Saturday, March 15, 2014

मराठी भाषा अभिजातच…

Kalamnaama,
http://kalamnaama.com/marathi-bhasha-abhijatach/....
By कलमनामा on March 9, 2014
feature size
दहा वर्षांपूर्वी केंद्र सरकारने तामीळ भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला. त्यानंतर संस्कृत, तेलगु, कन्नड आणि मल्याळम् या भाषांनी हा दर्जा पटकावला. गेल्या आठवड्यात उडीयाने ही मान्यता मिळवली. त्यामुळे मराठीचं काय झालं हा प्रश्न विचारला जाऊ लागला. ‘अभिजात मराठी समितीला मायमराठीचं प्राचीनत्त्व केंद्रापुढे मांडता आलेलं नाही,’ ‘केंद्र सरकारच्या भाषा समितीने मराठी भाषेचं अभिजातपण स्वीकारलं नाही’ अशा अफवा पसरवल्या जाऊ लागल्या. खरं तर महाराष्ट्र शासनाच्या अभिजात मराठी भाषा समितीने जुलै २०१३ मध्येच मराठीच्या प्राचीनत्त्वाचे असंख्य पुरावे मराठी अहवालातून केंद्राला सादर केले असून या अहवालाचा इंग्रजी अनुवादही समितीने नोव्हेंबर २०१३ मध्ये ग्रंथरूपाने सादर केलेला आहे. केंद्रीय पातळीवरील तज्ज्ञांच्या तो विचाराधीन असून फार लवकरच मराठीला अभिजात दर्जा दिला जाईल याची आम्हाला संपूर्ण खात्री आहे.
नामदेव, ज्ञानेश्वर, तुकाराम, महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, सानेगुरुजी, लक्ष्मीबाई टिळक, मालती बेडेकर, ताराबाई शिंदे, सावित्रीबाई फुले, गडकरी, आगरकर, टिळक, रानडे, लोकहितवादी, उद्धव शेळके, नारायण सुर्वे, शिवाजी सावंत, पुल, अत्रे, चिंवी, नामदेव ढसाळ, बाबूराव बागुल, विजय तेंडूलकर, विंदा, कुसुमाग्रज, खांडेकर यांच्या मराठीचं श्रेष्ठत्व स्वयंभू आहे.
या विश्वात खूप जैवविविधता आहे. माणूस हा विचारशील प्राणी आहे. अर्थातच प्रत्येक माणूस आपल्या भाषेतून विचार करतो. भाषा ही माणसांची अस्मिता नि एकप्रकारचं ओळखपत्र असतं. आपापल्या मायबोलीचा प्रत्येकाला अभिमान असतो. माणूस भाषेच्या माध्यमातून ज्ञाननिर्मिती करतो. साहित्य, विचार, तत्त्वज्ञान यांच्याद्वारे संस्कृतीची जनुकं एका पिढीकडून दुसर्या पिढीकडे वाहून नेण्याचं मोलाचं काम होत असतं. संशोधक असं सांगतात की लक्षावधी वर्षांच्या मानवी प्रवासात सुमारे ७० हजार वर्षांपूर्वी माणसाने भाषा पहिल्यांदा जन्माला घातली. पुढे जगभरात हजारो भाषा निर्माण झाल्या. आज जगभरात प्रचंड मोठी भाषक विविधता असून तिचं जतन करण्याची गरज आहे. जगात आज छोट्यामोठ्या २० हजार भाषा असून त्यातल्या मोठ्या प्रमाणात बोलल्या जाणार्या भाषांची संख्या सुमारे २००० आहे. त्यातल्या ३० टक्के भाषा एकट्या भारतात आहेत. १९०७ साली ग्रियरसनच्या नेतृत्वाखाली पहिलं भारतीय भाषा सर्वेक्षण झालं. २०१३ साली गणेश देवी यांच्या पुढाकाराने नवं सर्वेक्षण सुरू झालेलं आहे.
