Monday, July 9, 2012

तुम्ही घरात राहता की गोठय़ात?आज आदिवासींच्या पाडय़ांवर, भटक्यांच्या पालांमध्ये, अनुसूचित जातींच्या झोपडय़ांमध्ये, ओबीसींच्या शेता-रानात वाचन पोचले आहे. तुकाराममहाराज म्हणायचे, `आम्हा घरी धन, शब्दांचीच रत्ने !’ बलुतेदाराघरी ही रत्ने झळकत आहेत.
`ज्या जागेत माणसे पुस्तकांसह राहतात त्याला `घर’ असे म्हणतात. जिथे माणसे किंवा जनावरे पुस्तकांशिवाय राहतात त्याला `गोठा’ असे म्हणतात.‘ आपण कुठे राहतो? घरात की गोठय़ात? हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारून बघितला पाहिजे.
दिवसेंदिवस वाचन कमी होत चाललेय अशी चर्चा आजकाल सगळीकडे ऐकायला मिळते. वाढत्या चॅनेल्स, मालिका, रिऍलिटी शो आदींमुळे लोकांचा वाचनाकडचा ओढा कमी होतोय असे सांगितले जाते. इलेक्ट्रॉनिक मीडिया अतिशय पॉवरफुल आहे. नृत्य, नाटय़, संगीत, आयपीएल असा मनोरंजनाचा जबरदस्त मसाला चॅनेल्सवरून 24 तास बदाबदा वाहत असतो. या खतरनाक मार्यापुढे चिंतनाची मागणी करणार्या वाचनाकडे दुर्लक्ष होणारच असे मानले जाते.
आज वाचन कमी होत आहे असे म्हणणे म्हणजे पूर्वी कधीतरी ते जास्त होते असे मान्य करणे ओघानेच आले. सर्वेक्षणातून पुढे आलेले पुरावे मात्र या म्हणण्याला दुजोरा देताना दिसत नाहीत.

 गेल्या सव्वाशे वर्षात आपल्याकडे वाचन संस्कृती कशी होती याचे ग्रंथबद्ध पुरावे उपलब्ध आहेत. थोर समाजसुधारक गोपाळराव आगरकर यांना वाचनाचे भयंकर वेड होते. शिक्षक, प्राध्यापक, पत्रकार या मंडळींनी `वाचनमग्न’ असावे असा त्यांचा आग्रह होता. `सुधारक’ या त्यांच्या वर्तमानपत्रात त्यांनी याबाबतची नाराजी व्यक्त करताना म्हटले होते की, 5 टक्केही सुशिक्षित वाचन करीत नाहीत. पुस्तक हातात धरण्याचा त्यांना कंटाळा येतो हे चिंताजनक होय!
शंकरराव वावीकर यांनी 1896 साली `वाचन’ या नावाचा ग्रंथ लिहिला. त्यात ते म्हणतात, “हल्लीचे प्रोफेसर आणि शिक्षक हे टेक्स्टबुकांव्यतिरिक्त काही वाचत नाहीत.” यावरून दिसते ते असे की, सव्वाशे वर्षांपूर्वी आपल्या समाजाचा वाचनदर पाच टक्केही नव्हता.
1848 साली ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले व त्यांच्या सहकार्यांनी मुलींची पहिली भारतीय शाळा सुरू केली त्याचवेळी त्यांनी देशातील दलित-बहुजनांसाठीही ज्ञानाची कवाडे उघडली. त्यावेळी भारताची साक्षरता होती अवघी अडीच टक्के! 1901 च्या जनगणनेनुसार ती पाच टक्क्यांवर पोहोचलेली दिसते. आपण स्वतंत्र झालो तेव्हा आपली साक्षरता होती 12 टक्के! आज देशाची साक्षरता 75 टक्केपर्यंत पोहोचलीय तर राज्याची 86 टक्के झालीय. वाचनदर सुमारे 10 टक्के झालाय. 11 कोटींच्या महाराष्ट्रात साडेनऊ कोटी लोक साक्षर असून त्यातील 95 लक्ष ते एक कोटी लोक वाचन करतात, असे वेगवेगळ्या पाहण्यांतून दिसून आले आहे. ग्रंथालये, वाचनालये यातील पुस्तके आणून किंवा व्यक्तीगत ग्रंथ खरेदी करून हे लोक पुस्तके वाचीत असतात. वृत्तपत्रे, नियतकालिके, इ-बुक्स, सोशल मीडिया, ललित वा वैचारिक ग्रंथांच्या या वाचकांचे सामाजिक स्तर जर बघितले तर काय चित्र दिसते?
