Friday, August 2, 2013

{ माणूस साहित्य संमेलन} माणूस शोधण्याचा नाद अर्नेस्ट हेमिंग्वे या नोबेल विजेत्या प्रतिभावंत लेखकाने "दि ओल्ड म‘न एंड दि सी" या कादंबरीत एका कोळ्याच्या जिद्दीची, जिजीगिषु वृतीची,योद्धेपणाची विलक्षण थरारक कथा चित्रित केली आहे.माणसाच्या जगण्याची प्रेरणा किती चिवट असते हे सांगणारी ही  विलक्षण कलाकृती आहे. ही कादंबरी ही जागतिक साहित्यातील श्रेष्ट कलाकृती मानली जाते. पण याच हेमिंग्वेने पुढे निराशेपोटी आत्महत्त्या करावी हे काय आहे? हे  साने गुरूजींची "शामची आई" हा भारतीय साहित्याचा अमोल ठेवा. एका झुंजार आईची ही मनस्वी कहाणी. गुरूजींची सगळीच साहित्यसंपदा श्रेष्ठ दर्जाची. भारतीय मन आणि मानसिकता चिमटीत पकडून उलगडवून दाखवणारी.पण अशा गुरूजींनीही आत्महत्त्या करावी हे कोडे कसे सोडवायचे?
माणूस हे या विश्वातील एक अजब रसायन आहे. या जगात ७५० कोटी माणसे राहतात.प्रत्येक जण स्वतंत्र नमुना आहे. अगदी स्पेशल. एकासारखी  दुसरी व्यक्ती म्हणून सापडायची नाही.जुळे बहिणभाऊसुद्धा अगदी सेम टू सेम नसतातच. माणसाला अमर किंवा अजरामर होण्याची अनिवार हौस असते.जगण्याची अपार ओढ, मृत्यूची सतत भिती, निसर्गाशी टक्कर घेण्याची जिद्द,अदम्य इच्छाशक्ती, इरसालपणा,बेरकीपणा, बेडरपणा ही माणसाची अशी काही खास वैशिष्टे होत. जगातील तमाम  सगळे तत्वज्ञ, साहित्यिक, कलावंत व बुद्धीवंत हे सदैव माणसाच्या शोधात गुंतलेले असतात. माणसाचा शोध हेच तर कोणत्याही कलेचे प्रयोजन असते. माणूस जेव्हढा सापडला असे वाटते त्यापेक्षा न सापडलेला भाग अफाट असतो. ज्यादिवशी माणूस संपुर्ण सापडेल त्यादिवशी सगळे साहित्य, सगळ्या कला संपुष्टात येतील.माणूस हा प्राणी कसा आहे याबद्दल एखादे विधान करावयाचे झाले तर "माणसाबद्दल अंतिम विधान करणे शक्य नाही." असेच फारतर  करावे लागेल.

