकर चरित्राचे प्रकाशन

मवार १४ नोव्हेंबर २०११
प्रकाशन सोहळा........: आयु.मधुकर रामटेके

महाराष्ट्र हे पुरोगाम्यांचं राज्य आहे अशी कितीही आरोळी फोडली तरी त्याला सदैव जातियवादाची किनार होती व आहे. या जातियवाच्या ढिगा-यात कित्येक बहुजन नायक पूरले गेलेत. वर्चस्ववाद्यांचा प्रभाव असणा- सवर्ण आणि बहुजन दोन्ही वर्गातील लेखक, इतिहासकारानी नेहमीच अशा पूरलेल्या इतिहासाला फाटा दिला. बहुजनांच्या इतिहासाशी नजरा नजर होऊनही जाणीव पुर्वक कानाडोळा केला. उत्तुंग व्यक्तीमत्व, जगदविख्यात अन अत्यंत प्रभावी बहूजन व्यक्तीच्या इतिहासाशी फटकून वागण्यात आले. याचा एकंदरीत परिणाम असा झाला कि आमचे खरे नायक आम्हाला कधी कळलेच नाही. अशाच एका महानायकाला इतिहासाच्या ढिगा-यातून मोठ्या विर्याने उकरुन काढण्याचं अपूर्व कार्य केलं आयु. संजय सोनवणी यानी. हा धनगर सामाजात जन्मलेला व भारतभू साठी उभं आयूष्य पेटवून देणारा आध्य क्रांतिकरक, स्वातंत्र्य लढाची पायाभरणी करणारा वीर पुरूष म्हणजे महाराजा यशवंतराव होळकर होय.
महाराजा यशवंतराव होळकर यांचं सोनवणी लिखित चरित्रग्रंथ ’भारतीय स्वातंत्र्याचे प्रणेते, महाराजा यशवंतराव होळकर’ या पुस्तकाचा काल दि. १३ नोव्हे २०११ रोजी पुणे येथील प्रत्रकार भवनात मोठ्या थाटामाटात प्रकाशन सोहळा पार पडला. त्याच बरोबर धनगर-अस्मिता नावाच्या धनगर समाजाच्या पाक्षिकाचेही प्रकाशन करण्यात आले. महाराष्ट्राच्या कानाकोप-यातून धनगर बांधवानी मोठी गर्दी केली. काळाच्या ओघात गाडून टाकलेल्या आपल्या महानायकाच्या इतिहासाला सामोर आणल्या बद्दल संजय साहेबांवर धनगर समाजानी अक्षरश: स्तूतीसुमनांचा वर्षाव केला, मनोभावे कृतज्ञता व्यक्त केली. या कार्यक्रमाला राष्ट्रिय समाज पक्षाचे नेते श्री. महादेव जानकर स्वत: जातीने उपस्थीत होते. त्याच बरोबर बहुजन समाजाचे थोर विचारवंत हरी नरके सरही उपस्थीत होते.
धनगर समाजातर्फे संजय साहेबांचा सत्कार करण्यात आला. सहसा सत्कार करताना शाल देण्यात येते पण धनगर बांधवानी पारंपारीक पद्धतीने हा सत्कार करण्याचे ठरविले होते. संजय साहेबाना घोंगळं देण्यात आलं. व सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांच्या डोक्यावर पगडी चढविण्यात आली. ही होळकरी पगडी होती. सत्कार पुण्यात झाला अन पगडी दिली यावरुन लोकांत गैरसमज होऊ नये यास्तव आयोजकानी ही पुणेरी पगडी नसून होळकरी पगडी असल्याचं माईकवरुन सांगितलं. मागच्या दोनशे वर्षात प्रथमच पुण्यात होळकरी पगडीनी सत्काराचा मान पटकवीला. या वेळी संजय साहेबांचे माहितीपर भाषण झाले.
श्री. जानकर साहेबानी आपल्या भाषणात सोनवणी व नरके सरांचे आभार मानले. ते पुढे म्हणतात, “संसदेत दिवसेंदिवस आपल्या ओबीसी नेत्यांची भाषणं अत्यंत प्रभावी होत चालली आहेत. त्यांची भाषणं म्हणजे संग्रही ठेवावे अशी टिपणं असतात. त्याच बरोबर सरकारला कोंडीत धरणारी व सामाजीक नि राजिकय आघाड्यावर कामाचे वेध घेणारी विश्लेषणात्मक, तुलनात्मक, मर्मभेदक आणि दिमाखदार भाषणं असतात. ओबीसी नेत्याच्या सडेतोड आणि अचूक युक्तीवादाच्या मागे नरके सरांसारख्या थिंक ट्यांकचं मोठं योगदान असतं. आम्हाला आमचा पक्ष देशाच्या चारही सिमाना नेऊन भिडवायचा आहे. त्यासाठी नरके व सोनवणी सारख्या विचारवंतांची आम्हाला निकडीची गरज आहे. यापुढे आम्ही सदैव त्यांच्या पाठीशी आहोत. त्यांच्यावर वाकडी नजर टाकणा-यानी खबरदार व्हावे.” अशा प्रकारे जानकर साहेबानी विचारवंताची राजकारणाच्या सबलिकरनातील भूमिका विशद केली. त्याच बरोबर विचारवंताना धमकावणा-या हुकूमशाहाना निर्वाणीचा ईशार दिला की थोबाडं बंद नाही ठेवली तर थोबाडीत बसेल.
नरके सरानी घेतला ब्रिगेडचा समाचार
