Sunday, October 25, 2015

जगण्याच्या संवेदना आणि जीवनमूल्यांचा वेध--‘ख्वाडा’

http://www.loksatta.com/manoranjan-news/khwada-marathi-movie-team-in-loksatta-office-1154130/
लोकसत्ता,पुणे,रविवार, दि.२५आक्टो.२०१५
जगण्याच्या संवेदना आणि जीवनमूल्यांचा वेध--‘ख्वाडा’

लंडन महोत्सवात ‘ख्वाडा’ दाखविला गेला. चित्रपट पाहून मुमताज नावाच्या बाई खूप प्रभावित झाल्या.
शब्दांकन- शेखर जोशी | October 25, 2015 04:08 am

दोन राष्ट्रीय आणि पाच राज्य पुरस्कार मिळविलेला ‘ख्वाडा’ हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला आहे. चित्रपट प्रदर्शनाच्या पूर्वसंध्येवर ‘ख्वाडा’चे दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे, सादरकर्ते चंद्रशेखर मोरे आणि चित्रपटातील प्रमुख भूमिकेत असलेल्या शशांक शेंडे, अनिल नगरकर, भाऊसाहेब शिंदे यांनी ‘लोकसत्ता’ कार्यालयास भेट दिली आणि संपादकीय विभागातील सहकाऱ्यांशी संवाद साधला. त्या गप्पांचा वृत्तान्त..
‘ख्वाडा’ हा चित्रपट दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडेंचे स्वप्न होते. त्यामुळे या चित्रपटाच्या शीर्षकापासून, ते कलाकारांची निवड, चित्रपटांची मांडणी अशा अनेक गोष्टींमागे भाऊरावांचा काही एक विचार आहे हे जाणवल्याशिवाय राहात नाही. ‘ख्वाडा’ या चित्रपटाच्या शीर्षकापासूनच त्याची सुरुवात होते. ‘ख्वाडा’ म्हणजे काय?, यावर चित्रपटाचे शीर्षक लक्षवेधी असावे आणि त्या शीर्षकातून चित्रपटाचा संपूर्ण गाभा व्यक्त होणे आवश्यक आहे. हे लक्षात घेऊन ‘ख्वाडा’ हे नाव चित्रपटाला दिल्याचे भाऊराव यांनी सांगितले. ‘ख्वाडा’ या शब्दाचे वेगवेगळे अर्थ असून मुख्य अर्थ ‘अडथळा’ असा आहे. अन्य अर्थ हे त्या त्या परिस्थितीनुसार समोर येतात, असे ते म्हणाले. या चित्रपटाचा विषय सतत ‘स्थलांतर’ करत राहणाऱ्या लोकांची गोष्ट सांगतो. भटकंती करणाऱ्या समाजाच्या जगण्याच्या संवेदना, त्यांची जीवनमूल्ये, जगण्याचा संघर्ष, मानवी प्रवृत्ती, मनगटशाहीच्या जोरावर करण्यात येणारी पिळवणूक याचा वेध या चित्रपटात घेण्यात आला असल्याची माहिती भाऊरावांनी दिली. एकीकडे इतर दिग्दर्शक शहरी विषयांच्या चित्रपटांकडे वळत असताना संपूर्णपणे ग्रामीण चित्रपट तोही पहिल्याच प्रयत्न करणे यात धोका नाही का वाटला?, या प्रश्नावर बोलताना चित्रपटाचा विषय संपूर्णपणे ग्रामीण आहे. पण, केवळ विषय ग्रामीण आहे म्हणून चित्रपट चालेल की नाही, असा धोका आपल्याला वाटले नसल्याचे भाऊराव यांचे म्हणणे आहे. मुळात, कोणताही चित्रपट करणे यात धोका हा असतोच. ग्रामीण भाषा, जीवन आणि विषय असलेले चित्रपट याआधीही येऊन गेले आहेत. त्यातून लोकांच्या वेगळ्या संवेदना, त्यांचे जगणे हे लोकांसमोर आले. वास्तवाचा वेध घेणारे आणि आपल्या दैनंदिन जीवनाला भिडणारे विषय चित्रपटांतून मांडले तर प्रेक्षकांचा त्याला प्रतिसाद मिळतो. मग तो चित्रपट ग्रामीण आहे की शहरी हा मुद्दा बाजूला राहतो, असा मुद्दा भाऊराव यांनी मांडला. शिवाय, जगण्याचा संघर्ष हा काही फक्त ग्रामीण भागांतील लोकांनाच करावा लागतो असे नाही, तर शहरी भागांतील लोकांनाही त्याचा अनुभव येत असतो. अगदी आंतरराष्ट्रीय स्तरावर स्थलांतरितांचा जो प्रश्न आहे त्याचाही संदर्भ भाऊराव यांनी यावेळी बोलताना दिला. संघर्षांचे प्रकार परिस्थितीनुरूप बदलतात हे लक्षात घेतले तर शहरी आणि ग्रामीण अशा दोन्ही प्रकारच्या प्रेक्षकांना ‘ख्वाडा’ आवडेल, असे भाऊराव क ऱ्हाडेंनी सांगितले. कलात्मक आणि व्यावसायिक चित्रपट असा भेद आपल्याला मान्य नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. चित्रपट ही एक कलाकृती असून चित्रपटाकडे कला म्हणून पाहिले जावे. कलात्मक आणि व्यावसायिक अशी दोन्ही टोके चुकीची असून चित्रपटातील आशय हा महत्त्वाचा असतो. तो आशय चित्रपटातून काय ताकदीने पुढे नेला जातो त्यावर चित्रपटाचे यश अवलंबून असते, असे भाऊराव यांनी सांगितले.
