Tuesday, August 14, 2012

विलासराव देशमुख : उमदा लोकनेता


महाराष्ट्राचे नेते विलासराव देशमुख यांच्या निधनाने एक उमदा लोकनेता आपण गमावला आहे. ते विलक्षण मुत्सद्दी,उत्तम प्रशासक, उत्तुंग महत्वाकांक्षा,विनोदबुद्धी आणि विलासी देशमुखी जीवनशैली यांचे वेगळे रसायन होते.ते  मुख्यमंत्री झाले तेव्हाची गोष्ट:
१] मी त्यांची वेळ घेवुन त्यांना भेटलो.लेखी पत्र दिले.राजर्षी शाहु महाराजांची जयंती राज्यात शासनाने साजरी करावी अशी मागणी केली.ते म्हणाले, "तुमची मागणी चांगली आहे.पण आजवर पश्चिम महाराष्ट्रातील अनेक मुख्यमंत्री झाले, त्यांच्या नजरेतुन ही गोष्ट कशी सुटली? ते तपासुन बघावे लागेल.पुणेकर काय म्हणतील हेही बघावे लागेल." त्यांनी उपसचिव श्री.भुषण गगराणी यांना बोलावले, अहवाल द्यायला सांगितला. गगराणी कोल्हापुरचे आणि माझे मित्र. त्यांनी तात्काळ अनुकुल अहवाल दिला. विलासरावांनी जी.आर.काढण्याचे आदेश दिले.महाराजांच्या जन्माला १२५ वर्षे आणि निर्वाणाला ८० वर्षे झाल्यानंतर प्रथमच राज्यात  शाहुजयंती शासकीयस्तरावरुन सर्वत्र साजरी होवु लागली.पुढे हा दिवस सामाजिक न्याय दिवस म्हणुन साजरा केला जावु लागला. लातुरच्या एका जयंती कार्यक्रमाला ते उद्घाटक असताना त्यांनी मला प्रमुख वक्ता म्हणुन आवर्जुन बोलाविले होते.
२]सरकारतर्फे दरवर्षी उत्तम ग्रंथांना पुरस्कार दिले जातात.मी मंत्री रामकृष्ण मोरे यांना हा कार्यक्रम दरवर्षी साहित्यप्रेमी नेते आणि राज्याचे प्रथम मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीदिनी २५ नोव्हेंबरला घेण्याची सुचना केली.ती त्यांना आवडली.ते मला घेवुन लगेच मुख्यमंत्री विलासरावांकडे गेले. विलासरावांपुढे  आम्ही हा दिवस "संस्कृती दिन" म्हणुन साजरा करण्याची कल्पना मांडली.त्यांना ती इतकी आवडली की ते म्हणाले आत्ताच्या आत्ता एंटीचेंबर्मध्ये बसुन प्रस्ताव तयार करा,उद्याच्या केबिनेटमध्ये मंजुर करुन घेवु.आम्ही केलेला प्रस्ताव त्यांनी मंजुर करुन घेतला.पहिल्या पुरस्कार वितरण आणि साहित्यसंमेलनाच्या या कार्यक्रमाला ते स्वता क-हाडला आले.त्या सुंदर एक दिवसीय संमेलनाचे सुत्रसंचालन मला देण्यात आले होते.
३]विलासराव शिक्षण व सांस्कृतिक  खात्याचे मंत्री असताना फुले-आंबेडकर प्रकाशन समित्यांचे पदसिद्ध अध्यक्ष होते.मी सदस्यसचिव होतो.  आम्ही संपादित केलेला आणि साहित्य संस्कृती मंडळाने प्रकाशित केलेला डा.बाबासाहेब आंबेडकर गौरव ग्रंथ शासनाने सवलतीत अवघ्या ६० रुपयांना द्यावा अशी मी सुचना केली. त्यांनी त्यासाठी अर्थखात्याकडे प्रस्ताव पाठवुन तो मंजुर करुन घेतला आणि ते पुस्तक ६० रुपये किमतीत मिळेल याची व्यवस्था केली.
