Friday, November 30, 2012

पुणे विद्यापीठ, महात्मा फुले पुतळा अनावरण


शिक्षणाचे सार्वत्रीकरण व्हावे
-
Thursday, November 29, 2012 AT 04:30 AM (IST)

पुणे - 'शेतकऱ्यांचे उत्थान आणि महिलांचे सबलीकरण यासाठी महात्मा फुले यांनी 19 व्या शतकात सुरू केलेले कार्य अद्यापही पूर्णत्वास गेलेले नाही. त्यासाठी शिक्षणाचे सार्वत्रीकरण आणि समतेचे वातावरण तयार करावे लागेल. ते करण्यासाठी पुणे विद्यापीठातील त्यांचा पुतळा सामाजिक समतेची प्रेरणा देईल,'' असे प्रतिपादन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बुधवारी केले.

पुणे विद्यापीठाच्या प्रांगणात उभारण्यात आलेल्या महात्मा जोतिराव फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण राज्यपाल के. शंकरनारायणन यांच्या हस्ते झाले. मुख्यमंत्री चव्हाण, सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ, पुण्याचे पालकमंत्री सचिन अहीर, खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर, पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे, प्रभारी कुलसचिव डॉ. (कॅप्टन) चंद्रशेखर चितळे आदी या वेळी उपस्थित होते. अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने हा भव्य पुतळा पुणे विद्यापीठास भेट देण्यात आला आहे.

चव्हाण म्हणाले, 'महात्मा फुले हे सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीचे खऱ्या अर्थाने जनक होते. शिक्षण व समता या दोन शब्दांत त्यांच्या कार्याची महती स्पष्ट होते. पुणे ही त्यांच्या या कार्याची कर्मभूमी होती. त्यामुळे पुणे विद्यापीठात त्यांचा पुतळा उभा राहणे ही औचित्यपूर्ण घटना आहे. महिला, दलित व शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी त्यांनी सातत्यपूर्ण प्रयत्न केले. त्यांनी सर्वप्रथम मागणी केलेला सक्‍तीचे मोफत शिक्षण देण्याचा कायदा प्रत्यक्षात येण्यास मोठा कालावधी गेला. आजही महिला आणि शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी त्यांनी मांडलेले विचार पूर्णत्वास नेण्यासाठी मोठा पल्ला गाठावा लागणार आहे. त्यासाठी सामाजिक समतेच्या विचारांची प्रेरणा सर्वांना मार्गदर्शक ठरेल.''

महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी केलेल्या सामाजिक कार्यामुळे महाराष्ट्राला प्रगतीचा वेगळा टप्पा गाठणे शक्‍य झाल्याचे सांगून राज्यपाल के. शंकरनारायणन म्हणाले, 'महिलांच्या सबलीकरणासाठी विविध प्रयत्न झाले असले, तरी हुंडाबळी आणि स्त्रीभ्रूणहत्या यासारख्या घटना समाजाला मान खाली घालायला लावणाऱ्या आहेत. शिक्षण व स्वयंरोजगार याद्वारेच महिलांचे सबलीकरण शक्‍य आहे. शेतकऱ्यांसमोर आज अनेक गंभीर समस्या असून, त्यातून मार्ग काढण्यासाठी कृषी विद्यापीठे, उद्योजक व शेतकरी यांनी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज आहे.''
डॉ. हरी नरके व डॉ. उज्ज्वला बर्वे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

'डॉ. आंबेडकरांचाही पुतळा देऊ'
महात्मा फुले यांच्याप्रमाणेच पुणे विद्यापीठात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचाही पुतळा लवकरात लवकर उभारण्यात यावा. बाबासाहेब आंबेडकरांचाही पुतळा महात्मा फुले समता परिषद विद्यापीठास देण्यास तयार आहे, असे छगन भुजबळ यांनी सांगितले. स्त्री शिक्षणाचा पाया इतर कोणी नाही, तर सावित्रीबाई फुले यांनीच घातला होता; या संदर्भातील इतिहास बदलण्याचा प्रयत्न करू नये, असा इशाराही त्यांनी दिला.

1 comment:

  1. PROF.ANAND UBALE: From..email

    Very very beautiful statue. Its the result of ur tireless endevours.

    ReplyDelete