आशय आणि विषय पक्का असेल तर भाषेचा अडसर येत नाही
लंडन महोत्सवात ‘ख्वाडा’ दाखविला गेला. चित्रपट पाहून मुमताज नावाच्या बाई खूप प्रभावित झाल्या. त्यांना चित्रपट खूप आवडला. मुमताज या मूळच्या इराणच्या, पण गेली काही वर्षे त्या लंडनला स्थायिक झाल्या आहेत. चित्रपटातील ‘मायग्रेशन’चा मुद्दा त्यांना भावला असेल. हा चित्रपट म्हणजे ‘चित्रसंगती’ आहे. भाषेचा कोणताही अडसर न राहता चित्रपटातून भावना, विचार सगळ्यांपर्यंत पोहोचताहेत, हे या निमित्ताने आम्हाला जाणवले असल्याचे शशांक शेंडे म्हणाले.
थक्क करणारा चित्रपट
चित्रपट पूर्ण झाल्यानंतर मोठे नाव असलेल्या कंपनीने तो सादर करावा, असे वाटत होते. पण तसे काही झाले नाही. त्यामुळे मीच चित्रपट सादर करावा, असे मला सांगण्यात आले. मी चित्रपट पहिला. तो थक्क करणारा अनुभव होता. प्रेक्षकांनी ‘ख्वाडा’च्या पाठीशी उभे राहावे. चित्रपटाला ग्रामीण भागातील प्रेक्षकांबरोबरच शहरी प्रेक्षकही मिळेल.
चंद्रशेखर मोरे सादरकर्ते
‘ख्वाडा’ हा तर ‘चित्र’पट
‘ख्वाडा’ ची कथा ही पुणे व अहमदनगर जिल्ह्य़ांच्या ग्रामीण सीमेवर घडणारी आहे. ‘ख्वाडा’ संवादाच्या माध्यमातून पुढे जात नाही. तो ‘चित्र’पट आहे. चित्रसंगतीने तो पुढे जातो. शहरी संस्कृतीतून लोप पावलेल्या, लोप पावत जाणाऱ्या अनेक शब्दांचा यात वापर करण्यात आला आहे. मेंढपाळांच्या दैनंदिन जीवनातील हे सर्व शब्द आहेत.
शशांक शेंडे -अभिनेते
शेतकऱ्यांनी आत्महत्या करु नये
मी मूळचा शेतकरी कुटुंबातील. पण चित्रपटाकडे व्यवसाय म्हणून वळलो. शेती विकायचा निर्णय घेतला. कुटुंबीयांनी विरोध केला, पण त्यांना व्यावहारिकपणे सर्व पटवून दिले. मग घरचेही माझ्या पाठी उभे राहिले. शेतकऱ्यांच्या तरुण पिढीने नोकरी किंवा व्यवसायाकडे वळावे. मात्र कोणत्याही परिस्थितीत आत्महत्या करू नये
भाऊराव कऱ्हाडे -दिग्दर्शक
प्रेक्षकांना नक्की आवडेल
हा चित्रपट प्रेक्षकांना नक्की आवडेल. चित्रपटात मी ‘खलनायक’ आहे. मनगटशाहीच्या जोरावर ‘नडला की तोडला’ असा हिशेब असणारी ही व्यक्तिरेखा आहे. मी यापूर्वीही चित्रपटातून ‘खलनायक’ रंगविला आहे. सुमारे २५ चित्रपटांतून मी आत्तापर्यंत लहान-मोठय़ा भूमिका केल्या आहेत.