असं असताना आता गरज आहे ती मराठी माणसांनी आपला ऐतिहासिक न्यूनगंड आणि भाषक करंटेपणा झटकून मराठीचं लॉबिंग आणि मार्केटिंग करण्याची. बारा कोटी लेकरं एकमुखाने मराठीच्या बाजूने बोलू लागली तर मराठीला यापासून जगातली कोणतीही शक्ती रोखू शकणार नाही. अर्थात मराठी माणसांची अभिरूची इतकी संपन्न आहे की मराठीला वेगळ्या विरोधकांची गरजच नाही. अमृतातेही पैजा जिंकणारी मराठी ही जगातली दहाव्या क्रमांकाची भाषा आहे. मराठी ही ज्ञानभाषा आणि महानुभवांची धर्मभाषा आहे. मराठी मातृभाषा असणार्या सातवाहन आणि मराठे यांचं राज्य भारतभर तर होतंच पण पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानावरही मराठीभाषेची पताका फडकत होती. मराठी बोलणारे लोक आज देशाच्या ३६ ही राज्यं आणि प्रदेशात आणि जगातल्या १०० देशांमध्ये महत्त्वाच्या पदांवर कार्यरत आहेत. ही फक्त एका प्रांताची भाषा नसून, ती महत्त्वाची राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय भाषा आहे. मराठीत दरवर्षी सुमारे अडीच हजार पुस्तकं प्रकाशित होतात. कोश वाङमयाच्या बाबतीत मराठी जगातली दुसरी समृद्ध भाषा आहे. पाचशे दिवाळी अंक निघतात आणि छोटीमोठी सुमारे दोनशे पन्नास साहित्य संमेलनं होतात. नामवंत खाजगी प्रकाशन संस्था आणि सरकारी प्रकाशनं यांची वार्षिक उलाढाल आणि पाठ्यपुस्तकं, धार्मिक, ललित आणि वैचारिक ग्रंथ यांची एकत्रित बाजारपेठ सुमारे अडीचशे कोटींपर्यंत आहे. बालभारती ही जगातील सर्वात मोठी प्रकाशन संस्था असून ती दरवर्षी १९ कोटी पुस्तकं छापते. देशातील एकूण ग्रंथालयांपैकी २५ टक्के ग्रंथालयं एकट्या महाराष्ट्रात आहेत. लोकराज्य हे भारतातलं नंबर एकचं मासिक आहे.
अभिजात भाषा म्हणजे अभिजनांची भाषा किंवा उच्चवर्णियांची तथा उच्च कुलीणांची भाषा असा भ्रम आपण आजवर जोपासत आलो आहोत. अभिजाततेचा सर्वाधिक महत्त्वाचा निकष आहे, भाषेची आणि साहित्याची श्रेष्ठता. भाषेचं वय सांगणारे लिखित दस्तावेज दीड हजार वर्षांचे असावेत, भाषिक आणि वाङमयीन परंपरा स्वतंत्र आणि स्वयंभू असावी, प्राचीन भाषा आणि तिचं आधुनिक रूप यांच्यात खंड असला तरी त्यात नातं असावं हे उर्वरित निकषही मराठी पूर्ण करते.
