Wednesday, July 3, 2013

संगिता....


     पत्नीबद्दल काही लिहिणे ही लेखनातील फार कसोटीची जागा असते.मामला नाजूक असतो. संवेदनशील असतो. बर्‍याचवेळा खोटेखोटे कौतुक करून वेळ मारून नेली जाते. "मी आज जो काही आहे तो तिच्यामुळे आहे", असे म्हणायची पद्धत पूर्वसुरींनी पाडून ठेवलेली असते. "तिने घर सांभाळले म्हणून मी हे सारे करू शकलो," अशा शब्दांत जे सांगितले जाते ते खरेही असते. तथापि ते खूप औपचारिक असते. अपुरे असते.
      लष्कराच्या भाकरी भाजणारे आम्ही भाषणाळू "वाणी समाजाचे" नवरेलोक बाहेर जोरदार राणा भीमदेवी भाषणे ठोकू, पण बायकोच्या अपार काबाडकष्टाचे, तिच्या अजोड मेहनतीचे वर्णन करायची वेळ आली की आम्हाला शब्दच सापडत नाहीत. ते कुठे पळून जातात ते काही समजत नाही. बायको समविचारी असेल, समर्थपणे घर उभे करणारी असेल, सामाजिक कामांबद्दल तिची कूरकूर नसेल उलट तिला त्याचे कौतुकच असेल तर त्यामुळे किती उर्जा मिळते, ती कृतज्ञता  नेमक्या शब्दात व्यक्त करणे सोपे नाही.
आमचा आंतरजातीय प्रेमविवाह.लग्न झाले तेव्हा संगिता शिकत होती. मी टेल्कोत पूर्णवेळ नोकरी करून विद्यापिठात शिकत होतो.त्याचवेळी सामाजिक चळवळीत गर्क होतो.लेखन,मोर्चे,भाषणे सारे कसे जोषात होते.नाना उद्योग चालू असायचे. स्वत:च्या आजच्या या धडपडीचे/ यशाचे आणि  पुरस्कारांचे श्रेय संगिताला मन:पुर्वक देताना असे असंख्य प्रसंग आठवतात.
     सुमारे २० वर्षांपुर्वीची गोष्ट आहे. पुण्यातील गंजपेठ परिसरातील महात्मा फुले यांच्या राहत्या घराची अतिशय दुरावस्था झालेली होती. २०वर्षे अनेक प्रयत्न करूनही फक्त कोरड्या आश्वासनापलीकडे काहीही घडत नव्हते.शिवसेनेतून नुकतेच सत्ताधारी कांग्रेस पक्षात प्रवेश करून मंत्री झालेल्या छगन भुजबळ यांची मी फुलेवाड्याला भेट घडवून आणली. आणि चमत्कार झाला. वर्षानुवर्षे रखडलेल्या कामांना त्यांनी गती दिली. फुलेवाड्या्च्या परिसराचा कायापालट करून त्याचे "राष्ट्रीय स्मारक" विकसित करण्याच्या निर्धाराने ते कामाला लागले. पुण्यातील आम्हा मंडळींवर देखरेखीच्या आणि पुणे मनपा, जिल्हा प्रशासन आणि पुरातत्व विभाग यांच्या समन्वयाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. रात्रंदिवस काम चालू होते. राष्ट्रपती शंकर दयाळ शर्मा यांनी राष्ट्रार्पण समारंभाला यायचे मान्य केले होते. वेळ थोडा आणि कामे अनंत होती.