अनिल नगरकर अभिनेता
‘ख्वाडा’ने खूप आनंद आणि प्रसिद्धी दिली
चित्रपटातील नायकाला कुस्तीची पाश्र्वभूमी असल्याचे दाखविले आहे. मलाही कुस्तीची पाश्र्वभूमी होती. ही व्यक्तिरेखा मला आवडली होती. सुदैवाने मला ती साकारायला मिळाली, याचा आनंद आहे.अर्थात मला स्वत:लाही खूप प्रसिद्धी मिळाली. लोक ओळखायला लागले.
भाऊसाहेब शिंदे – अभिनेता
First Published on October 25, 2015 4:08 am
Web Title: Khwada Marathi Movie Team In Loksatta Office
.........................
http://www.loksatta.com/moviereview-news/marathi-movie-khwada-review-by-lokprabha-1153662/
लोकप्रभा रिव्ह्य़ू – ‘ख्वाडा’- धडपड खोड्यातून सुटण्याची-- सुहास जोशी | October 23, 2015 15:34 pm
साऱ्या कथानकाची एक हळूवार झिंग चढते. त्याच धुंदीत असताना चित्रपटाचा शेवट थेट आपल्या अंगावर
लोकप्रभा रिव्ह्य़ू – ‘ख्वाडा’- धडपड  खोड्यातून सुटण्याची--
चित्रपट सुरु होतो. नदीकिनारी शेळ्या, मेंढय़ा, त्यांची अखंड बे बे बे, धनगराचे विशिष्ट शब्दांनी त्यांना चुचकारणे, धनगराचा तरणाबांड धाकटा दंड बैठका घुमवितोय, मिसरुडावरुन हात फिरवित स्वप्नातदेखील रमतोय, धनगरी बोली भाषेची विशिष्ट लय तुम्हाला सादवतेय, आजूबाजूची मोकळी रानं, क्षितिजापर्यंतचं अवकाश आणि त्यात खुल्या आकाशाखालचा धनगराचा फिरता प्रपंच (वाडा). पुढच्या प्रसंगात चाऱ्याच्या शोधात वाडा स्थलांतरीत करताना धनगरी गीताचे बोल, घोडय़ावरच्या बिऱ्हाडात बसलेलं धनगराचं सहा-सात वर्षांचं पोर, मध्येच येणारा जाणारा रामराम करतोय, एखादा गाडीवाला जरा गुरगुरत जातोय आणि हे सारं पाहताना आपल्याला प्रश्न पडू लागतो की हा चित्रपट आहे की माहीतीपट, धनगरांचं जगणं मांडणारा. पण, धनगरी भाषेचा लहेजा आणि वाडय़ाचे सारे बारकावे टिपत चित्रफीत पुढे सरकू लागते आणि हळूहळू आपणदेखील त्या वाडय़ाबरोबर रानोमाळ भटकू लागतो. त्यांच्या सुख-दु:खात रमू लागतो. कथानकाची पकड बसते आणि त्या वाडय़ाला पडलेला खोडा आपल्यालादेखील जाणवू लागतो. त्या पात्रांची, त्यांच्या भाषेची, त्यांच्या भावनांची, मुक्या शेळ्या, मेंढय़ांची या साऱ्या कथानकाची एक हळूवार झिंग चढते. त्याच धुंदीत असताना चित्रपटाचा शेवट थेट आपल्या अंगावर आदळतो.
चित्रपटीय भाषेची उमज असलेला दिग्दर्शक सक्षम कथानकाला कसा उत्तम न्याय देऊ शकतो त्याचं ‘ख्वाडा’ हे उत्तम उदाहरण म्हणायला हवं. प्रत्येक फ्रेम न् फ्रेम दिग्दर्शकाच्या डोक्यात इतकी फिट्ट बसलेली आहे की त्याला जे हवं ते सारं काही तुमच्यापर्यंत पोहोचते. दिग्दर्शनाची पाश्र्वभूमी नाही, कसलेले अनुभवी कलाकार नाहीत, स्टुडिओचा रचनाबद्ध अवकाश नाही, सारं काही खुल्या छताखालचं आणि त्याच खुलेपणातून ही कलाकृती आकार येते. आणि महत्त्वाचं म्हणजे ते कथानकातून साकारलेलं असते. ना कसली तांत्रीक उणीव, की ना अनुनभवी कलाकारांचा बुजरेपणा. कथानक, संवाद, ध्वनी, चित्रीकरण अशा सर्वच बाबींना पुरेसा न्याय देत साकारलेलं अफलातून टिमवर्क म्हणजे ‘ख्वाडा’ म्हणावं लागेल.
