Wednesday, July 3, 2013

मराठी भाषेचे पुढील २५ वर्षांचे धोरण काय असावे?


गेले दोन दिवस पुण्यात राज्य शासनाच्या " मराठी भाषा सल्लागार समितीच्या " बैठका झाल्या.प्रा. नागनाथ कोत्तापल्ले अध्यक्षस्थानी होते. बैठकीला प्रा. सदानंद मोरे, लक्ष्मीकांत तांबोळी, विश्वनाथ शिंदे, प्रल्हाद लुलेकर,श्रीकांत तिडके, अनिल गोरे, दादा गोरे, संजय गवाणे, प्रमोद मूनघाटे,सतिष काळसेकर आदी मान्यवर साहित्यिक उपस्थित होते. बैठका सकाळी ११ते सायंकाळी ६ अशा चालल्या.सरकारने पुढील २५ वर्षांचे मराठीच्या विकासाबाबतचे धोरण ठरविण्यासाठी शिफारशी करण्याचे महत्वाचे काम या समितीकडे सोपवले आहे.समितीला ३वर्षांपुर्वी हे काम सरकारने सोपवले होते.सुरुवातीची २ वर्षे काही कारणांमुळे समितीचे कामकाज बंद होते. गेले वर्षभर कोत्तापल्लेसरांकडे समितीचे अध्यक्षपद आल्यानंतर कामाला गती आली.आज समितीचा शेवटचा दिवस होता. 
समितीने मार्च ते जून महिन्यात राज्यातील प्रमुख भाषातज्ञ, साहित्यिक, साहित्य संस्था आणि मराठीप्रेमी वाचक यांच्याशी याबाबत संवाद साधण्यासाठी राज्यभरात ६ बैठका घेतल्या होत्या. मुंबई, नागपूर, अमरावती, नाशिक, औरंगाबाद आणि पुण्यात झालेल्या या संवाद सभांना सुमारे ३५०ते ४०० जाणकारांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून अनेक सुचना,उपाययोजना आणि उपक्रम सुचवले. अनेकांनी लेखी निवेदनांद्वारे आपले म्हणणे सादर केले. काही फार उत्तम शोधनिबंध यानिमित्ताने समितीकडे आले. या सगळ्यांची तपशीलवार चर्चा करून त्याची वर्गवारी आणि नोंद बैठकीत करण्यात आली.आलेल्या सर्व माहितीच्या आधारे एक मसूदा {अहवाल} तयार करण्यासाठी एका मसूदा उपसमितीकडे जबाबादारी सोपविण्यात आली.या उपसमितीत स्वत: श्री. कोत्तापल्ले, वसंत आबाजी डहाके, माधवी वैद्य,विलास खोले, विश्वनाथ शिंदे,दत्ता भगत या मान्यवरांसोबत काम करण्याची संधी मला देण्यात आल्याचा आनंद आहे.
मराठी भाषा संकटात असताना तिचा र्‍हास थांबवण्यासाठी भाषातज्ञ, मराठी भाषक आणि सरकार यांनी काय करायला हवे याबाबत च्या आपल्या सुचना आम्हाला हव्या आहेत. आपला भाषक भूतकाळ. वर्तमानातील समस्या,अतिक्रमणे आणि भविष्यातील मराठीपुढील आव्हाने पेलण्यासाठी करावयाच्या तरतुदी, धोरणे आणि संकल्पांबाबतची आपली मते अवश्य कळवावीत.......प्रतिक्षेत...