मराठी ही संस्कृतोद्भव भाषा नाही. ती संस्कृतपेक्षाही जुनी आहे हे १८८५ सालीच राजारामशास्त्री भागवत यांनी दाखवून दिलेलं आहे. श्रीधर व्यंकटेश केतकर, ल.रा. पांगारकर, शं.गो. तुळपुळे, अन फेल्डहाऊस, वि.भि. कोलते आदींनी मराठीचं वय दीड हजार वर्षांपेक्षा जास्त असल्याचे असंख्य पुरावे दिलेले आहेत. ज्ञानेश्वरी, लिळाचरित्र, विवेकसिंधू हे मराठीतले आद्य ग्रंथ आहेत असं आम्ही अडाणीपणाने सांगतो. एवढे श्रेष्ठ ग्रंथ बालवयात कोणतीही भाषा कशी प्रसवू शकेल? गाथा सप्तसती हा दोन हजार वर्षांपूर्वीचा ग्रंथ हा मराठीतला आद्यग्रंथ आहे. एक होता कावळा आणि एक होती चिमणी. चिमणीचं घर होतं मेणाचं… प्रत्येक मराठी घरांत सांगितली जाणारी ही गोष्ट. लिळाचरित्रात आलेली असली तरी त्यापूर्वी किमान हजार वर्षं ती लोकपरंपरेत होती. तमिळ भाषेत संगम साहित्य हे अत्यंत प्रसिद्ध आहे. त्याचा काळ सुमारे २६०० ते २३०० असा आहे. या साहित्यातही मराठी भाषक लोकांचा उल्लेख आहे. गोदावरी नदीवर धरण बांधण्यासाठी जगभरातून तंत्रज्ञ आले. त्यात मराठीत बोलणारे गवंडी कामात अतिशय प्रवीण आहेत, असं मराठी लोकांबद्दलचं वर्णन सापडतं. सातवाहन काळातील एक शिलालेख जुन्नर येथील नाणेघाटात सापडला आहे. २२२० वर्षापूर्वींच्या ब्राह्मी लिपीतील या शिलालेखात ‘महारठीनो’ असा उल्लेख आहे.
विनयपिटक या पाली भाषेतील बौद्ध धर्मग्रंथात तसंच दिपवंश आणि महावंश या श्रीलंकेतील सिंहली ग्रंथात महारट्ठचा उल्लेख सापडतो. दुसर्या शतकात वररूचीने प्राकृतप्रकाश हा व्याकरण ग्रंथ लिहिला. पैशाची, शौरसेनी, मगधी, पाली, महाराष्ट्री या प्रमुख प्राकृत भाषा असून, या सर्वांना मराठीचे नियम लागू पडतात, असा नियम त्यांनी सांगितला आहे. जम्मू-काश्मीरच्या गुणाढ्य याने बृहतकथा हा ग्रंथ पैशाची भाषेमध्ये लिहिला. तो मुळचा वत्सगुल्म म्हणजे वाशिमचा होता. त्यात तो मराठीचा मुक्तहस्ते वापर करतो. हेमचंद्र हा व्याकरणकारही मराठीचे अनेक दाखले देतो. सातव्या शतकातले हरिभद्र आणि उद्योत्तन सुरी हे मराठीचे अभिजात साहित्यकार आहेत. संस्कृत कवी शुद्रक, महाकवी कालिदास यांनीही मराठीचा वापर केलेला आहे. महाभारतात असंख्य मराठी शब्द आहेत. यज्ञमंडपात मराठीतून बोलायला बंदी घालण्यात आलेली होती याचाच अर्थ हे पंडित खाजगीत मराठीत बोलत असत, हे स्पष्ट आहे.
हॉर्वड विद्यापीठातील मिखाईल विट्झेल यांनी ट्रेसिंग द वैदिक डायलेक्ट्स या ग्रंथात संस्कृत ही वैदिकपूर्व बोलीभाषेतून जन्माला आली असल्याचं दाखवलं आहे. मराठी, अपभ्रंश आणि महाराष्ट्री प्राकृत या तीन वेगळ्या भाषा नसून एकाच भाषेची ती तीन वेगवेगळी नावं असल्याचे शेकडो पुरावे आहेत. मराठी (महारठी, महाराष्ट्री)चा जन्मही अशाच एका वैदिकपूर्व बोलीतून झालेला आहे. यावरून मराठीची आई आणि संस्कृतची आजी या बहिणी होत्या असं दिसतं. मराठीने संस्कृतकडून जरूर घेतलं पण दामदुप्पट परतही केलं. आजच्या मराठीवर इतर प्राकृत भाषा, पर्शियन आणि द्राविडीभाषा यांचा प्रभाव आहे. तथापि मराठीचे अस्सल जे आहे ते जगातल्या इतर कोणत्याही भाषेत नाही. म्हणूनच संत एकनाथ विचारतात, ‘संस्कृतवाणी देवे केली मग प्राकृत काय चोरापासून झाली?’
समन्वयक – अभिजात मराठी भाषा समिती, महा.शासन
 प्रा. हरी नरके

No comments:

Post a Comment