आणि हे सर्व साकारतानाच एक सामाजिक भाष्यदेखील अगदी सहजपणे समोर येतं. तेदेखील आमच्यावर किती अन्याय होतोय पहा असा आक्रस्ताळेपणा अजिबात न करता. प्रत्येक पात्राचा एक स्वतंत्र स्वभाव रेखाटला आहे. पिकलेल्या दाढी मिशांबरोबर आलेला विचारातला व्यावहारिकपणा आणि प्रथा परंपरा जोपासणारा कुटुंबप्रमुख. तर नवी पिढी नवी स्वप्न पाहणारी. कधीकधी त्यातच हरवणारी. आणि वेळ पडलीच तर अंगातली रगदेखील दाखविणारी. गावातल्या नवसंरजामी वृत्तीदेखील अगदी सहज मांडली आहे. या साऱ्या भावभावना अगदी साध्या साध्या संवादातून आणि वागणूकीतून अगदी सहजपणे जाणवतात. हीच खरी तर याच्या दिग्दर्शनाची यशाची पावती आहे. तर दुसरीकडे सामाजिक भाष्य करतानादेखील दिग्दर्शक संयमाने, वास्तववादी रचना अकृत्रिमपणे मांडली आहे.
ऑडीओग्राफी आणि सिनेमॅटोग्राफी ही या चित्रपटाची बलस्थानं. कॅमेरा पॅनिंगदरम्यान काही ठिकाणाचा नवखेपणा सोडला तर एकंदरीतच सारा कॅमेरा बोलका आहे. विशेषत: अशा फिरत्या धनगर वाडय़ावरच रात्रीचं जगणं दाखवतानाचा प्रकाशाचा उपयोग मोजका, नेमका आणि परिणामकारक झाला आहे. शेळ्या, मेंढय़ांना चुचकारणं, हाकारणं, शेळ्या मेंढय़ांचे आवाज आणि हालचाली हे सारं खुल्या रानावरचा अवकाश सांभाळत चित्रपटाची मस्तपैकी ध्वनीप्रतिमाच तयार झाली आहे.
एक-दोन अपवाद सोडले तर बाकी सर्व कलाकारांसाठी चित्रपट माध्यम नवीन आहे. अशा वेळी एक प्रकारचं अवघडलंपण, बोलण्यात कृत्रिमता येऊ शकते. पण, या सर्वाचाच पडद्यावरचा वावर पाहील्यावर दिग्दर्शकाने त्यांच्यावर मेहनत घेतल्याचे स्पष्ट जाणवते. तारुण्यात पदार्पण केलेला बाळू किमान संवादातून पण, त्याच्या हावभावातून अगदी सहज उलगडतो. त्याचं स्वप्नील जग, कुस्तीत रग जिरवणारं जगं, आपल्याच मस्तीत वावरणं आणि त्याचवेळी कुटुंबाची जबाबदारी पेलण्यासाठी खंबीरपणे उभं राहणं. त्याला संवाद कमीच आहेत. पण, हे सारं त्यांनी देहबोलीतून समर्थपणे मांडलं आहे.
या सर्वाचा एकसंध परिणाम म्हणजे ‘ख्वाडा’ हा चित्रपट आहे. एखाद्या काल्पनिक गोष्टीत स्वप्नरंजनात रमविण्यापेक्षा दिग्दर्शकाने एक सामाजिक दृष्टी ठेवत चांगली कथा मांडली आहे. आज धनगरांचं आयुष्य असंच आहे का? ते असेच भटकतात का? आजही असा अन्याय होतो का? वगैरे प्रश्न अनेक चिंतातूर जंतूना पडू शकतात. पण, चित्रपटाची मांडणी करताना दिग्दर्शकाने प्रतिकात्मक प्रसंगांचा- कुस्ती, शेळ्या मेंढय़ांच्या हालचाली, गावातला बाजार, संरंजामशाहीकडे झुकत चाललेली नवी समाजरचना – एक अप्रितम कोलाज उभा करत ह्य़ा साऱ्या प्रश्नांची उत्तर दिली आहेत. पण, हे करताना चित्रपट शब्दबंबाळ होऊ दिला नाही. किंबहुना धनगरी भाषेचा पुरेपूर वापर करुन प्रत्येक प्रसंग जिवंत झाला आहे. केवळ प्रयोग म्हणून केलेला, वंचितांची दु:खं मांडणारा म्हणून पाहता येणार नाही. प्रत्येकाची जगण्याची व्याख्या मांडणारा, जगण्याचा आनंद दाखविणारा, जगण्याची दिशा दाखविणारा आणि बदल मांडणारा असा एक परिपूर्ण चित्रपट म्हणावा लागेल. या कथेची झिंग खरे तर हळूहळू आपला ताबा घेत जाते. अशा वेळी मध्यंतर हाच खोडा वाटू लागतो.
