Sunday, May 25, 2014

गंभीर नी ज्ञानमय कार्यक्रम

अक्षर मानव या संस्थेचा "लेखन कार्यशाळा" हा मोलाचा उपक्रम आहे. दर महिन्याला एका रविवारी विविध क्षेत्रातील १०० ते १५० लोक एकत्र जमून एका वाड्मय प्रकारावर अकादेमिक चर्चा करतात. आधी दीडतास विषयाची मांडणी केली जाते. नंतरचा दीडतास चर्चा आणि संवादाचा असतो. पार मुंबई नी नगरपासून लोक येतात. अर्धा दिवस एकत्र घालवतात. साहित्यविश्वाची सफर करतात. यावेळी मला दिलेला विषय होता, "संशोधनपर लेखन, चरित्रपर लेखन- वैचारिक लेखन" आपल्याकडे "संशोधनपर लेखन, चरित्रपर लेखन- वैचारिक लेखन" याचे दालन अतिशय समृद्ध आहे. फुले-आंबेडकर,लोकहितवादी, टिळक, आगरकर,रानडे, राजारामशास्त्री भागवत, सर रा.गो.भांडारकर, राजवाडे, केतकर, भारतरत्न पां.वा.काणे, सावरकर,तर्कतीर्थ, शेजवलकर, गं.बा.सरदार, इरावतीबाई, घुर्ये, मिराशी, ते य.दि.फडके, धनंजय कीर, मे.पुं.रेगे, नरहर कुरूंदकर, खैरमोडे, पगडी, कोलते, बागूल, रा.चिं.ढेरे, शरद पाटील, रावसाहेब कसबे, ग.भा.मेहेंदळे, मोरे आदींनी या क्षेत्रात लक्षणीय कामगिरी केलेली आहे. तटस्थ, सत्यनिष्ट, साधार, सप्रमाण, तर्कशुद्ध, काटेकोर, तारतम्यबुद्धीचे लेखन करणे, दुषित पुर्वग्रहांपासून मुक्त राहणे, व्यक्तीगत नी जातीगत हितसंबंधावर मात करणे, कायम हार आणि प्रहार स्विकारण्याची तयारी ठेवणे, अजातशत्रू होण्याची आस बाळगण्याऎवजी भुमिका घेणे, लिंगभाव, वर्ग, धर्म, प्रांत, भाषा यांची दडपणे झुगारून निर्भीडपणे मांडणी करणे या संदर्भात वरील मंडळींचे योगदान अतिशय मोलाचे राहिलेले आहे. भारतीय समाजातील फुले-आंबेडकरवादी, मार्क्सवादी, गांधीवादी, सावरकरवादी {हिंदुत्ववादी} अशा विविध विचारधारा आणि त्यांच्या सामर्थ्य व मर्यादा यासंदर्भातील भान ठेवण्याची गरज असते. विभुतीपुजा, उदात्तीकरण, आरत्या ओवाळणे किंवा द्वेषबुद्धीने केवळ विकृतीकरण/मुर्तीभंजन करणे यापासून सावध राहण्याची गरज असते. चिकित्सा करताना निर्वैर वृत्ती हवी. उमदेपणा, खिलाडूपणाही हवा.पुराभिलेखागारातील दस्तावेज, ग्रंथालयतील विविध संदर्भग्रंथ, हस्तलिखित पोथ्या, शिलालेख, ताम्रपट यांचे पुराव्याचे दृष्टीने असलेले महत्व, अंतर्गत प्रमाणे, शिस्त आणि ज्ञाननिर्मितीची ओढ यांचे स्थान अशा विविध मुद्यांवर सखोल चर्चा झाली. आजच्या अस्मितेच्या राजकीय वातावरणात संशोधनपरलेखन करणे अवघड बनत चालल्याबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली.आज जातीयवादी शक्ती चढ्या सुरात, विकृत पद्धतीने करीत असलेले इतिहासाचे फेरलेखन घातक असल्याचे अधोरेखित करण्यात आले. कार्यक्रमाला दर्दी मंडळींची उत्तम उपस्थिती होती. या गंभीर नी ज्ञानमय कार्यक्रमात सहभागी करून घेतल्याबद्दल श्री.राजन खान व त्यांच्या सहकार्‍यांचे आभार.....
 

No comments:

Post a Comment