४] बाबासाहेबांच्या साहित्याच्या १९ व २० व्या  खंडांचे प्रकाशन मुख्यमंत्री विलासरावांच्या हस्ते करण्याचे ठरले.ग्रंथ तयार होते, काही अडचणींमुळे प्रकाशन लांबले होते. विलंबाबद्दल काहींची नाराजी होती.के.सी.कोलेजात ५ सप्टेंबरच्या शिक्षकदिनाच्या कार्यक्रमात ते करावे असे ठरले. कार्यक्रमाच्या काहीतास आधी ऎनवेळी  विलंबाबद्दल नाराजी दाखवणा-या एका मोठ्या नेत्याने आपण व्यक्तीगत अडचणींमुळे कार्यक्रमाला येवु शकत नसल्याने कार्यक्रम पुढे ढकला असे विलासरावांना फोनवरुन सांगितले. त्यांनी मला मंचावर बोलवुन घेतले आणि प्रकाशन करुया नको, असे सांगितले. मी हो म्हणालो, पण माझी नाराजी त्यांनी हेरली.ते मला म्हणाले, "तुम्ही तरुण आहात,तुम्हाला कल्पना नाही, हा नेता फार न्युशंन्सव्हेल्युवाला आहे. उद्या डोक्याला ताप करील. कटकट नको." प्रकाशनाचा कार्यक्रम झाला नाही. पुढे या नेत्याने त्याच्या सोयीने त्याच्या गावात हा कार्यक्रम ठेवला.तेव्हा मात्र विलासरावांनी काहीतरी कारण सांगुन कार्यक्रमाला जाण्याचे शिताफीने टाळले.
५]विलासराव "हेपी गो लकी" वाटावेत असे कायम वागत असत. ते फ़ारसे गंभीर आहेत असे कधीच वाटत नसे. लातुरच्या एका कार्यक्रमाच्या वेळी त्यांनी आम्हा काहीजणांना सकाळी बाभुळगावच्या त्यांच्या देशमुखी गढीवर  चहा-नास्त्याला बोलावले.ठरल्याप्रमाणे सकाळी ९ वा आम्ही गेलो.पण विलासराव आरामात १२ वाजता झोपेतुन उठले, त्यामुळे आम्ही तसेच परत आलो. माझ्यासोबत काही पत्रकार,साहित्यिक आणि प्रशासनातले ज्येष्ठ अधिकारी होते. देशमुखी थाठाचा तो अनुभव होता.दुपारी भेटल्यावर हसुन ते म्हणाले, पुणेकर,पुढच्यावेळी याल तेव्हा मात्र चहा-नास्ता घेतल्याशिवाय जायचे नाही बरंका!
६]मुंबई महापुर, रेल्वे बाम्बस्फोट, शेतकरी आत्महत्या,सानंदा प्रकरण,सुभाष घई प्रकरण या सगळ्यांत त्यांनी कायम "आदर्श व्यवहारवाद" सांभाळला.काही म्हणुन अंगाला लावुन घ्यायचे नाही, सगळे लक्ष हायकमांड आणि त्यांचे हितसंबंध सांभाळण्यावर केंद्रीत करायचे यात ते वाकबगार होते.जातवार जनगणनेमुळे ओबीसी राजकारण बळकट होईल म्हणुन त्याला त्यांनी जाहीरपणे विरोध केला.सरकारने जनगणनेचा अनुकुल निर्णय घेतल्यावर मात्र त्यांनी मौन बाळगले. शेतक-यांना न्याय देण्यातले राज्यकर्त्यांचे-सत्ताधा-यांचे अपयश जेव्हा ठळकपणे पुढे येवु लागले तेव्हा त्याच्याकडुन सामान्य शेतक-याचे लक्ष दुसरीकडे वेधण्यासाठी सत्ताधारी जातीला आरक्षणाचे गाजर दाखवुन  जे राजकारण केले गेले त्यात विलासराव भुमिगत राहुन रसद पुरवित होते.
७]पद्मगंधा दिवाळी अंकाने सर्व मंत्री,  उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्या बायकांच्या मुलाखतीवर आधारित अंक काढला होता. त्यात तत्कालीन उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, मंत्री गणपतराव देशमुख यांच्या पत्नींच्या दिलखुलास व बहारदार मुलाखती होत्या.विलासरावांच्या पत्नीने आपण "देशमुख" असल्याने "मुख्यमंत्र्यांच्या पत्नी असलो" तरी मुलाखत देवु शकत नाही, असे कळवळुन सांगितले होते.
विलासरावांच्या कितीतरी आठवणी सांगता येतील.
त्यांना माझी विनम्र श्राद्धांजली!