माणूस या कादंबरीत मनोहर तल्हार यांनी सायकलरिक्षा चालवणार्‍या शंकरच्या जगण्याचे अनेक पदर समर्थपणे टिपलेत. " आणि माणसाचा मुडदा पडला" मध्ये रामानंद सागर यांनी भारत पाकिस्तान फाळणीच्या काळातील भीषण रक्तपात, मानवी क्रौर्य आणि माणसाचा हिडीस चेहरा  चित्रीत केलाय. "जेव्हा माणूस जागा होतो" ही गोदाताई परूळेकरांची आत्मकथा म्हणजे आदिवासीतला माणूस जागा करण्याच्या प्रयत्नांची झपाटून टाकणारी चित्तरकथा.
खरं म्हणजे जगातली प्रत्येक श्रेष्ठ कलाकृती ही माणसातल्या गुढगहिर्‍या, रसरसत्या माणूसपणाचा वेध घेण्याचा आपापल्यापरिने केलेला प्रयास असतो.माणसाचा सगळा प्रवास हा सुमारे ६० लक्ष वर्षांचा आहे.केनिया आणि टांझानियाच्या प्रदेशात माणसाचे पुर्वज राहत होते.एप वानरापासून उत्कांती होऊन आजच्या आधुनिक मानवापर्यंतचा त्याचा प्रवास थक्क करणारा आहे.चार पायावर चालणारा हा प्राणी पुढे ताठ कण्यामुळे पुढच्या पायांचा वापर हात म्हणून करायला लागला. तो दोन पायावर चालायला लागला. त्याच्या मेंदूच्या असाधारण विकासामुळे आणि त्याच्या हाताच्या जादूई अंगठ्यामुळे त्याने जगण्यात आरपार क्रांती घडवून आणली. शिकारी प्राण्यांनी खावून टाकलेल्या शिकारीवर उदरनिर्वाह करणारा हा माणूस आगीच्या, चाकाच्या,शेतीच्या आणि अशाच अगणित शोधांनी समृद्ध होत गेला. औद्योगिकीकरण आणि जागतिकीकरणाच्या टप्प्यांवर मुबलक सोयीसुविधांनी सुखासीन बनला.टेलीफोन ,मोबाईल अशी संवादाची साधने वाढली पण स्वत:शी आणि जगाशी त्याचा संवाद तुटत गेला.शाश्वत विकासाची कास धरण्याऎवजी निसर्गाला ओरबाडून विकासाचा त्याने उच्छाद मांडला.दिवसेंदिवस वाढणारी शस्त्रास्त्रस्पर्धा, युद्धखोरी, चंगळवाद, मानवी क्रौर्य, रक्तपात, मुल्यांचा र्‍हास आणि अमाप हिंसाचार यामुळे माणूस सुसंस्कृत होतोय की विकृत हेच समजेनासे झालेय.
मानवी प्रवासाचे सार काढायचे झाले तर पराकोटीचा स्वार्थ आणि स्वार्थत्याग यांच्या झगड्यात माणसाची ओढाताण होत आलेली आहे. माणूस लबाड असतो. माणूस चोर असतो. माणूस गुन्हेगार असतो.संस्कार,शिक्षण आणि अनुभवाने तो बदलतो. जिथे हितसंबंध आडवे येतात तिथे केवळ प्रार्थनेने तो बदलत नाही. तिथे संघर्ष अपरिहार्य असतो.आणि कायद्याचा दंडुकाही गरजेचा असतो. पण केवळ कायद्याच्या किंवा शिक्षेच्या धाकाने त्याच्यात परिवर्तन घडवून आणता येत नाही. तो असा सहजासहजी बदलतच नाही.
एका राजाने आपल्या राज्यात चोरी करण्याला कायमचा आळा घालण्याच्या हेतूने खिसेकापूला फासीची शिक्षा देण्याचा कायदा केला.एका चोराला त्याचा गुन्हा सिद्ध झाल्यानंतर भर चौकात जाहीर फासावर लटकावण्यात आले. हा प्रकार बघण्यासाठी हजारो नागरिक उपस्थित राहतील आणि बोध घेतील अशी व्यवस्था करण्यात आली होती. कार्यक्रम संपल्यानंतर  त्या गर्दीचा फायदा घेवून सहा जणांचे खिसे कापले गेल्याच्या तक्रारी पोलीसांकडे दाखल झाल्या.माणूस अगम्य आहे. तो सापडणे सोपे नाहीच मुळी.एका कवीने म्हटले आहे,"सर, काल तुम्ही वर्गात ज्यांचं नाव इतिहासात अजरामर झालंय असं म्हणालात त्यांचं नाव काय होतं हो?" तेव्हा अजरामर व्हायचे सोडा आजचा दिवस सुखात आणि नेकीने जगूया. वर्तमानात जगूया. स्वत:चे असे अस्सल जगूया.यासाठी अशा विलक्षण माणसाचा शोध घेणार्‍या साहित्य संमेलनाचे आयोजन अक्षर मानव संस्थेतर्फे ख्यातनाम साहित्यिक राजन खान यांनी पाचगणीला नुकतेच केले होते. अनौपचारिकता हा या संमेलनाचा सगळ्यात लोभस पैलू.या संमेलनाला अध्यक्ष, उद्घाटक, मानधन आणि प्रवासखर्च देवून बोलावलेले नियोजित वक्ते, निमंत्रित मान्यवर असे काही नसतेच मुळी.कोणतीही नियोजित कार्यक्रम पत्रिका नसते. आता यानंतर कोण बोलणार आहे हे कोणालाही माहित नसते.यावेळचा विषय होता "माणूस."  तीन दिवस तीन रात्री शंभर-सव्वाशे साहित्यिक आणि साहित्यप्रेमी रसिक स्वखर्चाने पाचगणीला एकत्र जमतात.पुर्णवेळ उपस्थित  राहणे, सगळ्यांचे ऎकणे, हा या संमेलनाचा नियमच आहे.आपले बोलून झाले की कल्टी मारणारे "वैश्विक साहित्यिक" इथे नसतात. साहित्याच्या धोधो पावसात सारेच चिंब भिजतात.

माणसाचा सारा प्रवास अनेक गुंत्यासह चालूय.मुल्यांची पडझड असली तरी  पण तो भलेपणाकडून भलेपणाकडे चालुय यात शंका नाही.
या संमेलनाला कोणतेही शुल्क आकारले जात नाही.अक्षर मानवतर्फे सगळा निवास भोजनादी खर्च केला जातो. यावर्षी राजन खान, दीनानाथ मनोहर, किशोर पाठक, दिलीप पांढरपट्टे,हरीश सदानी, सतिश देसाई,हयात पठाण, भरत यादव, प्रा.वृषाली मगदूम, प्रा.शमशुद्दीन तांबोळी, सुनिता अरळीकर, डा.हेमंत गायकवाड, शरद लांजेवार,लिला शहा, श्रीकांत उमरीकर,राजेंद्र अत्रे,राजाराम कानतोडॆ, नरेंद्र माहुरथळे, वासंती देशपांडे, व्यंकटेश कुलकर्णी, प्रा.अजित मगदूम,  प्रा.निलोफर शेख,सचिन अपसिंगकर, अशोक थोरात,रविंद्र मोकाशी,प्रा.बेनझीर तांबोळी, दिलीप अरळीकर आणि सुरेश खोपडे आदिंनी आपल्याला भेटलेली वा उलगडलेली माणसे उपस्थितांपुढे सादर केली. त्यांनी माणसाविषयीचे आपले चिंतन आणि अस्सल अनुभव मांडले. त्यांची तळमळ, संवादाची आस आणि त्यानंतर प्रत्येक सत्रात झडझडून होणारी चर्चा यांनी मजा आला.सगळी नाटके करता येतात. तळमळीचे नाटक करता येत नाही. या संमेलनात दिसलेली संवादातली तळमळ फार लोभस होती. अस्सल होती. ती आयात करता येत नाही.पाचगणीचा निसर्ग, धुवांधार पाऊस आणि या बहारदार गप्पा, जगणे सुंदर करण्यासाठी आणखी काय हवे?

.......................................................................................