Thursday, May 9, 2013

"महात्मा" पदवीचा शतकोत्तर रौप्यमहोत्सव...११मे २०१३.
................................................
जोतीरावांनी सर्वांना शिक्षण, स्त्री-पुरुष समता, जातीनिर्मुलन,संसाधनांचे फेरवाटप,ज्ञाननिर्मिती, धर्मचिकित्सा आणि आंतरजातीय विवाह,सामाजिक न्याय या कार्यक्रमपत्रिकेच्या आधारे आधुनिक भारताच्या पायाभरणीचे काम केले.ख्यातनाम विचारवंत डा. रामचंद्र गुहा यांनी त्यामुळेच जोतीरावांना आधुनिक भारताचे "शिल्पकार" मानलेले आहे.बाबासाहेब आंबेडकर त्यांना आपला गुरू मानत असत. १९३२ साली पुण्यात बोलताना महात्मा गांधी  म्हणाले होते, "जोतीराव फुले देशके पहले महात्मा थे. असली महात्मा थे."  स्वातंत्र्यवीर सावरकरांनी फुल्यांना "समाज क्रांतिकारक" म्हणून गौरविले होते.
..................................................

आजपासुन १२५ वर्षापुर्वीची गोष्ट आहे. ११ मे १८८८ रोजी मुंबईतील हजारो कामगारांनी भायखळ्याला एकत्र जमून समाजक्रांतिकारक जोतीराव फुल्यांना "महात्मा" ही पदवी दिली. सामान्य माणसांनी आपल्या उद्धारकर्त्याला अशी पदवी देवून सन्मानित करण्याची ही देशातील पहिलीच घटना होती.जोतीरावांच्या वयाला ६१ वर्षे पुर्ण झाल्याच्या निमित्ताने मुंबईकरांनी हा समारंभ आयोजित केला होता.मांडवी कोळीवाड्यातील रघुनाथ महाराज सभागृहात हा समारंभ आयोजित करण्यात आला होता.भायखळ्याच्या परिसरात या दिवशी सणासुदीचा उत्साह होता. नारायण मेघाजी लोखंडे, दामोदर सावळाराम यंदे,स्वामी रामय्या व्यंकय्या आय्यावारू, रावबहादूर वंडेकर,मोरो वि्ट्ठल वाळवेकर, भाऊ डुंबरे पाटील आदींनी पुढाकार घेवून हा कार्यक्रम आयोजित केला होता.कार्यक्रमाला हजारो आग्री,कोळी,भंडारी बांधव उपस्थित होते.
जोतीरावांनी सर्वांना शिक्षण, स्त्री-पुरुष समता, जातीनिर्मुलन,संसाधनांचे फेरवाटप, ज्ञाननिर्मिती,धर्मचिकित्सा आणि आंतरजातीय विवाह या कार्यक्रम पत्रिकेच्या आधारे आधुनिक भारताच्या पायाभरणीचे काम केले.ख्यातनाम विचारवंत डा. रामचंद्र गुहा यांनी त्यामुळेच जोतीरावांना आधुनिक भारताचे "शिल्पकार" मानलेले आहे.बाबासाहेब आंबेडकर त्यांना आपला गुरू मानत असत. १९३२ साली पुण्यात बोलताना महात्मा गांधी  म्हणाले होते, "जोतीराव फुले देशके पहले महात्मा थे. असली महात्मा थे."  स्वातंत्र्यवीर सावरकरांनी फुल्यांना "समाज क्रांतिकारक" म्हणून गौरविले होते. 
