Sunday, September 7, 2014

भलेपणाचा उत्सव : फॅमिली डॉक्‍टर‘ निरगुडकरांचा षष्ठ्यब्दीपूर्तीनिमित्त सत्कार सोहळा


आमचे फॅमिली डॉक्‍टर‘ हिरेन निरगुडकर यांच्या वयाला ६० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल आज त्यांचा टिळक स्मारक मंदीरात सत्कार सोहळा संपन्न झाला.डो‘.निरगुडकर म्हणजे आरपार भला माणूस. एक समर्पित वैद्य. पुण्याच्या कसबा पेठेत जन्मलेला एका शिक्षकाचा हा मुलगा. त्यांनी १९७५ साली वैद्यकीय सेवा सुरू केली ती पुणे शहराऎवजी वडगाव आणि पुण्याच्या ग्रामीण भागात.सायकलवरून जायचे. गोसावी, लमाण अशा भटक्यांना उपचार द्यायचे. फी १ रुपया. आजही त्यांची फी अवघी ५० रूपये.हमखास गुण येणारच.  गेले ३९ वर्षे डो‘क्टर समर्पित वृत्तीने अहोरात्र कार्यरत आहेत. अचुक रोगनिदान, नेमके औषधोपचार आणि रुग्णांप्रति अपार स्नेहभावना. आजही त्यांची आर्थिक प्राप्ती फारशी नसली तरी हजारो माणसं रक्ताच्या नात्या इतक्याच आत्मियतेने त्यांनी जोडलेली.

टिळक स्मारक मंदीर खचाखच भरलेले. अनेक लोक उभे. सकाळी ९.३० वाजताच लोक आलेले.कार्यक्रम सुमारे सव्वातीन तास चालला. एकही माणुस उठून गेला नाही. डो‘क्टरांची हीच खरी कमाई. डो‘क्टर खूप भावपूर्ण बोलले.

"ऎशी कळवळ्याची जाती! करी लाभाविना प्रिती!" याचे चालताबोलते उदाहरण म्हणजे डो‘.निरगुडकर. कार्यक्रमाची सुरूवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून झाली.

सर्वपक्षीय मान्यवर मंचावर होते. खासदार रजनी पाटील, आमदार गिरिष बापट, आमदार माधुरी मिसाळ, आमदार भीमराव तापकीर, अंकुश काकडे, माजी आमदार कुमार गोसावी, माजी खासदार अशोक मोहोळ, माजी खासदार प्रदीप रावत, माजी उपमहापौर दिलीप बराटे, डो‘.कैलास कमोद आणि इतर अनेक आवर्जून उपस्थित राहिलेले.

सत्कार सोहळा उत्तमराव कांबळे यांच्या हस्ते पार पडला. मुख्य अतिथी डो‘.रामचंद्र देखणे होते.
"धन मान गती, कधी न येवो मज चित्ती, दूर होवो मज हातूनी दु:खितांची पिडा!" हा त्यांचा ध्येयवाद. गरीब झोपडपट्टीवासियांचा आधार असलेल्या डो‘क्टरांच्या या सत्काराने चांगल्या प्रति    समाज आजही कृतज्ञ असतो असा फार सुंदर संदेश गेला.त्यांनी चालवलेल्या शाळेतील मंडळी या सोहळ्यात मन:पुर्वक सहभागी झालेली होती. अंधश्रद्धा निर्मुलन, शिक्षण, आरोग्यसेवा आणि ग्रामीण विकास या क्षेत्रातील त्यांचे कार्य वाखाणण्याजोगे आहे.

