Sunday, March 23, 2014

Interview of Pramitee Narke

सकाळ, पुणे, रविवार दि. २३मार्च, २०१४, पान नं.४
"खर्‍या अर्थाने निर्भया"  --प्रमिती नरकेची मुलाखत

नराधमांनी फ्रंकाला बेदम मारलं.मुर्छितावस्थेत असताना तिला सिगारेटचे चटके दिले.तिच्या शरीरावर ठिकठिकाणी ब्लेडने वार केले अन अशा जखमी अर्धमेल्या अवस्थेत त्यांनी तिला रस्त्यावर फेकून दिलं...
गेल्या वर्षी देशभराला हलवून टाकणारं ’निर्भया’ प्रकरण याहून काय वेगळं होतं? फरक एव्हढाच होता की, "ऎका, बघा, ....हे घडलयं माझ्यासोबत...हे बदलू शकण्याची धमक आहे का तुमच्यात?" असा सवाल करत फ्रंका प्रत्येक प्रयोगात उभी राहत होती.
.......................................
"ही भुमिका म्हणजे माझ्यासाठी एक मोठं आव्हान होतं, प्रात्यक्षिक परीक्षेसाठी संहिता शोधताना फ्रंकाचं हे स्वगत-नाट्य हाती आलं आणि मी हादरूनच गेले.एकीकडे एक स्त्री म्हणून मी तिच्याशी कनेक्टही होत होते अन दुसरीकडे तिने हे कसं सहन केलं असेल, या विचांरांनी मला कुंठित केलं होतं...."
इटालियन नाटककार व अभिनेत्री फ्रंका रामे हिच्या "द रेप" या एकपात्री नाट्यप्रयोगाविषय़ी प्रमिती नरके सांगत होती...
आपल्या अनेक नाट्यकृतींनी इटलीचं सांस्कृतिक विश्व समृद्ध करणारी फ्रंका रामे. केवळ एक स्त्री म्हणूनच नव्हे, तर माणूस म्हणूनही एखाद्याचं आयुष्य अंतर्बाह्य हलवून टाकणार्‍या "द रेप "या नाट्यप्रयोगाने फ्रंकाला एका क्षणात जगभरात नेऊन पोचवलं. स्वत:वर झालेल्या बलात्काराच्या प्रसंगाचं अन त्या विदारक अनुभवाचं धडधडीत वर्णन तिनं केलं होतं.
स्त्री-हक्कांसाठी झगडणारी फ्रंका एक कार्यकर्ती - रंगकर्मीच होती. त्या वेळी वयाच्या पंचेचाळिशीत असलेल्या आणि एव्हाना कम्युनिस्ट विचारसरणी अंगीकारलेल्या फ्रंकावर फासिस्ट  विचारांनी पछाडलेल्या चार नराधमांनी सामुहिक बलात्कार केला.बलात्काराचं कारण काय..? तर फ्रंकाच्या टोकाच्या स्त्रीवादी व साम्यवादी विचारांना विरोध! राजकीय विचारांतून जन्मणार्‍या क्रौर्याची ही घृणास्पद पातळीच होती. फ्रंका मात्र उन्मळून नाही पडली. या घटनेच्या केवळ दोनच महिन्यांनंतर ती पुन्हा एकदा रंगमंचावर उभी राहिली. पूर्वीच्याच दिमाखात अन त्याच आत्मविश्वासानेही. यावेळी तिच्या नाटकाचा विषय होता "आंटी फासिझम".
नुकत्याच झालेल्या जागतिक महिलादिनाच्या पार्श्वभुमीवर प्रमितीने फ्रंकाचं "द रेप" पुणे विद्यापिठाच्या काही डिपार्टमेंटसमध्ये सादर केलं. उण्यापुर्‍या बारा मिनिटांच्या प्रमितीच्या सादरीकरणाने उपस्थितांना केवळ अस्वस्थच नाही केलं, तर अंतर्मुखही केलं. पुणे विद्यापिठाच्या ललित कला केंद्राची नाट्यशास्त्राची विद्यार्थिनी असणारी प्रमिती म्हणते, "आमच्या पिढीने अशा सामाजिक प्रश्नांवर बोलतं होण्याची आज गरज आहे. मला म्हणून जे शक्य आहे, ते मी या नाटकातून करतीय. पण प्रत्येकानेच सामाजिक वास्तवाकडॆ अन मुख्य म्हणजे त्यात बदल घडवण्याकडे एक जबाबदारी म्हणून पाहायला हवं."
"फ्रंका या संपूर्ण प्रयोगात कुठेही किंचाळत नाही, आक्रस्ताळी होत नाही. तरीही तिचं एकुण असणं प्रेक्षकांच्या अंगावर येतं. तिच्या लिखाणातली ती ताकद आहे, असं मला वाटतं,." असे प्रमिती सांगते. शांततेलाही कित्येकदा गहन अर्थ असतो.हा प्रयोग तेच दाखवून देतो. आयुष्य आपल्या तत्वांप्रमाणे जगलेली फ्रंका गेल्या वर्षी मे महिन्यात हे जग सोडून गेली. आज फ्रंका जरी आपल्यात नसली तरी तिच्या अनेक नाटकांतून आणि मुख्य म्हणजे तिच्या "द रेप" या आत्मानुभावातून ती आपल्यात तिच्या वेदना जागवते आहे. कधी अमूर्त रुपात, तर कधी प्रमितीसारख्या एखाद्या अभिनेत्रीच्या मूर्त रूपात... {या संहितेचं मराठी भाषांतर स्वत: प्रमितीनं केलेलं असून ती हा प्रयोग मराठी व इंग्रजी या दोन्ही भाषांतून सादर करते..}.
मुलाखतकार--- स्वप्नील जोगी
.........................................
SAKAL, PUNE, sunday 23 March, 2014 pg 04 Hi Friends...
http://epaper.esakal.com/sakal/23Mar2014/Normal/PuneCity/page4.htm...
Interview of Pramitee Narke about "The Rape" One Act Play

No comments:

Post a Comment