आमच्या मुलीचा, प्रमितीचा नुकताच जन्म झालेला होता.मी रात्रंदिवस वाड्यावर आणि कार्यक्रमाच्या धावपळीत अडकलेलो होतो. समारंभात राष्ट्रपतींच्या हस्ते माझ्या "महात्मा फुले :साहित्य और विचार" या ग्रंथाचे प्रकाशन व्हायचे होते. छपाईची लगीनघाई चालू होती. घरात संगिता आणि प्रमितीला मी वेळच देऊ शकत नव्हतो. एके दिवशी दुपारी मुलीसाठी दूध आणायला संगिता स्वयंपाकघरात चाललेली असताना ओल्या फरशीवरून तिची स्लीपर घसरली आणि आणि ती पडली. तिच्या मांडीचे हाड मोडल्याने तिला उठताही येत नव्हते.खूप कळा येत होत्या. घरात मदतीसाठी कोणीही नव्हते. त्याकाळात मोबाईल नव्हते. सुदैवाने घरात फोन होता. आणि तो तिच्या हाताजवळच होता.तिने आमचे फ‘मिली डा‘क्टर संभूस यांना फोन केला.त्यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तातडीने धाव घेतली. आमच्या घराची एक किल्ली शेजार्‍यांकडॆ असायची. त्यांच्याकडून ती घेवून डा‘क्टरांनी फ्ल‘टचा दरवाजा उघडला. अपघात खूप गंभीर होता. त्यांनी तातडीने रूग्णवाहीका मागवली आणि संगिताला दवाखान्यात नेले. मांडीच्या हाडाचा चुरा झालेला होता. तात्काळ उपचार सुरू झाले. घटना घडल्यापासून पुढे २४ तास झाले तरी मला याचा पत्ताच नव्हता.
  प्रमिती ३ महिन्यांचीही नव्हती. स्कूटरवरून तिला संगिताकडे दूध प्यायला दवाखान्यात नेणे आणणे फार त्रासदायक होते. दवाखना छोटा असल्याने तेथे बाळाला ठेवण्याची सोयही नव्हती. या काळात संगिता शारिरीक वेदना,एकटेपणा,प्रमितीची उपासमार  या सार्‍या मानसिक कळा सोशित होती.मला पेशंटकडे आणि बाळाकडे बघायला वेळच नव्ह्ता.
राष्ट्रपतींचा फुलेवाड्याचा कार्यक्रम होईपर्यंत सुमारे आठवडाभर मी बाहेरच होतो.कार्यक्रम डोळ्याचे पारणे फेडणारा झाला.
   संगिताची फार मोठी शस्त्रक्रिया करावी लागली.आजाराचे निदान झालेच नाही. साधे पडल्याचे निमित्त होऊन हाडाचा चुरा कसा झला याचा उलगडा डा‘क्टरांना झालाच नाही.दरम्यान पुढे लवकरच आणखी दोन वेळा हाडे मोडण्याची  पुनरावृती झाली. हाडांची शस्त्रक्रिया आधीच तापदायक, सक्तीची बेडरेस्ट, घरात लहान बाळ, आणि या सगळ्या काळात मदतीसाठी नवर्‍याचा घरात पत्ता नाही, असे दिवस संगिताने कसे काढले ते तिचे तिला माहित.
   मी सामाजिक चळवळीचे काम, टेल्कोची नोकरी आणि लेखन यात व्यस्त होतो. जंगजंग पछाडूनही आजाराचे कारण मात्र समजत नव्हते. सुप्रसिद्ध अस्थीरोगतज्ञ डा‘. नारायणराव कर्णे यांनी देशविदेशातील तज्ञांचा सल्ला घेऊन शेवटी आम्हाला मुंबईला के.ई.एम.मध्ये डा‘.मेनन आणि डा‘.रवी बापट यांच्याकडे पाठवले. बापटसरांनी मात्र हाडे सतत मोडण्याचे कारण तात्काळ शोधून काढले आणि शस्त्रक्रिया करून संगिताला या आजारातून बरे केले.
    डा‘.रवी बापट माझ्या पुस्तकांचे/ साहित्याचे वाचक होते. त्यांच्याकडून माझ्या लेखनाचे कौतुक ऎकताना संगिताचा माझ्यावरचा आजारपणातला राग काहीसा निवळला असावा....

                                                                                                                            क्रमश:......