Friday, April 25, 2014

साहित्य संमेलनाची अध्यक्ष निवडणूक पध्दत रद्द करावी काय?


अ.भा.मराठी साहित्य संमेलनाध्यक्षांची निवड कशी करावी या वादग्रस्त प्रश्नाला दोन मजबूत बाजू आहेत आणि त्या दोन्ही बर्‍याचशा पटणार्‍याही आहेत.
दुसरीकडे या संमेलानापासून दूर राहणेच पसंद करणारेही बरेच आहेत. भालचंद्र नेमाडे, रंगनाथ पठारे, बाबूराव बागूल, नामदेव ढसाळ, आदींची त्याबाबत वेगळी मते होती, आहेत.
निवडणूक नकोच असे म्हणणारे असा युक्तीवाद करतात की, साहित्यिक हे असाधारण दर्जाचे प्रतिभावंत असल्याने त्यांना सर्वसामान्य जगाचे नियम लावू नयेत.ही निवडणूक लढवणे हे आजवर अनेकांना अपमानास्पद वाटल्याने, विंदा करंदीकर यांच्यासारखा मोठा कवी संमेलनाध्यक्ष झाला नाही.साने गुरुजी,चिं.वि.जोशी, तेंडुलकर, चित्रे, भाऊ पाध्ये, श्री.ना. पेंडशे, जी.ए., रा.चिं.ढेरे, मंगेश पाडगावकर, कुरूंदकर, उद्धव शेळके,
आदी या पध्दतीने अध्यक्षपदासाठी उत्सुक नव्हते/ नाहीत. हे पद सन्मानाने दिले जावे, त्यासाठी निवडणूक अर्ज भरणे, प्रचार करणे, मतदारांच्या भेटीला जाणे हे त्यांना खटकते.
या मुद्यातील तथ्य मान्य करूनही तो किती ताणायचा याचा विवेक करायला हवा. अलिकडेच अवघ्या ३०० मतदारांच्या हातात असलेल्या या निवडणुकीतील मतदार संख्या ११०० पर्यंत नेण्यात आली हे स्वागतार्ह आहे.यापुढचा टप्पा म्हणजे बारा कोटी मराठी भाषकांच्यातील किमान बारा हजार मतदारांना या प्रक्रियेत सामावून घेतले पाहिजे. ही निवडणुक प्रक्रिया पारदर्शी झाली पाहिजे. आजही काही साहित्य संस्थांचे पदाधिकारी त्यांच्या सगळ्या १७५ मतदारांना कोर्‍या मतपत्रिका आपल्याकडे जमा करायला सांगतात. ही निवडणुक जिंकणे ही बाब  महामंडळाच्या काही विद्यमान पदाधिकार्‍यांच्या हातचा "कौतुकास्पद" मळ झालेला आहे. मर्यादित आणि दावणीला बांधलेले मतदार यांच्यामुळे आज हे मालकलोक ठरवतील त्याला निवडून आणू शकतात किंवा पाडूही शकतात. त्यामुळे ही निवडणूक आता कळसुत्री बाहुल्यांचा खेळ झालेली आहे अशीही रास्त टिका होऊ लागली आहे. अशाप्रकारे या निवडणुक पध्दतीत अनेक दोष असले तरी बिनविरोध निवड हा मार्ग म्हणजे रोगापेक्षा इलाज भयंकर अशीच स्थिती होणार आहे. मूठभरांच्या हातात ही निर्णयप्रक्रिया देणे म्हणजे पुन्हा एकदा महामंडळाच्या श्रेष्टींच्या मर्जीवरच हे काम सोपवणे होणार आहे. ही लोकशाही आणि विकेंद्रीकरण विरोधी मानसिकता आहे. तिचे लाड करता कामा नये. ही विद्यमान पध्दत दुरूस्त जरूर करावी, मात्र रद्द करू नये. ही पध्दत कायम ठेवूनही सर्वानुमते किंवा सहमतीने एखाद्या मान्यवराची निवड झाली तर मात्र विरोध असायचे कारण नाही.तसे आजवर अनेकदा झालेलेही आहे.
याच निवडणूक पध्दतीने, कुसुमाग्रज, दुर्गाबाई, लक्ष्मणशास्त्री, अरूण साधू, गंगाधर गाडगीळ, वसंत बापट, नारायण सुर्वे, य.दि.फडके, गं.बा.सरदार, पु.ल., अत्रे, सावरकर, विश्राम बेडेकर, व्यंकटेश माडगूळकर आदी मान्यवर अध्यक्ष झालेत हे कसे विसरणार?
मंत्री, भेंडे, कर्णिक, फ.मुं. मेश्राम, खरात, कांबळे, शांताबाई, विजयाबाई, शेवाळकर, हातकणंगलेकर,बनहट्टी, इनामदार,विद्याधर गोखले, कोत्तापल्ले, पठाण, यादव हेही अर्थात याच मार्गाने अध्यक्ष झाले. याच वाटेवर इंदिराबाई, दया पवार, शिवाजी सावंत, बोरकर, आणि इतर अनेक पराभूतही झाले.
निवडणुकाच नकोत असे म्हणणारांना मग असेही विचारता येईल की,
साहित्यिकांना खरे म्हणजे असे कोणत्याच परिक्षेच्या रांगेतून यायला लावणे चूकच म्हटले पाहिजे. मी तर म्हणतो, त्यांना कोणत्याच रांगेत उभेही करायला नको. उदा. साहित्यिकांना बालवयात शाळेत जावे लागणे, बसच्या रांगेत उभे राहावे लागणे, अभ्यास करणे, परिक्षा देणे यातून सूट असली पाहिजे. त्यांना थेट पीएच.डी. किंवा डी.लिट. बालवयातच देण्यात आली पाहिजे.
साहित्यिकांना सार्वत्रिक निवडणुकीत, लग्नासाठी, नोकरीसाठी, शासकीय कर भरण्यासाठी, वाहतुकीच्या कोंडीमुळे होणार्‍या गर्दीत किंवा चौकातील सिग्नलसमोर असे कुठल्याच रांगेत उभे राहायला लागू नये.थांबायला लागू नये.अग्नीशामक बंब किंवा अम्ब्युलन्स याप्रमाणे त्यांना सिग्नलमधून सूट असायला हवी.
पुस्तके प्रकाशित करण्यासाठीही त्यांना प्रकाशकांच्या दारात जावे लागणे, पारितोषिकांसाठी अर्ज करावे लागणे, हे सारेच करण्याची तसदी का?
ते लिहितात हे जगावर असलेले मोठे उपकारच आहेत. ती सामान्य माणसे थोडीच असतात? त्यांना माणसासारखे राग-लोभ असे विकार नसतातच. त्यांना पोटही कुठे असते? ते कधीच खोटे बोलत नाहीत. राजकारण करीत नाहीत. ....

** साहित्यिकांचा योग्य तो आदर राखला जावा हे योग्यच आहे, पण लेखनाचा काळ सोडला तर तिही सामान्य माणसेच असतात हे विसरून चालणार नाही. त्यांनाही जगाचे सामान्य नियम लागू पडणारच.
----------------------

No comments:

Post a Comment