सगळीच भाषणे काळजाला भिडणारी होती. विशेषत: त्यांची मुलगी सौ.मालविका करकरे खुपच उत्कठ बोलली. माझे बाबा हे माझ्यासाठी आरसाही आहेत नी प्रकाशज्योतही! असं ती म्हणाली. त्यांच्या पत्नी सौ.सुरेख यांची साथ फार मोलाची.
आज वैद्यकीय व्यवसायात अनेक गैरप्रकार शिरलेले आहेत. अशावेळी डो‘.निरगुडकर यांच्यासारखा भला माणूस तिथं पाय रोवून उभा असणं ही फार महत्वाची गोष्ट आहे. सलाम डो‘. सलाम!
.....................................
सकाळ, पुणे, सोमवार, दि.८ ओ‘गष्ट, २०१४, पृ.४,
छायाचित्र: डॉ.निरगुडकर यांचा मानपत्र देऊन सत्कार करताना उत्तम कांबळे व डॉ.रामचंद्र देखणे, शेजारी सौ.सुरेख निरगुडकर मागे प्रा.हरी नरके व डो‘.कैलास कमोद 
................................................................................................................
ज्येष्ठांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्याची गरज- कांबळे
- - सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 8 सप्टेंबर 2014 - 01:45 AM IST
Tags: pune, uttam kamble, senior citizen
षष्ठ्यब्दीपूर्तीनिमित्त डॉ. हिरेन निरगुडकरांचा सत्कार
पुणे- "कॅलेंडरची पाने उलटतात तसा माणूस अधिकाधिक परिपक्व होत जातो. मात्र तेव्हाच समाज त्याला रिटायर करतो. सध्याच्या समाजव्यवस्थेत ज्येष्ठांकडे पाहण्याचा दृष्टिकोनही प्रदूषित आहे. आता हा दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे,‘‘ असे मत "सकाळ माध्यम समूहा‘चे संचालक-
संपादक उत्तम कांबळे यांनी व्यक्त केले.
तब्बल चार दशके वैद्यकीय सेवा करणाऱ्या डॉ. हिरेन निरगुडकरांचा षष्ठ्यब्दीपूर्तीनिमित्त कांबळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. डॉ. निरगुडकर मित्र परिवारातर्फे हा कार्यक्रम आयोजित केला होता. संत साहित्याचे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे, सुरेख निरगुडकर, माजी खासदार प्रदीप रावत, रजनी पाटील, अशोक मोहोळ, आमदार गिरीश बापट, माधुरी मिसाळ, भीमराव तापकीर, माजी आमदार कुमार गोसावी या वेळी उपस्थित होते. वैद्यकीय सेवेचा व्यवसाय होत असल्याची खंत कांबळे यांनी व्यक्त केली.

ते म्हणाले, ""जीव वाचविणे ही सर्वश्रेष्ठ मानवसेवा आहे. परंतु सध्या जागतिकीकरणात सगळ्याच गोष्टींचे मार्केटिंग होत असल्याने वैद्यकीय सेवेचाही व्यवसाय झाला आहे. सेवेचा व्यवसाय होतो तेव्हा डॉ. निरगुडकर यांच्यासारख्या माणसांचे दुर्भिक्ष्य जाणवते. डॉ. निरगुडकरांसारख्या व्यक्तींमुळे वैद्यकीय क्षेत्रावरील विश्‍वास वाढण्यास मदत होत आहे. समाजात चांगली माणसे असून ती सर्वांसमोर आणण्याची जबाबदारी समाजाचीच आहे.‘‘
डॉ. देखणे म्हणाले, ""डॉक्‍टर आणि रुग्ण यांमध्ये अद्वैत नाते असते. परंतु सध्या रुग्णांचा विश्‍वास संपादन करणारे डॉक्‍टर नाहीत. वैद्यकीय सेवेचे मोल जाणणाऱ्या डॉक्‍टरांची समाजाला गरज आहे.‘‘

आई आणि गुरुजनांच्या संस्कारांमुळे इथपर्यंत पोचल्याचे समाधान डॉ. निरगुडकर यांनी व्यक्त केले. "फॅमिली डॉक्‍टर‘ ही संकल्पना सध्या दुरावत असल्याची खंत रावत यांनी व्यक्त केली. या वेळी मालविका करकरे, हरी नरके यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक डॉ. कैलास कमोद यांनी केले. सूत्रसंचालन मिलिंद कुलकर्णी यांनी केले.

http://epaper.esakal.com/sakal/8Sep2014/Enlarge/PuneCity/page4.htmhttp://online4.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=5398766878818571509&SectionId=10&SectionName=पुणे&NewsDate=20140907&Provider=-+सकाळ+वृत्तसेवा&NewsTitle=ज्येष्ठांकडे+पाहण्याचा+दृष्टिकोन+बदलण्याची+गरज-+कांबळे