कार्यक्रमाच्या शेवटी अध्यक्षीय भाषण करताना नरके सरानी केलेली ज्ञानाची चतूरस्त्र उधळण समाजाच्या नाना पैलूवर प्रकाश टाकणारी होती. चिकित्स, मार्गदर्शक, मनोवेधक नि आवाश्यक तिथे प्रक्षोभप्रवर्तक तोफा डागत नरके सर पुढे सरकतात. सामाजिक असमतोलतेचा अत्यंत तिटकारा बाळगणारे नरके नवा जातियवाद रुजवू पाहणा-यांचा समाचार घेताना म्हणतात की, “केवळ ब्राह्मणाना शिव्या घालणे ही चळवळ नसून विधायक आणि भरीव कामगीरी करुन तळागळातल्या लोकांच्या उत्कर्षासाठी लढा उभारणे ही चळवळीची उद्दिष्टे असावी. पण काही वर्चस्ववादी लोकं समतेच्या चळवळीत नवीन विषता तयार करु पाहत आहेत. वैचारिक मतभेद खोडण्यात सर्वस्वी असमर्थ असणारी ही माणसं लाथा बुक्क्याच्या बाता करतात. पण खबरदार या पुढे ते खपवून घेतले जाणार नाही.” पुढे नरके सर मोठ्या त्वेषाने बोलतात की, “आज काल इतिहास संशोधकांच पीक आलं आहे. रातो रात इतिहास लिहून नवीन इतिहासकार जन्मास येत आहेत. अजिबात अभ्यास न करता ढापा ढापी करण्यात ही मंडळी सराईत असून खोटा इतिहास लिहण्यात पटाईत आहेत. ही लबाड लोकं विपर्यस्त इतिहास लिहण्यात गढून गेली आहेत. केळूस्कर गुरुजी लिखीत पुस्तकाचं चक्क टायटल बदलणारी, हवं तसं बारसं करुन घेणारी ही नवी पिढी या देशाचं, समाजाचं व इतिहासाचं वाटोळं करुन दम घेणार. अभ्यासाच्या नावानी शंख असलेले खेडेकर तर माझं संशोधन स्वत:च्या नावावर छापण्या पर्यंतचा चोरटेपणा केला.” हा नरके सरानी घेतलेला खेडेकरांचा समाचार सभागृहात हशा पिकवून गेला. खेडेकारांचे दोन अनुयायी माझ्या सोबतच बसलेले होते. त्यांचा चेहरा फोटो काढण्यासारखा झाला होता. एकेकाचा टप्प्या टप्प्याने समाचार घेत नरके सर पुढे जातात. ते म्हणतात, “इंग्रजांकडून इतिहास संशोधनाची शिस्त शिकावी. या कामात त्यांच्या तुलनेने आपण पाच हजार पट मागे आहेत. तटस्थपणा, वस्तुनिष्ठता आणि चिकाटी हे सर्व गुण इतिहास संशोधनासाठी अत्यंत महत्वाचे असून गैरसोयीचे असले तरी वस्तूनिष्ठता मांडण्याचं धारिष्ट्य वरील गुणसंपन्न माणूसच करू शकतो.” भावी इतिहासकाराना दिलेला हा मोलाचा सल्ला, चोरट्या इतिहासकारांची केलेली कान उघडणी आणि मस्तावलेल्याना दिलेला निर्वाणीचा ईशारा अशा प्रकारे घेतलेल्या चतूरस्त्र समाचारानी नरके सरांचे भाषण संपन्न झाले.
तिसरी आघाडी
महाराष्ट्रातील बहुजन चळवळीचे स्वत:कडे एकाधिकार मालकी हक्क असल्याच्या अविर्भावात हिंडणा-यांची एक मानसिकता आहे. त्यांच्याशी वैचारीक मतभेद असलेल्या प्रत्येक बहुजनास ते ब्राह्मणाचे हस्तक ठरवित असतात. ब्राह्मण विरुद्ध बहुजन अशी चळवळ चालू आहे नि जे जे आमच्या विरुद्ध आहेत ते सर्व ब्राह्मणांचे हस्तक आहेत अशी आरोळी फोडत असतात. बामसेफ व मराठा सेवा संघानी बहुजन विचारवंतावर चिखल फेक करताना ते ब्राह्मणाना जाऊन मिसळले अशी आवई उठवली होती. बहुजन विचारवंत हे कधिच ब्राह्मणांकडे बुद्धि गहान टाकत नाहीत याचा खणखणीत पुरावा देणारा कालचा सोहळा यांच्या थोबाडीत मारुन गेला. ओबीसींचं आरक्षण हिसकावुन नेण्याच्या तय्यारीत असलेल्या वर्चस्ववाद्याना तडाखेबंद प्रतिउत्तर देण्याची गरज होती. त्यासाठी संघटनात्मक कार्य उभारुन सडेतोड उत्तर देणे गरजेचे होते. कालच्या कार्यक्रमातून याची सुरुवात झाली आहे. बहुजन चळवळीची ही नवी आघाडी ख-या अर्थाने समता रुजविण्यात झोकून देईल. द्वेषमूलक कार्याला ईथे थारा नसणार आहे. नरके सरानी आपल्या भाषणातून वर्चस्ववाद्याना निर्वाणीचा ईशारा तर दिलाच पण त्याच बरोबर क्षमाशील हृदयाने असे आवाहनही केले की मोठ्या भावाप्रमाणे बंधूत्वाने वागालात तर विधायक नि भरीव कामात आमची साथच असेल. आम्ही नेहमी फुले-शाहू-आंबेडकर चळवळीचे होतो अन असणार हे याद राखा. तोडा फोडा व झोडा करणा-यानी आता थांबावे अन्यथा त्याना तडाखेबाज प्रतिउत्तर देण्यात येईल.
त्या नंतर सोनवणी लिखीत पुस्तक विक्रीसाठी ठेवण्यात आले. हातो हात पहिली आवृत्ती विकल्या गेली, फक्त पन्नास साठच पुस्तक उरलीत. हा सुध्दा विक्रीचा विक्रमी सोहळा होता. अशा प्रकारे या कार्यक्रमाची सांगता झाली.
{सौजन्य: आयु.मधुकर रामटेके}mdramteke.blogspot.com

