Sunday, June 23, 2013

वटसावित्री : बाईच्या नजरेतून....भारतीय संस्कृतीमध्ये मिथक कथांना खूप महत्व आहे. नवर्‍याचे प्राण यमाकडून परत आणणार्‍या सावित्रीची कथा अशीच एक जब्राट कथाय.हजारो वर्षे तिच्या प्रभावाने अनेक स्त्रिया वटसावित्री करीत आल्यात. आज अनेक भाविक स्त्रिया तो वटसावित्रीचा सण साजरा करताहेत. आमच्याकडे येणारी मदतनिस मुलगी सकाळीच माझ्या पत्नीला विचारीत होती, "ताई, तुम्ही का जात नाही वडाला फेर्‍या मारायला?" माझी बायको म्हणाली, "माझ्या नवर्‍याचा या प्रकारांवर विश्वास नाही.माझाही नाही.मुळात आमचा पुनर्जन्मावरच विश्वास नाही.हा जन्म आनंदात जावा एवढीच आमची धडपड आहे."
तिला काही हे पटलेले दिसले नाही."असे कुठे असते काय? यांचे आपले जगावेगळे काहीतरीच!" असे काहीसे भाव तिच्या चेहर्‍यावर होते.कुमुद पावडे यांच्या "अंतस्फोट" मध्ये एक प्रसंग आहे. त्यांच्या आत्याला चांगली ४० वर्षे संसार केल्यानंतर नवर्‍याने सोडले. कारण दिले, "बायको आवडत नाही!"आत्या माहेरी भावाकडे येऊन राहू लागली. वटसावित्रीच्या दिवशी भक्तीभावाने वडाला सात फेर्‍या मारून "हाच नवरा सात जन्म मिळू दे"अशी प्रार्थना करून आली. कुमुदने आत्याला विचारले,"ज्या नवर्‍याने तुला सोडले, तो कशाला सात जन्म हवाय तुला?" आत्या म्हणाली, त्याने त्याचा धर्म सोडला, आपण कशाला आपला धर्म सोडायचा? मी फेर्‍या मारणारच!" कुमुदने कपाळावर हात मारुन घेतला.
आत्याच्या नवर्‍याने दरम्यान दुसरी बायकोही केली.तरी आत्याच्या फेर्‍या चालूच! कुमुद म्हणाली," अगं आत्या, तू म्हणतेस हाच नवरा सात जन्म हवा, त्याची दुसरी बायको म्हणते हाच नवरा सात जन्म हवा, म्हणजे हीच सवत तुला सात जन्म मिळणार!" आत्या हादरली, म्हणाली "नको गं बाई, ही सवत मला नको." आत्याने वडाला फेर्‍या मारायचे तात्काळ बंद केले.
आम्ही एक सर्वेक्षण केले. वडाला फेर्‍या मारणार्‍या स्त्रियांच्या मुलाखती घेतल्या. त्यांच्याकडून एक प्रश्नावली भरून घेतली.यात शहरी,ग्रामीण, निरक्षर ते पीएच.डी., मजुरी करणार्‍या ते आय.ए.एस.,वय वर्षे १५ते ८५ असा मोठा गट घेतला. 
तुम्ही दबावापोटी ही पूजा करता की मनापासून करता? हाच नवरा तुम्हाला सात जन्म खरेच हवाय का? या प्रश्नावर २५% महिलांचे उत्तर होते, "हो. नवरा खूप छान आहे. आमचा संसार खूप सुखाचा आहे.ही पूजा मी मनापासून करते." 
५३% महिला म्हणाल्या, सात जन्माचे सोडा, याच जन्मात नवरा नको झालाय. उल्ट्या फेर्‍या मारायची सोय असती तर आत्ताच मारल्या असत्या.पण काय करणार? फेर्‍या नाही मारल्या तर नवरा मारहाण करणार.शेजारीण संशय घेणार. एव्हढा ताप कुणी सांगितलाय?फेर्‍या मारा मोकळे व्हा."
१३% महिला म्हणाल्या," ही आमची गुंतवणूक आहे. लग्न झाले तेव्हा नवरा खूप वाईट वागायचा. २०/२५ वर्षे खूप मेहनत घेतली. नवर्‍याचे लाड केले. कायदा, नातेवाईक, संघटना सारे फंडॆ वापरले. नवरा आता दुरूस्त झालाय. आता हाच सात जन्म हवा. दुसरा करायचा म्हणजे कोणताही असला तरी भारतीय "नग"असणार. म्हणजे पुन्हा उमेदीची २०/२५ वर्षे वाया घालवावी लागणार. त्यापेक्षा आमची ही गुंतवणूक कामी येईल."
६% बायका म्हणाल्या," आम्ही मनापासून पूजा करतो.एकच प्रार्थना आहे देवाला. देवा एक मेहरबानी कर.हाच जन्म सातवा घोषित कर."
तुम्ही "बाई" असाल तर यातल्या कोणत्या गटात/ टक्क्यात येता? पुरूष असाल तर बाईच्या नजरेने जगाकडे बघा.वटसावित्रीच काय अलीबाबाची सगळी गुहा खुली होईल....