Friday, May 15, 2015

मराठीला अभिजात दर्जा ही काळ्या दगडावरची रेघमराठीला अभिजात दर्जा ही काळ्या दगडावरची रेघ
  • हरी नरके
मुंबई, दि. 14 :  मराठी दोन हजार वर्षांपूर्वीपासून अस्तित्वात असल्याचे शेकडो पुरावे शिलालेख, हस्तलिखिते अशा विविध स्वरूपांत उपलब्ध आहेत.  त्यामुळे मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे. तब्बल 52 बोलीभाषा असलेली मराठी यापुढेही संपन्न होत जाणार असून, ती उद्याच्या काळातही श्रेष्ठ व समृद्ध भाषा असणार आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत हरी नरके यांनी आज येथे केले.
मराठी भाषा विभाग, शासकीय मुद्रणालय व राज्य मराठी विकास संस्थेच्या वतीने यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आयोजिलेल्या ग्रंथप्रदर्शन व साहित्यिक उपक्रमात ‘अभिजातच्या उंबरठ्यावर मराठी’ या विषयावर श्री. नरके बोलत होते. मराठी भाषा विभागाच्या उपसचिव अपर्णा गावडे, अवर सचिव वृषाली सावंत आदी यावेळी उपस्थित होते.  
ज्या भाषेत जाणिवा विकसित करणारे श्रेष्ठ साहित्य उपलब्ध असते, ती भाषा अभिजात असते. या निकषानुसार मराठीत जागतिक दर्जाचे विपुल साहित्य निर्माण झाले आहे, असे सांगून श्री. नरके म्हणाले की, मराठीत एक लाखांहून अधिक पुस्तके उपलब्ध असून, कोशवाङमय निर्मितीत ती जगातील दुस-या क्रमांकाची भाषा आहे.
ते पुढे म्हणाले की, मराठी ही संस्कृतपासून जन्माला आली नसून, ती महाराष्ट्री प्राकृत भाषा आहे. ही बाब राजारामशास्त्री भागवत यांनी ‘मराठ्यासंबंधी चार उदगार’ या पुस्तकातून, तसेच ज्ञानकोशकार डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर यांनी त्यांच्या साहित्यातून सिद्ध केली आहे. महाराष्ट्री प्राकृत, महाराष्ट्री अपभ्रंश व मराठी या तीन वेगळ्या भाषा नसून, ती मराठी हीच एक भाषा आहे. लक्ष्मण रामचंद्र पांगारकर यांनी 1932 मध्ये लिहिलेल्या ‘मराठी साहित्याचा इतिहास’ या पुस्तकात त्याचा दाखला आहे.  
मराठीच्या प्राचीनतेचे उदाहऱण देताना श्री. नरके म्हणाले की, जुन्नरजवळ नाणेघाटात सापडलेल्या 2232 वर्षांपूर्वीच्या ब्राम्हीलिपीतील शिलालेखात मराठी अस्तित्वात असल्याचा पुरावा आहे. गाथा सप्तशती हा दोन हजार वर्षांपूर्वीचा ग्रंथ महाराष्ट्रातील गोदावरी नदीच्या काठांवरील गावांतील नागरिकांनीच रचला आहे. महाराष्ट्रात घरोघरी सांगितली जाणारी कावळा-चिमणीच्या शेणामेणाच्या घराची गोष्ट आठशे वर्षांपूर्वीच्या लीळाचरित्रात समाविष्ट आहे. अहमदाबादजवळील लोथल या गावात साडेचार हजार वर्षांपूर्वीचे बंदर सापडले. तिथे सापडलेल्या सुरईवरसुद्धा ही कथा चित्ररूपात कोरलेली आहे. तामिळमधील 2600 वर्षांपूर्वीच्या संगम साहित्यातही कावेरी नदीवर धरण बांधणारे गवंडी मराठीत बोलत असतात, असा उल्लेख सापडतो. श्रीलंकेतील ‘दीपवंश’ व ‘महावंशप्राचीन ग्रंथांतही मराठीचा उल्लेख आहे.
श्री. नरके पुढे म्हणाले की, जगभरातील विद्वानांना मराठी भाषेतील साहित्याने मोहिनी घातली आहे. जगप्रसिद्ध लेखक गॅब्रियल गार्सिया मार्खेझ यांनी त्यांच्या साहित्यातील ‘जादुई वास्तववादा’ची प्रेरणा 1200 वर्षांपूर्वीच्या हरिभद्र या मराठी लेखकाच्या ‘समरादित्याची कथा’ या पुस्तकापासून घेतल्याचे एका मुलाखतीत सांगितले आहे. या प्राचीन भाषेचा अभिमान सर्वांनी बाळगला पाहिजे. सर्व भाषांचा आदर करताना मराठीचा आग्रह धरला पाहिजे. संशोधन, लोकव्यवहारासह सगळ्यांच क्षेत्रांत मराठीचा वापर झाला पाहिजे, असेही ते म्हणाले.
सौजन्य: श्री.हर्षवर्धन पवार, मंत्रालय.