3 comments:

  1. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  2. हिंदवी स्वराज्याच्या नावाखाली मुस्लीम द्वेष फेफावला असताना महाराजा महाराजा यशवंतराव यांनी भारताच्या स्वातंत्र्यासाटी शीख धर्म किंवा मुस्लीम धर्म स्वीकारुण धर्माच्या प्रचाराची तयारी केली होती. आजही उत्तरेत शीख लोक त्यांना शीख समजतात व महाराजा जसवंतराव होळकर या नावानेच त्यांना ओळखतात. आणि यामूळेचे कि काय त्यांना धर्मनिरपेक्ष स्वराज्याचे संस्थापक मानले जाते..

    ReplyDelete
  3. हिंदवी स्वराज्याच्या नावाखाली मुस्लीम द्वेष फेफावला असताना महाराजा महाराजा यशवंतराव यांनी भारताच्या स्वातंत्र्यासाटी शीख धर्म किंवा मुस्लीम धर्म स्वीकारुण धर्माच्या प्रचाराची तयारी केली होती. आजही उत्तरेत शीख लोक त्यांना शीख समजतात व महाराजा जसवंतराव होळकर या नावानेच त्यांना ओळखतात. आणि यामूळेचे कि काय त्यांना धर्मनिरपेक्ष स्वराज्याचे संस्थापक मानले जाते..

    ReplyDelete