१३१ वर्षांपुर्वी प्राथमिक शिक्षण मोफत, सक्तीचे आणि सार्वत्रिक झाले पाहिजे अशी त्यांनी सरकारकडे मागणी केली होती.अशी मागणी करणारे ते संपुर्ण आशिया खंडातले पहिले शिक्षणतज्ञ होते. शिक्षणहक्क कायद्याद्वारे २०१० साली ती नुकतीच पुर्ण झाली.१४० वर्षांपुर्वी त्यांनी आपला "गुलामगिरी" हा ग्रंथ अमेरिकेतील निग्रो चळवळीला अर्पण केला होता.अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी आपल्या भारतभेटीत ही अर्पणपत्रिका बघुन या महात्म्याला "सलाम" केला. जागतिक सामाजिक चळवळींना असा पाठिंबा देण्याचे त्याकाळातले असे दुसरे उदाहरण सापडणार नाही.
शेती परवडत नाही म्हणून आजवर देशातील लाखो शेतकर्‍यांनी आत्महत्त्या केलेल्या आहेत. १३० वर्षांपुर्वी त्यांनी शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारित बाजारभाव मिळाल्याशिवाय शेती आणि शेतकरी यांचे दैन्य संपणार नाही असे "शेतकर्‍याचा असूड" मध्ये सांगून या समस्येकडे देशाचे लक्ष वेधले होते. आधुनिक पद्धतीची शेती करणे, तलावतळी,धरणे बांधून शेतीला "नळाद्वारे" पाण्याचा पुरवठा करणे, शेतीला जोडधंदे, पुरक उद्योग यातून शेती किफायतशीर बनविण्याचा नकाशा त्यांनी मांडून दाखवला होता.अशाप्रकारे आजच्या ठिबक सिंचनचे बीजरूपच जणू ते दाखवित होते.
त्यांच्या शाळांमध्ये मुलामुलींना वयाच्या ६व्या वर्षापासून शेती आणि उद्योगाचे शिक्षण सक्तीचे करण्यात आलेले होते.त्यांनीच पहिल्यांदा त्रिभाषा सुत्र सुचवले. शैक्षणिक गळतीच्या प्रश्नाचे मूळ शोधून त्यावर गरिब मुलांना विद्यावेतन {पगार} देण्याचा उपाय त्यांनी अमलात आणलेला होता.त्यांनी दाखवलेल्या याबाबतच्या इतर १५ कारणांचा आणि उपायांचा  अभ्यास आजही मार्गदर्शक ठरावा. 
द्रष्टे शिक्षणतज्ञ म्हणून जोतीरावांची प्रस्तुतता आजही कमी झालेली नाही.
१८७६ ते १८८३ याकाळात ते पुण्याचे आयुक्त {कमिशनर} होते. घरोघरी बंद नळाद्वारे पाणी पुरविण्याची योजना यशस्वी करण्यासाठी ते झटले.उत्तम रस्ते, शाळा, आरोग्य, शहर स्वच्छता यावर त्यांचा भर होता.गव्हर्नरच्या स्वागतावर अनाठायी पैसा उधळण्याला तसेच मंडईच्या बांधकामाला त्यांनी विरोध केला.त्याच पैशाचा वापर शिक्षणासाठी करावा असा त्यांचा आग्रह होता.आज शहरातील बेकायदा बांधकामांच्या प्रश्नाने अक्राळविक्राळ रुप धारण केलेले आहे. या पार्श्वभुमीवर कमिशनर फुले यांनी आपल्या घरातील अंतर्गत बांधकामात सुधारणा करण्यासाठीसुद्धा नगरपालिकेकडे परवानगीसाठी अर्ज केलेला बघून चकित व्हायला होते.
