Monday, April 7, 2014

सूप गाजले: लोकमतमध्ये ब्लोगमधील नोंदीची दखल

सूप गाजले: लोकमतमध्ये ब्लोगमधील नोंदीची दखल
लोकमतचे मुंबईचे निवासी संपादक श्री. विनायक पात्रुडकर यांच्या लेखात उल्लेख
लोकमत, दि.०५ एप्रिल, २०१४

नात्यांमधल्या जिव्हाळय़ाचे वाजले सूप'

http://www.epaper.lokmat.com/epapermain.aspx?queryed=12&eddate=04%2f05%2f2014...
नात्यांमधल्या जिव्हाळय़ाचे वाजले सूप'...विनायक पात्रूडकर, लोकमत, दि. ५एप्रिल, २०१४
काही मित्रांनी ब्लॉगवर सूप' वाजले, या शब्दाचा नव्याने अर्थ कळल्याचे लिहिले आणि दिवसभर चिकन सूप आणि तेलकट बटाटेवडा याचीच चर्चा सुरू होती. राज ठाकरे यांनी डोंबिवलीच्या सभेत वैयक्तिक टीकेची जी पातळी गाठली, त्यावरून संवेदनशील आणि सुसंस्कृत मराठी मनाला नक्कीच वेदना झाल्या.
एका हाताने दिलेले दान दुसर्‍या हाताला कळता कामा नये, अशी आपली संस्कृती सांगते. इकडे निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर जो शिमगा सुरू आहे तो पाहता ठाकर्‍यांची भाऊबंदकी आणखी कोणती पातळी गाठणार, हाच प्रश्न शिल्लक राहिला आहे. म्हातारपणाची सेवा हे कर्तव्यच मानले जाते. प्रत्येकजण आपल्या घरातील ज्येष्ठांसाठी काही ना काही करत असतोच; पण त्याची वाच्यता जाहीरपणे करणे हे कृतघ्नपणाचे लक्षण मानले जाते. राज ठाकरेंनी वक्तृत्वशैलीचा गैरवापर करून बाळासाहेबांना दिलेले अन्न बाहेर काढले. त्यातून त्यांना काय संदेश द्यावयाचा होता? उद्धव ठाकरे बाळासाहेबांची नीट काळजी घेत नव्हते? त्यांची हेळसांड होत होती? की माझ्या पाठविलेल्या चिकन सूपमुळे ते ठणठणीत होते? राजकीय व्यासपीठावर या वैयक्तिक स्वरूपाच्या गोष्टींना किती महत्त्व द्यायला पाहिजे? मराठी जनता जेव्हा या गोष्टी ऐकते तेव्हा त्यांना या सूपात किंवा बटाटेवड्यात रस नसतो. विकासाच्या कोणत्या मुद्यांना हात घालता, याविषयी उत्सुकता असते. राज ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या शेवटच्या दिवसात जी मदत केली ती त्यांच्यातल्या रक्ताच्या नात्यामुळे. मनसेप्रमुख म्हणून ते चिकन सूप' पाठवत नव्हते. उद्धव ठाकरे यांना 'लीलावती'तून गाडी चालवत घरी आणले ते त्यांचा सख्खा चुलत भाऊ म्हणून.. मनसेप्रमुख म्हणून नव्हे, आणि बाळासाहेबांनीही राज ठाकरेंना फोन केला ते पुतण्या आणि घरातला कर्ता पुरुष म्हणून. तिथे राजकीय मुद्दा येतोच कुठे? ठाकरे कुटुंबातील वाद असे रस्त्यावरील चर्चेचा विषय होणे, हे मराठी माणसाला वेदनादायी आहेत. ठाकरे कुटुंबाकडे महाराष्ट्र आदराने पाहतो. त्यांच्या कर्तृत्वाची झालर सार्‍या मराठी मनावर कोरलेली आहे. त्यांच्या नातेसंबंधांचे असे धिंडवडे उडालेले पाहण्याची वेळ दुर्दैवाने आली आहे, तेही केवळ निवडणुकीतील मताधिक्य खेचण्यासाठी. बाळासाहेबांच्या शेवटच्या दिवसातले असे खाणे-पिणे बाहेर काढणे, तेही जाहीर सभेत, हा किळसवाणाच प्रकार म्हटला पाहिजे. शिवाय मी हा सवाल-जवाब सुरू ठेवणार, असे सांगत राज ठाकरेंनी आणखी खाणं-पिणं बाहेर काढणार, याचे जणू सूतोवाच केले, यामुळे मराठी माणसांपुढे काय प्रतिमा तयार झाली. उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांची नीट काळजी घेतली नाही की राज ठाकरेंनी अधिक चांगली काळजी घेतली असती? रक्ताची नाती जेव्हा उपकाराची भाषा बोलायला लागतात तेव्हा नात्यातला जिव्हाळा संपलेला असतो, उरलेला असतो तो व्यवहार. राज ठाकरेंना या व्यवहारावर मतांचा बाजार मांडायचा आहे, हेच यातून स्पष्ट होते. राजकीय मतभिन्नता आणि वैयक्तिक नातेसंबंध यांची योग्य सरमिसळ राज ठाकरेंनी घालायला हवी. त्यांच्या वक्तृत्वाचा परिणाम होणारी नवी पिढी मराठी माणसांमध्ये आहे, त्यामुळे त्यांच्यावर जबाबदारीही अधिक आहे. मतांच्या बाजारात नात्यांचा जिव्हाळा संपायला नको इतकी साधी भावना मराठी माणसांची आहे.
भाऊबंदकीचा इतिहास महाराष्ट्राला नवा नाही. तरीही नव्या विचारांच्या संवेदनशील तरुण पिढीला या वैयक्तिक हेवेदाव्यात, अहंकारात अजिबात रस नाही. त्यांना विकासाची दिशा देणारे नवे नेतृत्व हवे आहे. ठाकरे बंधूंकडे ते याच नजरेने पाहतात, याची जाणीव ठेवली तरी पुरे. 
विनायक पात्रुडकर
निवासी संपादक
लोकमत मुंबई

No comments:

Post a Comment