Thursday, October 2, 2014

‘त्यांच्या’साठी कोणता कार्यक्रम?

   
>> प्रतिमा जोशी 
पंतप्रधान मोदींच्या, 'देशानं गांधींना काय दिलं?' या प्रश्नाचं आजवर काही प्रमाणात विशिष्ट समाजघटकांनी दिलेलं उत्तर 'कुचेष्टा' हेच असल्याचं दिसतं. 

आपल्या भाषणातील म. गांधींच्या गौरवपूर्ण उल्लेखापेक्षाही शारीर हत्येनंतरसुद्धा त्यांची कणाकणानं हत्या करणाऱ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणता कार्यक्रम देणार आहेत, हा कळीचा प्रश्न आहे! 
...............................................................

आपल्या भाषणातील म. गांधींच्या गौरवपूर्ण उल्लेखापेक्षाही शारीर हत्येनंतरसुद्धा त्यांची कणाकणानं हत्या करणाऱ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणता कार्यक्रम देणार आहेत, हा कळीचा प्रश्न आहे!

मॅडिसन स्क्वेअर गार्डनमधील २० हजार भारतीयांसमोर हिंदीतून केलेलं भाषण हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सफल अमेरिका दौऱ्यातील परमोच्च बिंदू होता. ओघवत्या हिंदीतील लयबद्ध भाषण आणि सभागृहांतून त्याला मिळणारा उत्तेजित प्रतिसाद पाहून कित्येकांना स्वामी विवेकानंदांच्या शिकागो येथील धर्मसंसदेतील सुप्रसिद्ध भाषणाची आठवण झाली आ​णि 'त्या नरेंद्रानंतर या नरेंद्राने ओजस्वी वाणीने अमेरिका जिंकली' अशी भावना व्यक्त होऊ लागली. फरक इतकाच होता, की शिकागो येथे जगभरातील विविध वंशांचे व धर्मांचे नागरिक आले होते, तर मोदींसमोरील सर्वच श्रोते अनिवासी असले, तरी भारतीय होते आणि मोदींशी स्पर्धा करणारा दुसरा कोणीही वक्ता नव्हता.

या भाषणात अनेक मुद्द्यांना पंतप्रधानांनी हात घातला असला, तरी त्याचे ठळक वैशिष्ट्य म्हणजे सुमारे ८० ते ९० मिनिटांच्या या भाषणात त्यांनी तब्बल तीन वेळा म. गांधी यांचा उल्लेख केला. स्वातंत्र्यलढा गांधींनी कसा सामान्यांच्या आंदोलनात परिवर्तित केला होता यावर पंतप्रधानांनी भर दिला. हातात कसलंही हत्यार नसलेला साधा माणूसही स्वातंत्र्ययोद्धा होऊ शकतो हा विचार गांधींनी भारताला दिला अशा आशयाचं वक्तव्य करताना तळमळीनं शिकवणारा शिक्षक, नेकीनं सफाई करणारा कामगार, खादीचेच कपडे वापरीन असा निश्चय करणारे सामान्यजन यांनाही स्वातंत्र्याच्या लढाईत आपलाही याद्वारे सहभाग आहे असे कसे वाटत असे याबद्दल ते बोलले. भारत 'गंदगीमुक्त' करण्यासाठी आपणही असं व्यापक आंदोलन उभारू इच्छित असल्याचं ते म्हणाले. इतकंच नव्हे, तर गांधींनी आपल्याला स्वातंत्र्य दिलं, आपण त्यांना काय दिलं? असा प्रश्नही श्रोत्यांना विचारला.

म. गांधींचा शस्त्रविहीन परिवर्तनाचा मार्ग, अहिंसेचं तत्वज्ञान, सहिष्णुतेचा आणि सत्याचा आग्रह हा भारतीय जनतेला आणि जगातील अब्जावधी संवेदनशील माणसांना लढ्याचा अद्भूत मार्ग वाटत आला असला, तरी या मार्गाची खिल्ली उडवणारे असंख्य भारतीय स्वातंत्र्यानंतरच्या दुसऱ्या पिढीपासूनच मोठ्या आवाजात बोलू लागले होते. गांधी हा देशावरील आणि हिंदू धर्मावरील कलंक आहे अशा भावनेने त्यांची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसे यांना इतिहासाचे नायकत्व बहाल करण्याची धडपड एका गोटातून सातत्याने गेली ६० वर्षे केली जात आहे आणि त्याला गांधीद्वेषाची भरघोस फळेही आलेली दिसत आाहेत. जे आपल्याला अमान्य आहे, पटत नाही, शत्रुवत भासते ते गोळ्या घालून नष्टच केले पाहिजे या भावनेच्या पगड्याखाली गांधीहत्येचे समर्थन करणाऱ्या वर्गाची १९४७च्या दरम्यान असलेली गंगोत्री आज विस्तीर्ण आणि खोल पात्रात रूपांतरीत झाली आहे नि त्यात निर्माण झालेल्या काळ्याशार डोहांमध्ये विखारी मनोवृत्तीची जलपर्णी फोफावली आहे. इतकी, की या पाण्यातला प्राणवायूच संपुष्टात आल्याची भयशंका मनात आल्यावाचून राहत नाही. देशाची फाळणी, पाकिस्तानची निर्मिती, ही जणू गांधींचीच इच्छा किंवा खरं तर कटकारस्थान (पर्यायाने मुसलमानांचे लांगुलचालन) असल्याचा प्रचार करत त्यांना फाळणीचे गुन्हेगार ठरवले गेले.

