Sunday, May 3, 2015

महाराष्ट्र भूषण : वादंग आणि वास्तव




बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याच्या निर्णयाबाबत उलटसुलट चर्चा चालू आहे.

बाबासाहेबांच्या वक्तृत्वावर भाळलेले असंख्य लोक आहेत. त्यांना या पुरस्काराचा आनंद झालेला आहे.
बाबासाहेंबांच्या विचारधारेचे पारंपरिक विरोधक असलेले या निर्णयावर नाराज आहेत. त्यात प्रामुख्याने समाजवादी, मार्क्सवादी, आंबेडकरवादी मंडळींचा समावेश आहे.

याशिवाय गेली काही वर्षे ज्या संघटना बाबासाहेबांच्या इतिहास लेखनावर संघटितपणे आणि आक्रमकपणे तुटून पडत आलेल्या आहेत त्या ब्रिगेडी आणि बामसेफींनी जोरदार मोर्चेबांधणी करून विरोधाची राळ उडवून दिलेली आहे.

अशावेळी सामान्य माणूस भांबावलेल्या स्थितीत असतो.

हा निर्णय चूक की बरोबर हे ठरविताना खालील प्रश्नांच्या प्रकाशात चर्चा झाली तर ती उपयुक्त ठरू शकेल.

हा पुरस्कार प्रतिष्ठेचा आहे. पहिल्या पुरस्काराच्या वेळी दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी शासनाने हा पुरस्कार आपल्याला देण्याचा  निर्णय घेतला होता, मात्र आपण पु.ल.देशपांडे यांचे नाव सुचवले असे वक्तव्य केल्यावरून गदारोळ झाला होता.

मानकरी महाराष्ट्रभूषणचे--
वर्ष,
१९९६,  पु. ल. देशपांडे, साहित्य
 १९९७,  लता मंगेशकर, कला, संगीत
 १९९९,  विजय भटकर, विज्ञान
 २००१,  सचिन तेंडुलकर, क्रीडा
 २००३,  अभय बंग आणि राणी बंग, समाजसेवा
२००५,  रघुनाथ माशेळकर, विज्ञान.
 २००६,  रतन टाटा, उद्योग,
 २००७,  रा. कृ. पाटील, समाजसेवा
 २००८,  मंगेश पाडगावकर, साहित्य
२००९,  सुलोचना लाटकर, कला, सिनेमा
 २०११,  अनिल काकोडकर, विज्ञान.
..................................

२००२,  भीमसेन जोशी, कला, संगीत
२००४,  बाबा आमटे, समाजसेवा
२००८,  नानासाहेब धर्माधिकारी, समाजसेवा.
२०१०,  जयंत नारळीकर, विज्ञान.
 ..................................


अशा विविध क्षेत्रातील 16 मान्यवरांना आजवर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे.

******

१.  हा पुरस्कार कोणाला द्यायचा याचा निर्णय एक निवड समिती घेते. या समितीत यावर्षी खालील आठ मान्यवरांचा समावेश होता.

सांस्कृतिक कार्य मंत्री,  विनोद तावडे, अध्यक्ष.
सदस्य: वासुदेव कामत, उज्वल निकम, मंगल कांबळे, दिलीप वेंगसरकर, राजीव खांडेकर, सांस्कृतिक सचिव वल्सा नायर आणि संचालक अजय आंबेकर.

२.  या समितीने एकमताने हा निर्णय घेतला. पुरस्कारासाठी बाबासाहेबांचे नाव कोणी सुचवले आणि त्याला कोणी अनुमोदन दिले ही बैठकीतील माहिती उघड झाली तर संघटित व आक्रमक विरोधकांचा दुटप्पी व्यवहार उघडा पडेल.

३.  पुरस्कार कोणालाही दिला तरी तो निर्णय सर्वांना मान्य होईलच अशी शक्यता नाही. त्यामुळे पुरस्कार यांच्याऎवजी ह्यांना का दिला नाही अशी टिका होणारच. यावर उपाय म्हणजे एकदम १२ कोटी मराठी लोकांना तो देऊन टाकायचा.म्हणजे वादच नको.

