Friday, March 7, 2014

मराठीच्या विकासासाठी हवी पंचवार्षिक योजना

http://epaper3.esakal.com/7Mar2014/Normal/PuneCity/page5.htm...
Sakal, Pune, Pg 05 Dt 07 March 2014
http://online3.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=4820133567322463867&SectionId=10&SectionName=पुणे&NewsDate=20140307&Provider=-+सकाळ+वृत्तसेवा&NewsTitle=मराठीच्या+विकासासाठी+हवी+पंचवार्षिक+योजना
मुख्यपान » पुणे » बातम्या
मराठीच्या विकासासाठी हवी पंचवार्षिक योजना
- - सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 मार्च 2014 - 01:15 AM IST
Tags: Pune, Marathi, Culture, Language
भाषा धोरणाच्या लेखनाला प्रारंभ; मे महिन्यात सरकारकडे करणार सुपूर्द
पुणे - मराठी ही सर्वांत जुनी भाषा आहे, त्यामुळे बदलत्या काळानुसार भाषेसमोर उभी राहणारी आव्हाने ओळखून तिचा मुकाबला कसा करता येईल, हे ठरविण्यासाठी आणि मराठीचा विकास घडवून आणण्यासाठी सरकारने पंचवार्षिक योजना लागू करावी, अशी सूचना मराठी भाषा धोरणात नमूद करण्यात आली आहे. याबरोबरच बंद पडणाऱ्या शाळांवरही धोरणात विशेष भर देण्यात आला आहे.

मराठी भाषेसाठी सरकारने पुढील 25 वर्षांत काय करायला हवे, हे ठरविण्यासाठी महाराष्ट्रात प्रथमच भाषा धोरण तयार होत आहे. हे धोरण तयार करण्याची जबाबदारी सरकारच्या मराठी भाषा सल्लागार समितीवर सोपविण्यात आली आहे. त्यानुसार समितीने राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी बैठका घेऊन सूचना जमा केल्या. त्यांचा विचार करून मसुदा लेखन करण्यासाठी उपसमितीचीही स्थापना करण्यात आली होती. या उपसमितीने नुकतेच मसुदा लेखनाचे काम हाती घेतले असून, त्यात मराठी शाळांवर भर देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मसुदा लेखनासाठी गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या बैठकीला डॉ. नागनाथ कोत्तापल्ले, दत्ता भगत, डॉ. माधवी वैद्य, विश्‍वनाथ शिंदे, हरी नरके, डॉ. विलास खोले यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. भाषेचा खरा विकास शिक्षणाच्या माध्यमातून होतो, त्यामुळे वेगवेगळ्या कारणांमुळे सध्या बंद पडत असलेल्या मराठी शाळांना घटनात्मक संरक्षण पुरवण्याची जबाबदारी सरकारने घ्यावी. त्यासाठी आवश्‍यक नियमांमध्ये बदल करावा, बोलीभाषांचे दस्तऐवज करून ठेवावेत, उत्तमोत्तम ग्रंथांचे अनुवाद करावेत, अशा सूचनांचा समावेश आहे. मसुदा लेखनाचे काम याच महिन्यात पूर्ण करून समितीसमोर ठेवले जाणार आहे. मे अखेरीस ते सरकारकडे सुपूर्द करण्याचे नियोजन आखण्यात आले आहे.