Tuesday, August 19, 2014

प्रगत नागरी संस्कृती

 ४५०० वर्षांपुर्वीचे

प्रगत नागरी संस्कृतीचे गौरवशाली अवशेष --
भारत देशाच्या प्राचीन विकसित संस्कृतीची केंद्रे असलेली हडप्पा आणि मोहेन-जो-दोडो ही शहरे फाळणीमुळे आता पाकिस्तानात गेलेली आहेत. मात्र त्याच काळातील आपला सर्वोच्च वारसा सांगणारी जी स्थळे उत्खननात मिळालेली आहेत, त्यातले एक म्हणजे "लोथल." अहमदाबादपासुन अवघ्या ८० किलोमीटरवर {राजकोट-अहमदाबाद हायवे वर} असलेले लोथल हे जगातले सर्वात प्राचीन बंदर असून तेथे अतिशय प्रगत नागरी संस्कृतीचे गौरवशाली अवशेष मिळालेले आहेत.  हे बंदर सुमारे ४५०० वर्षांपुर्वीचे आहे. येथे मिळालेले शेकडो घरांचे अवशेष, सोन्याचे-मोत्यांचे दागिने, मातीची भांडी, त्यावरील रंगकाम, त्यात कोरलेली गोष्ट, ज्यात माठातील पाणी पिण्यासाठी त्यात खडे टाकून पाण्याची पातळी उंचावणारा कावळा दिसतोय, असंख्य प्रकारची हत्यारे, त्यावरील कलाकुसर, मुद्रा, नाणी, आदी पाहून हे लक्षात येते की, ही संस्कृती जगातील सर्वात प्रगत संस्कृती होती. येथील घरांत असलेली सांडपाण्याची व्यवस्था, न्हाणी घरे,  बांधकामासाठी वापरलेल्या मजबूत विटा, स्मशानभुमी,  या सार्‍यांवरून ही मंडळी काळाच्या खुप पुढे होती हे सिद्ध होते....ह्या नगराला भेट देताना आपल्या पुर्वजांच्या आधुनिक दृष्टीचा आणि कर्तबगारीचा खरोखरच सार्थ अभिमान वाटतो...लोथलची ही अविस्मरणीय भेट...