४.  लोकशाही पद्धतीने समितीने एकमताने घेतलेला निर्णय मानायचा की नाही? निर्णयाचे सर्वाधिकार बाहेरील व्यक्ती किंवा संघटनांना द्यायचे काय? त्यांनी ज्यांना आपल्या संघटनांचे "+++  भुषण"  पुरस्कार दिलेले आहेत, त्यांनीच बाबासाहेबांचे नाव महाराष्ट्र भूषण साठी सुचवले असेल आणि त्याला अनुमोदनही बहुजन सदस्यानेच दिलेले असेल तरीही बाहेर गदारॊळ केला जात असेल तर पडद्यामागील आणि उघडपणे चाललेले राजकारण व संगनमत लोकांसमोर कोण मांडणार?

५.  बाबासाहेब पुरंदरे यांनी गेल्या ७० वर्षात मिशनरी वृत्तीने शिवचरित्र घरोघरी पोचवले, लोकप्रिय केले हे त्यांचे कार्य अमान्य करता येईल का? ते इतिहासकार अथवा इतिहास संशोधक असल्याचा त्यांनी कधीही दावा केलेला नाही. ते शिवचरित्राचे कथन करतात. ’जाणता राजा’ च्या प्रयोगातून त्यांनी लाखो लोकांपर्यंत ते पोचवले आहे.

६.  बाबासाहेब पुरंदरे यांच्या शिवचरित्रात काही उणीवा, त्रुटी किंवा दोष असतील आणि त्याबाबत कोणाचे मतभेद असतील तर ते मांडण्याचा सर्वांनाच अधिकार आहे. माझेही त्यांच्या इतिहास लेखन पद्धतीबाबत मतभेद आहेत. ते राहतील. पण बाबासाहेबांशी चर्चा होऊ शकते. मतभेद मांडता येतात. विरोधकांपैकी ज्या संघटित आणि आक्रमक संघटना आहेत त्यांचा सर्वच ब्राह्मण इतिहासकारांना विरोध आहे. त्यांना अगदी नरहर कुरूंदकर, त्र्यं.शं. शेजवलकर, सेतूमाधवराव पगडी, न.र. फाटक, ग.ह. खरे, गजानन भास्कर मेहेंदळे, य. दि. फडके हेही चालत नाहीत. त्यामुळे "आम्ही सांगू तोच इतिहास" असा अट्टाहास असणारांचे समाधान कसे करायचे?अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे काय? त्यांच्याशी चर्चाच शक्य नाही. त्यांना एकतर सर्वांनी आपले अनुयायी व्हायला हवेय नाहीतर थेट शत्रूच. कायम इतरांना आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करायचे, त्यांच्या भुमिकांचे विपर्यास आणि विकृतीकरण करीत त्यांची बदनामी करायची हा यांचा खाक्या. असहमतीला, मतभेदाला जागाच नसते त्यांच्याकडे.  ते नेहमी इतरांच्या हेतूंवरच थेट संशय घेतात. "तेथे पाहिजे फक्त आमच्या जातीचा" असाच त्यांचा आम्हाला आलेला एव्हढ्या वर्षांचा अनुभव आहे. सबब ज्यांना दुरून डोंगर साजरे आहेत त्यांनी आपण कोणामागे फरफटत जात आहोत याचे भान ठेवायचे की नाही?

७.  ज्या गोविंद पानसरे यांचा आता सोयिस्कर हवाला दिला जात आहे,  त्यांनी या संघटनांवर केलेली टिका जगप्रसिद्ध आहे, ती  विसरली का जातेय?

