Thursday, June 13, 2013

महात्मा फुले वाडा:समाजक्रांतीचे उर्जाकेंद्र



आधुनिक भारताच्या सामाजिक जडणघडणीत महाराष्ट्राचा आणि विशेषत: पुण्याचा लक्षणीय वाटा आहे. १९ व्या शतकात पुणे हे भारतीय प्रबोधन चळवळींचे केंद्र होते.महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, लोकहितवादी, न्या.रानडे, रमाबाई रानडे, पंडीता रमाबाई, आगरकर, महर्षि कर्वे,बायजा कर्वे, महर्षि शिंदे आदींनी सामाजिक परिवर्तनाच्या चळवळींना उर्जा पुरवली.पुण्यातील त्यावेळच्या जुन्या गंज पेठेतील  फुलेवाडा सुमारे ५० वर्षे सामाजिक चळवळींना रसद पुरवित होता.
या वाड्याच्या खाणाखुना पाहताना या अभिमानास्पद इतिहासाचे पोवाडे आपल्या कानात गुंजत राहतात.
पुर्व पुण्याचे सांस्कृतिक आणि सामाजिक पर्यावरण संमिश्र आणि विविधतेने नटलेले आहे.सर्व जाती धर्मांचे कष्टकरी या भागात गोळ्यामेळ्याने राहत असतात. या वडीलोपार्जित घरातच जोतिराव फुल्यांचा ११ एप्रिल १८२७ रोजी जन्म झाला.मिशन‍र्‍यांच्या शाळेत त्यांचे शिक्षण झाले. १८४८ साली त्यांनी देशातील  मुलींची पहिली भारतीय शाळा आपल्या सहकार्‍यांच्या मदतीने भिडे वाड्यात सुरू केली तेव्हा सावित्रीबाई याच वाड्याचा उंबरठा ओलांडून सार्वजनिक जीवनात पहिले पाउल टाकत्या झाल्या.भारतीय स्त्रियांचे सार्वजनिक जीवन अशारितीने इथूनच सुरू झाले.भारतातील प्रौढ साक्षरता अभियान १८५४ साली याच वाड्यात सुरू झाले.रात्रीच्या स्त्री-पुरूषांच्या दोन पहिल्या शाळा याच वाड्यात काढण्यात आल्या.
विधवांच्या बाळंतपणाची सोय करणारे केंद्र आणि देशातील पहिला भारतीय माणसांनी चालवलेला अनाथाश्रम{बाल हत्त्या प्रतिबंधक गृह} इथेच सुरू झाला.अस्पृश्य मानल्या गेलेल्या समाजाला पाण्याचा हक्क दॆणारा पहिला हौद याच वाड्यात आहे. १८७३ साली याच घरात स्थापन करण्यात आलेला सत्यशोधक समाज देशातील सर्वदूर ग्रामीण भारतात पसरलेले पहिले जनआंदोलन  ठरले. इथे बसूनच जोतीरावांनी मराठीतील पहिले आधुनिक नाटक "तृतीय रत्न" लिहिले. १८६९ साली शिवरायांचा पोवाडामय चरित्रपट इथेच निर्माण झाला.अमेरिकेतील निग्रोंच्या मुक्ती चळवळींना अर्पण करण्यात आलेला "गुलामगिरी" हा ग्रंथ इथेच जन्माला आला.शेतकर्‍यांचा असूड आणि सार्वजनिक सत्यधर्माचे क्रांतिकारक तत्वज्ञान इथेच साकारले.आयुष्यातील ५०वर्षे सामाजिक परिवर्तनाची लढाई लढून जोतीराव -सावित्रीबाईं दोघांचेही पार्थिव इथेच विसावले.जोतीरावांची समाधी याच वाड्यात आहे.
१९६७ साली सरकारने हे घर राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले.१९९३ साली छगन भुजबळ यांच्या पुढाकारातून त्याची पुनर उभारणी करून ते राष्ट्रपती डा.शंकर दयाळ शर्मा यांच्या हस्ते राष्ट्रार्पण करण्यात आले.या वाड्याला राष्ट्र्पतींनी समतेचे राष्ट्रतीर्थ म्हणून "समता भुमी" घोषित केले.
