Thursday, December 6, 2012

बाबासाहेबांचे स्मारक
मुंबई ही राष्ट्रपुरुष डा.बाबासाहेब आंबेडकरांची कर्मभुमी. ५६ वर्षांपुर्वी त्यांच्या महापरिनिर्वाणानंतर दादरला समुद्रकिनारी चैत्यभुमी उभारण्यात आली. त्याच्यालगतची केंद्र सरकारच्या ताब्यात असलेली इंदु मिलची साडेबारा एकर जागा बाबासाहेबांच्या स्मारकाला देण्याची ऎतिहासिक घोषणा करण्यात आली आहे.या निर्णयाच्या श्रेयाची जोरदार लढाई चालु आहे.आपण केलेल्या प्रयत्नांमुळेच हा निर्णय झाला असे म्हणनारे अनेकजण पुढे येत आहेत.मतदारांमध्ये बाबासाहेबांना मानणारा फार मोठा वर्ग आहे त्याला आपल्याकडे खेचण्याची ही स्पर्धा आहे.
दरवर्षी ६ डिसेंबरला बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी देशविदेशातुन चैत्यभुमीवर लाखो लोक येत असतात.समुद्रकिनारी असलेली ही जागा खुप अपुरी पडते.शेजारची सुमारे पाच लाख चौरस फुट जागा मिळाल्यामुळे त्याठिकाणी जागतिक किर्तीचे अतिभव्य स्मारक उभारता येईल. बाजारभावाप्रमाणे या  जागेची किंमत काही हजार कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते.मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असल्याने दादरसारख्या मध्यवर्ती भागात जागांचे भाव गगनाला भिडलेले असणे स्वाभाविक आहे.मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राजकीय ईच्छाशक्ती दाखवुन ही जागा स्मारकाला मिळवुन दिली आहे.
बाबासाहेब हे आधुनिक भारताचे प्रमुख शिल्पकार आहेत.त्यांचे जीवन म्हणजे सामाजिक न्यायाचे आंतरराष्ट्रीय महाकाव्य होय.त्यांनी राष्ट्र उभारणीसाठी अहोरात्र योगदान दिलेले आहे.ते एकट्या दलितांचे नेते नसुन समग्र भारताचे महानायक आहेत.त्यांना फक्त दलितांपुरते मर्यादित करणे   म्हणजे देशाच्या पंतप्रधानाला गावचा सरपंच म्हणण्यासारखे आहे.दुर्दैवाने भारतीय मानसिकता जातीपातींची मानसिकता असल्याने दोन्ही बाजुंनी त्यांचे अवमुल्यन केले जाते. त्यांनी देशाचे संविधान लिहिले.ते जगातले सर्वात मोठ्या लोकशाही देशाचे सर्वात मजबुत संविधान आहे.पण बाबासाहेबांचे हे मोठेपण कोत्या मनाच्या राज्यकर्त्यांनी खुल्या दिलाने मान्य करायला अक्षम्य विलंब लावलेला आहे. त्यांनी महिलांचे अधिकार,[हिंदु कोडबिल], ओबीसी आरक्षण,देशाची चुकीची संरक्षण नीती, जम्मुकाश्मीरला असणारा पाकिस्तानच धोका व चीनचे आव्हान आणि धरसोडीची अर्थनिती या पाच कारणांमुळे देशाच्या कायदेमंत्री पदाचा राजीनामा दिला होता. सत्ताधा-यांनी त्यांना आपले  रा्जीनामापत्रही संसदेत वाचु दिले नाही.हे दस्तावेज त्यांच्या समग्र साहित्यात आम्ही खंड१४ च्या भाग २ च्या पाननंबर १३१९ वर छापलेले आहेत. त्यांचे तैलचित्र संसदेतील सेंट्रल हालमध्ये लावण्यासाठी दहाबारा वर्षे संघर्ष करावा लागला.त्यांना भारतरत्न हा सन्मान मिळायलाही १९९०-९१ साल उजाडावे लागले.त्यांच्या स्मारकाला जागा मिळायला ५६ वर्षे लागावीत हे देशाला भुषणावह नाही.