८.  यांना जन्माने ब्राह्मण असल्याने डा. नरेंद्र दाभोळकरही चालत नव्हते. कोणीकोणीच चालत नाहीत. अगदी दुसर्‍या जातीचे बहुजनही चालत नाहीत. तेथे ब्राह्मण कसा चालेल? हे इतिहास लेखनाचे एकजातीयकरण महाराष्ट्राच्या भल्याचे आहे काय?

९.  जेम्स लेनचे लेखन निषेधार्यच होते. बदनामीकारकच होते. त्याला जी काय शिक्षा करायची ती करा. आमचा पाठींबा आहे. पण तितकाच भांडारकर संस्थेवरचा हल्लाही अनुचित होता. चोराला सोडून इतरांना ठोकल्याने न्याय होतो काय? वहीम किंवा संशय हाच पुरावा असतो काय? हे ज्यांच्यावर आक्षेप घेतील त्या सर्वांना चौकशी न करताच फासावर लटकावयचे काय?

१०.  विचारधारा म्हणून ज्यांचा बाबासाहेबांच्या नावाला विरोध आहे, त्यांचा या विरोधी संघटनांच्या दहशतवादी, हल्लेखोर, विशिष्ट समाजाच्या सामुदायिकपणे कत्तलींचे आवाहन करणार्‍या वर्तनाला पाठिंबा आहे असे समजायचे काय? वैचारिक विरोध करणे आणि पत्रकारांच्या घरावर हल्ले करणे यात फरक असतो किंवा नाही? याचाही खुलासा झालेला बरा.

११.  यापुढे पुरस्कार देताना राज्य सरकारने या अशा सर्वच संघटनांचे "ना हरकत प्रमाणपत्र" घेणे बंधनकारक असल्याचा नियम करायचा का?

१२. बालभारतीच्या चौथीच्या इतिहासाच्या पुस्तकाचे फेरलेखन करताना त्यावेळच्या सरकारने [ शिक्षणमंत्री वसंत पुरके यांनी] छ.शिवजी महाराज यांच्या जातीचे ६ जण आणि दादोजी कोंडदेव यांच्या जातीचे ३ जण अशा ९ सदस्यांची समिती नेमून जो निर्णय घेतला, तीच लोकशाही पद्धत यापुढे आदर्श मानायची काय?ज्या संभाजी ब्रिगेड या संघटनेने तक्रार केली होती त्याच संघटनेच्या कार्यकर्त्यांना इतिहासकार म्हणून बालभारतीच्या या समितीवर नियुक्त करून राष्ट्रपुरूष शिवाजी महाराजांना एका जातीत बंदीस्त करणारे कोण आहेत?

१३.  जे लोक इतिहासकार कृ.अ. केळूस्करांना वेगळा न्याय आणि राम गणेश गडकरींना वेगळा न्याय लावतात त्यांची री ओढता येईल काय?

१४.  ज्यांच्या लेखी रणजित देसाई, शिवाजी सावंत, विश्वास पाटील केवळ त्यांच्या जन्मामुळे/ जातीमुळे टिकामुक्त असतात पण मेहेंदळे, बेडेकर, बहुलकर मात्र संपूर्ण बाद असतात, त्यांना  "व्हेटोचा" अधिकार द्यायचा काय?  मग तटस्थ आणि प्रांजळ इतिहास लिहिता येईल काय?

  १५.  आजवरचा अनुभव पाहता ज्यांना छत्रपती शिवाजी महाराज केवळ एका जातीत बंदिस्त करायचे आहेत, त्यांच्या भुमिका उचलून धरताना समाजवादी, मार्क्सवादी आणि आंबेडकरवादी कार्यकर्त्यांनी इतिहासाचे असे जातीय विकृतीकरण करणारांच्यापासून सावध राहायला नको काय?  हिटलरी भुमिका मग ती कोणत्याही छावणीची असो ती मान्य करायची काय? त्यामुळे "आगीतून फुफाट्यात" हेच होणार नाही काय?

१६..  प्रश्न आणखी बरेच आहेत.

पुन्हा कधीतरी,,,,,

No comments:

Post a Comment