हा इतिहास उगाळण्याचा प्रश्न नाही; तर या पार्श्वभूमीवर तयार झालेली देशातील बहुसंख्यांची, विशेषतः २० वर्षांपूर्वीच्या उदारीकरण नि जागतिकीकरणामुळे ज्यांचे कल्पनातीत भले झाले अशा वर्गाची वर्तमान मनोभूमिका ही प्रामुख्यानं भारतीय चलनावरील गांधीजींच्या चित्राविषयीच आस्था असणारी आहे, एरव्ही गांधींनी या देशाला काय दिलं असाच प्रश्न ते विचारताना दिसतात. इतकंच नाही, तर पंतप्रधान मोदींनी ज्या 'आंदोलना'चा गौरवानं उल्लेख केला, ती भ्याडांची अहिंसा असल्याचे शेरे मारत स्वातंत्र्यप्राप्तीचं श्रेयही ते गांधींना द्यायला तयार नाहीत. लढे, आंदोलनं वगैरे सैनिकांची किंवा लोकोत्तर व्यक्तींची बाब आहे, आपण सामान्य माणसं, आपण काय करणार, या विचारापासून प्रतीकात्मक कार्यक्रमांद्वारे देशातल्या कोट्यवधी माणसांची मुक्तता करून कोट्यवधी जनता स्वतःच कशी शस्त्र बनू शकते ते सप्रमाण सिद्ध केलेल्या या नेत्याचं अस्पृश्य समाजासंदर्भातील अपराधी भावनेनं उद्गारलेलं, 'एका गालावर मारलं, तर दुसरा पुढे करायला हवा' हे वाक्य अपभ्रंश करत, संदर्भहीन करत टवाळीसारखं वापरलं गेलं. ज्याच्या सार्वजनिक आयुष्याची सुरुवातच आणि पुढे अख्खी हयातच परकीय इंग्रजांना हाकलून देण्यासाठी कामी आली, त्यानं देशाला फक्त खजूर, बकरीचं दूध, चरखा इतकंच दिलं... फारफार तर सफाईचा झाडू प्रतिष्ठित केला असा प्रचार गेली पन्नाससाठ वर्षं खुबीनं केला गेला, स्वातंत्र्यानंतर जन्मलेल्या पिढीच्या गळी पद्धतशीर उतरवला गेला. गांधींचे 'सत्याचे प्रयोग' म्हणजे वासनेनं माखलेले रंगिले चाळे असा विकृत प्रचारही बिनदिक्कत केला गेला आहे. आताचं युग टेक्नॉलॉजीचं, सोशल मीडियाचं आहे. महिलांबरोबर नृत्य करतानाचे किंवा त्याहून अश्लील असे मॉर्फिंग केलेले, फोटोशॉप केलेले गांधींचे फोटो कुचाळक्या करणाऱ्या पोस्टसह नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीआधी काही महिने सोशल मीडियावर कसे फिरले आणि त्यावर फाजील कमेंट्सही कशा शेकडोंनी केल्या गेल्या हे लक्षात घेतलं तर अपभ्रंश, विकृतीकरण, अपसमज हे शब्दही फिके वाटू लागतील. पंतप्रधान मोदींच्या, 'देशानं गांधींना काय दिलं?' या प्रश्नाचं आजवर काही प्रमाणात विशिष्ट समाजघटकांनी दिलेलं उत्तर 'कुचेष्टा' हेच असल्याचं दिसतं.

स्वातंत्र्यानंतर गांधींच्या वाट्याला आलेले शल्य असे की, जी जनता या कुचेष्टेच्या परीघात नाही, तिलाही गांधींचा आपमतलबी जप करणाऱ्यांमुळं गांधी फारसे आपले वाटू शकले नाहीत. सत्ताधाऱ्यांचा सामान्यांना आलेला अनुभव हा अनेक बाबतींत पोळून टाकणारा होता. ज्या सामान्य माणसाला गांधींनी 'आंदोलना'चे नायक बनवले, त्या माणसाच्या संघटित गाऱ्हाण्यांनाही जिथं वजन उरलं नाही, तिथं एकेकट्या व्यक्तीच्या वाट्याला उपेक्षा आणि अपेक्षाभंग दोन्ही येणं स्वाभाविक होतं. भ्रष्टाचार, रोजगाराची शाश्वती नसणं, लाल फितीत चांगल्या योजनांचंही भजं होणं, सरकारी यंत्रणेतली माणसं ही परक्या ग्रहावरून आलेली आहेत की काय अशी शंका येण्याइतपत त्यांचं जनतेशी नातं न उरणं आणि त्याचवेळी नेतेमंडळींशी मात्र त्यांचं साटंलोटं असणं हीच सत्ताधाऱ्यांची ओळख या देशात बनली आहे. अशा सत्ताधाऱ्यांनी गांधींचा वारसा सांगणं जर कोणी फारसं मनावर घेतलं नाही, तर त्यात नवल नाही. गांधींचा वारसा सांगणाऱ्यांनी, गांधींचा वारसा नाकारणाऱ्यांनी आणि त्यांनी काही वारसा दिलाय याची जाणच नसणऱ्यांनीही त्यांना या देशात संदर्भहीन बनवलं आहे.

म. गांधींच्या गौरवपूर्ण उल्लेखापेक्षाही शारीर हत्येनंतरसुद्धा त्यांची कणाकणानं हत्या करणाऱ्यांना पंतप्रधान कोणता कार्यक्रम देणार आहेत, हा कळीचा प्रश्न आहे!