२००३ साली सांगलीजवळच्या जयसिंगपुरचे भुपाल आबा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही ५० लोक दिल्लीला गेलो होतो. आम्ही दहा हजार सह्यांची निवेदने राष्ट्रपती,उपराष्ट्रपती,पंतप्रधान आणि शरद पवार यांना देवुन स्मारकासाठी त्वरित जागा देण्याची मागणी केली होती. लाखो लोकांनी आपापल्यापरिने असे प्रयत्न केलेले होते.तेव्हाकुठे सरकार नमले. आता निदान स्मारक तरी येत्या तीन चार वर्षात उभारण्यात आले पाहिजे.बाबासाहेंबांच्या महापरिनिर्वाणाला ६० वर्षे पुर्ण होताना म्हणजे २०१६ साली स्मारकाचे उद्घाटन होईल असा कालबद्ध कार्यक्रम हाती घेण्यात यावा.
भारताच्या घटना परिषदेत देशभरातुन तज्ञ निवडुन पाठवण्यात आले होते. त्यांनी विचारपुर्वक संविधान बनवले. याकामात जनतेला सहभागी करुन घेण्यासाठी  सर्व भारतीय नागरिकांकडुन सुचना मागवण्यात आलेल्या होत्या.आलेल्या हजारो सुचनांमधील अनेक सुचना स्विकारण्यातही आल्या होत्या. त्याच धर्तीवर स्मारकासाठी तज्ञांची समिती स्थापन करुन सर्व नागरिकांकडुन सुचना मागवण्यात याव्यात.
बुद्धगया, सारनाथ, कुशीनगरच्या तोडीचे धम्मपिठ या स्मारकात असावे. नालंदा तक्षशिलाच्या धर्तीचे ज्ञानपिठ असावे.बाबासाहेब हे ज्ञानमार्गी, ग्रंथप्रेमी आणि देशातील सर्वात मोठा ग्रंथसंग्रह असलेले विद्वान होते. त्यांनी विद्यार्थी दशेत असताना फिरोजशहा मेहता यांच्या स्मारकाच्या चर्चेत एक महान ग्रंथालय उभारण्याची सुचना टाईम्स आफ इंडियात पत्र लिहुन केली होती.ते लंडनच्या ब्रिटिश म्युझियम लायब्ररीत १६ तास अभ्यास करीत असत. ५ते ६ कोटी पुस्तकांचे हे ग्रंथालय आहे. बाबासाहेबांची सर्व भाषांमधील पुस्तके , त्यांच्यावरील सर्व पुस्तके, जगातील सर्व देशांच्या राज्यघटना आणि सामाजिक न्याय आणि चळवळींवरील लाखो ग्रंथ असलेले देशातील सर्वात मोठे ग्रंथालय या स्मारकात उभारले जावे.हे स्मारक आकार,विचार,कृती आणि ज्ञाननिर्मिती यांचे उर्जाकेंद्र बनावे असे मला वाटते.अमेरिकेत स्वातंत्र्यदेवतेचा पुतळा आहे.तसा या स्मारकात बाबासाहेबांचा "समतेचा" पुतळा असावा. या स्मारकातुन मानवी हक्क आणि समता, स्वातंत्र्य, बंधुता व न्यायासाठी लढणारांना शक्ती पुरवली जावी.अध्ययन,अध्यापन,ज्ञाननिर्मिती यांचे लंडन स्कुल आफ इकोनोमिक्स, कोलंबिया, ओक्सफर्ड,केंब्रीजच्या तोडीचे आधुनिक केंद्र उभे केले जावे असे मला वाटते. फक्त पुतळे आणि इमारती उभ्या करणे फार सोपे असते. या स्मारकात २४ तास आणि ३६५ दिवस राष्ट्र उभारणी आणि सामाजिक न्यायाच्या चळवळींसाठीची संकल्पचित्रे तयार करण्याचे काम चालायला हवे. जगातले सर्वात मोठे,अतिभव्य पण गजबजलेले ज्ञानपिठ अशी त्याची मोहर असावी.आधुनिक बुद्धाचे स्मारक त्याच तोडीचे व्हायला हवे.
............