सुमारे १४० वर्षे जुन्या असलेल्या या वाड्यात जोतीरावांचे वडीलोपार्जित घर,ज्याचा जुना गंज पेठ,घर नं.३९५, होता ते आणि त्यांनी स्वकष्टार्जित कमाईतून खरेदी केलेले घर यांचा समावेश आहे.जोतीरावांच्या नोंदणी केलेल्या मृत्युपत्रात त्यांनी या घराचे सर्व तपशील दिलेले आहेत.
यातले त्यांनी नवे बांधलेले घर ११खणांचे होते.त्याची दक्षिण-उत्तर लांबी ६५ फूट असून दक्षिणेकडील पुर्व पश्चिम रूंदी ४५ फूट होती. तर उत्तरेकडील रुंदी २८फूट होती.त्याच्या पुर्वेला रस्ता, पलिकडे तुंबडीवाले बैराग्याची आणि बापूभाई पिठवाल्याची घरे,पश्चिमेला बोळापलिकडे राजाराम गोविंदराव फुले यांची २घरे, दक्षिणेला बोळापलिकडे रामचंद्र किसन कुंभार यांचे घर व बाबाजी राणोजी फुले यांची बखळ,तसेच उत्तरेला रस्ता आणि नगरपालिकेचे पाण्याचे दोन हौद होते.यातील काही जागा वडीलोपार्जित, काही जोतीरावांनी लिलावात खरेदी केलेली, तर काही खरेदीद्वारे घेतलेली होती.जोतिरावांचे घर नं. ३९४, हे ३खणांचे दीड मजल्याचे होते.त्याची ओट्यासकट पुर्वपश्चिम लांबी ३२ फूट आणि दक्षिण-उत्तर रुंदी १६ फूट होती.त्याच्या पुर्वेला रा. कि.कुंभार,पश्चिमेला खंडोजी कृष्णाजी व बाबाजी राणोजी फुले, दक्षिणेला सटवाजी कृष्णाजी फुले यांची घरे तर उत्तरेला बा.रा.फुले यांची बखळ होती. जोतीरावांची स्वता:ची खरेदी केलेली बखळ जागा ४३फूट लांबी २८ फूट रुंद होती.याशिवाय आणखी २ बखळ जागा त्यांनी विकत घेतलेल्या होत्या.त्यांच्या पुर्वेला राजाराम फुले, पश्चिमेला महंमद मीरखान , दक्षिणेला हरीबा फुले, उत्तरेला भोपाजी कुंभार यांची घरे होती. जोतिरावांच्या या घरांना नगरपालिकेने वेळोवेळी दिलेले घर नंबर पुढीलप्रमाणे होते, ३९५,४०५, ३९४,३७७,५२७,४०८,जुना गंज पेठ. १८९४ पर्यंत ही घरे जोतीरावांच्या नावे होती. पुढे१९०७ पर्यंत ती यशवंत फुले, त्यानंतर ती १९०९ ते १९१० याकाळात चंद्रभागा यशवंत फुले यांच्यानावे होती.त्यांनी २८ आक्टोबर१९१० ला ही वास्तू देडगेना रु.१००ना विकली.त्यामुळे १९१२ पासून मारूती कृष्णाजी देडगे यांच्यानावे ही घरे होती.त्यांच्याकडून ती १९२३ पासून सावतामाळी फ्री बोर्डींगने खरेदी केली.१९६७ साली महाराष्ट्र सरकारने ही घरे ताब्यात घेतली. असा सगळा प्रवास झाला.
याच घराच्या स्नानगृहाची डागडुजी आणि दुरूस्ती करण्यासाठी त्यांनी पुणे नगरपालिकेकडे परवानगी मागणारा अर्ज केलेला होता.तेव्हा {१८७६ ते १८८३ या काळात} फुले  पुण्याचे आयुक्त होते.  आजच्या सत्ताधिशांच्या बेकायदेशीर बांधकाम मोहिमांच्या पार्वभुमीवर हे सारे अविश्वसनीय वाटावे असेच नाहीका? सार्वजनिक कार्याला आपली रोजगार हमी मानण्याचा तो काळ नव्हता.जोतीराव आयुष्यभर विनावेतन आणि विना मानधन पूर्णवेळ सामाजिक कार्यकर्ते राहिले.ते ख्यातनाम उद्योगपतीही होते.त्यांनी  शेअर मार्केट विपूल लेखन केलेले आहे.महात्मा जोतिराव फुले हे प्रामुख्याने समाजक्रांतिकारक, शिक्षणतज्ज्ञ आणि लेखक म्हणून परिचित आहेत. त्यांच्या उद्योगपती, कार्यकारी संचालक, अर्थतज्ज्ञ आणि शेअर मार्केटविषयक योगदानाकडे जाणकारांचे अद्याप पुरेसे लक्ष गेलेले नाही.