दीडशे वर्षांपूर्वी भारतीय स्त्रियांची साक्षरता शून्य टक्के होती. म्हणजेच स्त्रीवाचकांची संख्या शून्य टक्के होती. आज सर्व समाजातील स्त्रिया वाचन करताना दिसतात. लिहिताना दिसतात. लोकसंख्येतील निम्मा घटक असणार्या या वर्गात वाचन वाढले की कमी झाले, काय म्हणणार? शिक्षणाचा अधिकार असणारे त्रैवर्णिक (ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य) पुरुषांमध्ये पिढय़ान्पिढय़ा साक्षरता होती, वाचनही होते, परंतु शूद्र अतिशूद्र (अनु. जाती, जमाती, इतर मागासवर्गीय आणि भटके विमुक्त) यांना शिक्षणाचाच अधिकार नव्हता त्यामुळे त्यांच्या वाचनाचा सवालच पैदा होत नव्हता. जिथे सार्या देशातील साक्षरताच मुळी अडीच टक्के होती, तिथे वाचनदर पाच टक्के असूनही वाचन संस्कृती किती घरांमध्ये होती असा सवाल विचारला आणि आजची साक्षरता, सामाजिक स्तरनिहाय वाचकप्रमाण आणि वाचनदर यांचा आलेख काढला की वाचन वाढले की कमी झाले याचे खरे उत्तर मिळू शकेल. ज्या तळातल्या घटकांमध्ये वाचन शून्य टक्के होते तेथे ते वाढले की कमी झाले याचे खरे उत्तर मिळू शकेल. ज्या तळातल्या घटकांमध्ये वाचन शून्य टक्के होते तेथे ते वाढले असूनही ते विचारात घेतले जात नाही कारण `संस्कृतायझेशन’ (संस्कृतीकरण) प्रक्रिया! “रिडींग फ्रॉम बिलो” शोधा मग लक्षात येईल की देशातील व राज्यातील वाचन कमी होत नसून वाढतेय! अर्थात तिथेही तिचा (वाचन संस्कृतीचा) विस्तार 100 टक्क्यांपर्यंत झाला पाहिजे असाच माझा आग्रह असणार! मी अल्पसंतुष्ट नाही. तिथेही आज वाचन ही गरज वाटत नाही. घरी पुस्तके असणे हे `स्टेटस सिंबॉल’ वाटत नाही. हजारो रुपयांमध्ये पगार घेणारेसुद्धा पुस्तके फार महाग झालीत, परवडत नाहीत म्हणून घेत नाही, अशी तक्रार करतात. खरे तर महागाई कुठे नाही? सगळीकडेच ती आहे. कपडे महागलेत म्हणून कपडे घालायचे सोडलेत, किंवा अन्नधान्य, भाज्या महागल्यात म्हणून केवळ एकवेळ जेवतो असे म्हणणारे भेटतात का? नाही. म्हणजे महागाई असली तरी गरज असेल तर खरेदी करावीच लागते. पुस्तकांवाचून काय अडते? अशी भावना असल्यानेच ही तक्रार पुढे केली जाते असे माझे स्पष्ट मत आहे. मराठी पुस्तके फारशी स्वस्त नसली तरी इंग्रजी व हिंदी पुस्तकांच्या तुलनेत ती नक्कीच स्वस्त आहेत. खरेदीदार वाढले तर त्यांच्या किंमती आणखी उतरतील.
आज आदिवासींच्या पाडय़ांवर, भटक्यांच्या पालांवर, अनुसूचित जातीच्या झोपडय़ांमध्ये, ओबीसींच्या शेता-रानात वाचन पोचले आहे. फुलते आहे. जिथे अभाव असतो तिथेच त्याचे मोल असते. मुबलक असले की अपचन होते. तुकाराममहाराज म्हणायचे, `आम्हा घरी धन, शब्दांचीच रत्ने!’ आज बलुतेदाराघरी ही रत्ने झळकत आहेत.
इंग्लंड आणि अमेरिका हे ग्रंथांच्या जोरावर मोठे झालेले देश आहेत. वाचन, प्रकाशन आणि लेखन यांना प्रोत्साहन देण्यासाठी विल्यम शेक्सपियरचा जन्मदिवस वाचन दिवस, पुस्तक दिवस म्हणून साजरा करण्याची घोषणा संयुक्त राष्ट्रसंघाकडून करण्यात आली. महाराष्ट्रात दरवर्षी मराठीत 2000 तर भारतात विविध भाषांतील सुमारे 90 हजार पुस्तके प्रकाशित होतात. राज्यात शैक्षणिक, धार्मिक व वैचारिक आणि ललित पुस्तकांची दरवर्षी 200 कोटी रुपयांची उलाढाल होते. देशातील ही वार्षिक उलाढाल दहा हजार कोटी रुपयांवर जाते. त्यात 60 टक्के वाटा हा शैक्षणिक पुस्तकांचा असतो. खपामध्ये शैक्षणिक, धार्मिक, व्यापार, उद्योग, ललित आणि त्यानंतर वैचारिक ग्रंथांचा खप असा क्रम असतो. आपल्या देशातील इंग्रजी ग्रंथांची उलाढाल 9800 कोटी रुपयांची आहे ती वेगळीच. देशात एकूण 19 हजार प्रकाशक असून त्यातले एक हजार एकटय़ा महाराष्ट्रात आहेत. इ-बुक्समधील किंडलवर 70 लाखांपेक्षाही अधिक पुस्तके उपलब्ध आहेत. साहित्य अकादमी ही जगातील सर्वात मोठी प्रकाशन संस्था आहे.
आपल्या घरी असलेल्या किंवा विकत घेऊन घरी आणलेल्या पुस्तकातून प्राध्यापक जॉन हार्वर्ड यांच्यासारखे एखादे विद्यापीठ निघावे इतका विस्तार आपल्या घरी आलेल्या पुस्तकातून झाला तर वाचन संस्कृती वाढेल. व्यक्ती आणि समूह यांचे यश वाढेल. व्यक्ती आणि समूह मोठे झाले की वाचनसंस्कृतीची टक्केवारी वाढू लागेल. इतके वाचन हे `पॉवरफूल’ असले पाहिजे!
 प्रा. हरी नरके