स्वत: फुले एक बांधकाम व्यावसायिक होते. कात्रजचा बोगदा, बंडगार्डनचा पुल, डावा कालवा, रस्ते, इमारतींची अनेक कामे त्यांच्या "पुणे व्यावसायिक आणि कंत्राटदार कंपनी"द्वारे करून पुण्यातील एक यशस्वी उद्योगपती म्हणून त्यांनी नावलौकिक कमावलेला होता. बिल्डर या शब्दाला आता "आदर्श" रुप प्राप्त झाल्याने ते बिल्डर होते असे म्हणायची हिंम्मत मी करणार नाही. पण ते "नेशन बिल्डर" होते याबाबत दुमत होवू शकत नाही. शेयर बाजारात यशस्वी होण्यासाठी कोणती  दक्षता घ्यावी  यावर त्यांनी कविता लिहिल्या. ते ग्रंथप्रकाशनाच्या व्यवसायात होते. दागिन्यांचे साचे विकण्याची त्यांच्याकडे एजन्सी  होती. शेती,उद्योग,व्यापार यातली त्यांची ही चौफेर कामगिरी पाहिली की ते मुळात सामाजिक नेते असूनही ते उत्तम उद्योगपती कसे होवू शकले यावर खूप लिहिता येईल.
भारतीय कामगार चळवळीचे जनक नारायण मेघाजी लोखंडे यांना पहिली कामगार संघटना बांधायला जोतीरावांचेच प्रोत्साहन होते.टिळक-आगरकरांना पहिल्या तुरुंगवासात जामीन द्यायला आणि सुटकेनंतर त्यांचा मानपत्र देवून सत्कार करण्यातही तेच दोघे पुढे होते.१८६९ साली जोतीरावांनी शिवचरित्र लिहिले. १८८५ साली  त्यांनी देशात पहिल्यांदा शिवजयंती उत्सव सुरू केला. रायगडवरील शिवसमाधीची डागडुजी केली आणि शिवरायांना महानायक म्हणुन लोकमाणसात प्रस्थापित केले. पुण्यात हिराबागेत आणि मुंबईला लालबाग-परळ भागात करण्यात आलेल्या शिवजयंती कार्यक्रमांच्या नोंदी उपलब्ध आहेत. 
सामाजिक न्यायासाठी त्यांनी शुद्र-अतिशुद्रांना आरक्षण देण्याची मागणी केली.आजचे सामाजिक न्यायाचे सगळे राजकारण याच सुत्राच्या भोवती फिरते आहे.जोतीरावांच्या  राजकारण समजून घेण्यासाठी "सत्तेवाचून सकळ कळा झाल्या अवकळा" हे जोतीसुत्र समजून घेतले पाहिजे. त्यांचा विरोध शोषणकर्त्या नेतॄत्वाला होता. त्यावेळी हे नेतॄत्व ब्राह्मणांकडे होते.हा समाज त्यावेळी सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, आर्थिक सत्तेच्या सगळ्या किल्ल्या स्वत:च्या कंबरेला बाळगून होता. जोतीराव पर्यायी संस्कृतीचे जनक होते.आज समग्र सत्ता परिवर्तन झालेले आहे.आता सगळी सुत्रे बहुजनांकडे आलेली आहेत. आज जोतीराव असते तर त्यांनी आसुडाचे  फटके कोणाला मारले असते? "ख्रिस्त महंमद मांग ब्राह्मणाशी धरावे पोटाशी बंधूपरी!" असे पोटतिडकीने सांगणार्‍या जोतीरावांच्या नावाचा वापर जातीविद्वेष पसरवण्यासाठी केला जावा ही शोकांतिका आहे.सत्ता समग्र बहुजनांपर्यंत झिरपलेली नाही.भटकेविमुक्त, दलित-आदिवासी,ओबीसी,महिला यांची परवड चलू आहे.
देशातील सत्ताधारी वर्गाचे अपयश लपवण्यासाठी आणि वर्ग,जाती,धर्म व लिंगभावाच्या आधारे केले जाणारे शोषण आणि पक्षपात यांच्यावर पांघरूण घालण्यासाठी आज जातीविद्वेषाच्या वणव्याचा सर्रास आधार घेतला जातो आहे.अशावेळी जोतीरावांचा विवेकी वारसा समजून घेण्यासाठी आणि त्यांच्या कालसुसंगत संकल्पचित्राच्या प्रकाशात सामाजिक ऎक्याची चळवळ मजबूत करण्यासाठी यानिमित्ताने पुढाकार घेतला जायला हवा.
...................................................................................................................................