जोतीराव हे स्वत:च्या तेलाने जळणारे सामाजिक कार्यकर्ते होते. वर्गणीवर समाजकार्य करण्याची प्रथा तोवर निर्माण झालेली नव्हती. स्वकष्टार्जित संपत्ती खर्चून त्यांनी समाजकार्य केले.ते ‘पुणे कमर्शियल आणि कॉट्रॅक्टींग कंपनी’चे कार्यकारी संचालक होते. ही कंपनी बांधकाम आणि इतर व्यापारी क्षेत्रात कार्यरत होती. पुणे-नगर रस्त्यावरील येरवडय़ाचा (बंडगार्डन) पूल बांधण्याच्या १८६९ सालच्या कामाचे उपकंत्राट त्यांच्या या कंपनीला मिळालेले होते. या कामाला खडी, चुना, आणि दगड पुरविण्याचा मुख्य ठेका त्यांच्याकडे होता. १०० वर्षे मुदतीचा हा पूल आज १४४ वर्षांनंतरही मजबूत आहे. त्याचे रहस्य जोतीरावांच्या कंपनीने संचोटीने केलेल्या कामात आहे.
‘बिल्डर’ हा शब्द आज वेगळ्या अर्थाने प्रचलित झालेला आहे. त्याला ‘आदर्श’ रूप प्राप्त झाल्याने तो वापरताना काळजी घ्यावी लागते. जोतीराव हे मूलत: एक ‘नेशन बिल्डर’ होते. त्यांच्या कंपनीचे भागीदार असलेले वा सत्यशोधक समाजाचे सदस्य असलेले अनेक मान्यवर बांधकाम क्षेत्रावर आपली मोहर उमटवून गेले आहेत. मुंबई महानगरपालिकेची मुख्य इमारत,भायखळा पूल आणि परळचे रेल्वे वर्कशॉप, मुंबईतील अनेक कापडगिरण्या, भंडारदरा जलाशय, बडोद्याचा सयाजीराव गायकवाडांचा लक्ष्मीविलास राजवाडा, आदींची बांधकामे सत्यशोधकांनी केलेली आहेत. राजू बाबाजी वंजारी यांनी मुंबईतील टाइम्स ऑफ इंडियाची इमारत, सोलापूरची लक्ष्मी विष्णू मिल आणि लक्ष्मीदास खिमजी यांच्या मुंबईतील कापड गिरण्या बांधल्या. हे सर्वजण जोतीरावांचे निकटचे स्नेही आणि भागीदारही होते. त्यांनी सत्यशोधक चळवळीला फार मोठे योगदान दिलेले आहे.जोतीरावांच्या कंपनीने केलेली महत्त्वाची कामे म्हणजे कात्रजचा बोगदा आणि खडकवासला धरणाचा कालवा होय. पूल, धरणे, कालवे, बोगदे आणि रस्ते व सुंदर इमारती यांसारखी अनेक दर्जेदार बांधकामे त्यांनी केली. त्यातून मिळविलेली रक्कम सामाजिक कामासाठी मुक्त हस्ते खर्चून टाकली.
जोतीरावांच्या या कंपनीतर्फे पुस्तक प्रकाशनाचेही काम केले जाई.  बौद्ध विचारवंत अश्वघोष यांच्या वज्रसूची या जगप्रसिद्ध ग्रंथावर आधारित पुस्तक तुकाराम तात्या पडवळ यांनी १८६५ साली लिहिले. जोतीरावांनी ते ‘जातीभेद विवेकसार’ प्रकाशित केले. या कंपनीचे पुस्तकविक्री केंद्र होते. सोन्याचे दागिने बनविण्याचे साचे विकण्याची एजन्सी जोतीरावांकडे होती. ही कंपनी भाजीपाला विक्री व पुरवठा यांचेही काम करीत असे. एक अव्वल दर्जाचे यशस्वी उद्योगपती आणि नामवंत शेतकरी म्हणून जोतीरावांचा नावलौकिक होता. सामाजिक कार्यकर्ता आणि यशस्वी उद्योगपती असे कॉम्बिनेशन फार विरळेच म्हटले पाहिजे.
स्वत:च्या शाळांमध्ये त्यांनी वयाच्या सहाव्या वर्षांपासून सर्व मुला-मुलींना शेती व उद्योगाचे शिक्षण सक्तीचे केले होते.kAn Industrial department should be attached to schools in which children would learn useful trades And crafts and be able on leaving school to maintain themselves comfortably and independentlyl ही त्यांची भूमिका होती. दीडशे वर्षांपूर्वी कृषी-औद्योगिक शिक्षणाचा आग्रह धरणारे फुले हे आधुनिक भारताच्या कृषी-औद्योगिक प्रगतीचे द्रष्टे शिल्पकार ठरतात.द्रष्टे शिक्षणतज्ञ म्हणून जोतीरावांची प्रस्तुतता आजही कमी झालेली नाही.सामाजिक न्यायासाठी त्यांनी शुद्र-अतिशुद्रांना आरक्षण देण्याची मागणी केली.
शेतकरी सुखी व्हायचा असेल तर उत्पादन खर्चावर आधारित बाजारभाव शेतीमालाला मिळाला पाहिजे. शेती आधुनिक पद्धतीनेच केली पाहिजे. शेतीला नळाद्वारे (ठिबक सिंचनाचे बीजरूप) पाणी पुरवठा केला पाहिजे. त्यासाठी धरणे, विहिरी, तलाव, तळी बांधली पाहिजेत, कायमस्वरूपी सिंचन सुविधा हवी, नैसर्गिक खते आणि संकरित बियाणे वापरली पाहिजेत.शेतीधंद्याला उद्योग, व्यापाराची जोड दिली पाहिजे. दूध, अंडी, लोकर असे पूरक उद्योग सुरू केले पाहिजेत. शेतीबरोबरच शेतक ऱ्यांनी उद्योग व व्यापारात उडी घेतली पाहिजे. एकटी शेती कधीच परवडत नसते. ‘शेतक ऱ्याचा असूड’ या पुस्तकात जोतीरावांनी शेतीविकासाचे संकल्पचित्र रेखाटले. व्यापारी पिके, कॅनालचे पाणी आणि आधुनिक पीक पद्धती यांचा आश्रय घेणे कसे गरजेचे आहे ते पटवून देतात. या घरातून त्यांनी उद्योजक, व्यापारी आणि व्यावसायिक क्षेत्रातील लक्षणीय कामगिरी केली.
१८७६ ते १८८३ याकाळात ते पुण्याचे आयुक्त {कमिशनर} होते. घरोघरी बंद नळाद्वारे पाणी पुरविण्याची योजना यशस्वी करण्यासाठी ते झटले.उत्तम रस्ते, शाळा, आरोग्य, शहर स्वच्छता यावर त्यांचा भर होता.गव्हर्नरच्या स्वागतावर अनाठायी पैसा उधळण्याला तसेच मंडईच्या बांधकामाला त्यांनी विरोध केला.त्याच पैशाचा वापर शिक्षणासाठी करावा असा त्यांचा आग्रह होता.
 भारतीय कामगार चळवळीचे जनक नारायण मेघाजी लोखंडे यांना पहिली कामगार संघटना बांधायला जोतीरावांचेच प्रोत्साहन होते.टिळक-आगरकरांना पहिल्या तुरुंगवासात जामीन द्यायला आणि सुटकेनंतर त्यांचा मानपत्र देवून सत्कार करण्यातही तेच दोघे पुढे होते.१८६९ साली जोतीरावांनी शिवचरित्र लिहिले. १८८५ साली  त्यांनी देशात पहिल्यांदा शिवजयंती उत्सव सुरू केला. रायगडवरील शिवसमाधीची डागडुजी केली आणि शिवरायांना महानायक म्हणुन लोकमाणसात प्रस्थापित केले. पुण्यात हिराबागेत आणि मुंबईला लालबाग-परळ भागात करण्यात आलेल्या शिवजयंती कार्यक्रमांच्या नोंदी उपलब्ध आहेत.
.........................................................................................





No comments:

Post a Comment