खोडा म्हणजे दुसऱ्याला लोळवण्यासाठी घातलेला मोडता, अडथळा. मग तो समाजातल्या एखाद्या वर्गाला घातला असो की कुस्तीतला असो. त्यातून एक हतबलता येते. तो खोडा तोडून स्वत:ला सिद्ध करण्याची धडपड प्रत्येकालाच असते. कधी ना कधी तरी हा खोडा सोडवावाच लागतो. युक्तीने असो की शक्तीने. भाऊराव कऱ्हाडे यांनी खोडय़ाची संकल्पना वापरुन समाजालाच पडलेल्या खोडय़ाचं अंगावर येणारं चित्रिकरण ‘ख्वाडा’ मधून करुन हा खोडा तोडायचा प्रयत्न केला आहे.
कथासूत्र
रघू कऱ्हे हा धनगर आपल्या कुटुंबकबिल्यासह शेळ्या, मेंढय़ाच्या पोटापाण्याची सोयीसाठी मूळ गावापासून लांबलांबच्या गावात रानोमाळ भटकत असतो. धनगरी आयुष्याचा हा एक अविभाज्य भाग. लग्न झालेला थोरला मुलगा, त्याची बायको, दोन चिल्ली पिल्ली, तारुण्यात पदार्पण केलेला बाळू आणि पन्नास-शंभर शेळ्यामेंढय़ा असा त्याचा रघू कऱ्हेचा वाडा गावोगाव भटकत असतो. रघू तसा नेमस्त. जेथे जाऊ तेथे सर्वाना धरुन राहणारा. समाजाच्या रीतीभाती जोपासणारा. अन्याय झाला तरी पडती बाजू घेणारा. घरच्या पातळीवर प्रतिगामी वाटणारा, पण शेळ्यामेंढय़ांवर जीवापाड प्रेम करणारा. तर तरुण बाळू ही चाकोरी सोडून एका जागी स्थिरावण्याची इच्छा बाळगून असलेला. वयानुसार आलेला रगेलपणा जोपासणारा. गरज पडलीच तर दोन हात करायची खुमखुमी असणारा. पण, तरीदेखील बराच संयमी. एका मुक्कामी गावातल्या सरपंचाच्या मुजोरीचा फटका वाडय़ाला बसतो. त्यातच चाऱ्याचीदेखील कमतरता भासू लागते. बाळूचं लग्नदेखील ठरते. पण, सरपंच वारंवार खोडा घालत असतो. त्यातूनच मग वाडय़ाची तगमग वाढू लागते आणि खोडा सोडविण्यासाठी निर्वाणाची कृती करावी लागते.
चंद्रशेखर मोरे प्रस्तुत
निर्माता – विठ्ठलराव नानासाहेब कऱ्हाडे, भाऊराव नानासाहेब कऱ्हाडे
सहनिर्माता – चंद्रकांत मारूती राऊत
लेखक-दिग्दर्शक – भाऊराव कऱ्हाडे
छायालेखक – वीरधवल पाटील
संगीत – रोहित नागभिडे
संकलक – रोहन पाटील
कला दिग्दर्शक – संदीप इनामके
ध्वनि संयोजक – महावीर सबनवार
कलावंत – भाऊसाहेब शिंदे, शशांक शेंडे, सुरेखा, अनिल नगरकर, प्रशांत इंगळे, चंद्रकांत धुमाळ, हेमंत कदम, लक्ष्मण मांढरे, इंद्रभान कऱ्हे, योगेश डिंबळे, वैशाली केंदळे, वैष्णवी धोरे, रसिका चव्हाण, ढोकळे मामा, रघुनाथ आंबेकर, सचिन मोरे, दीपक ओहळ, तांबे, स्नेहल भांगे, यशराज कऱ्हाडे, जागृती कुलाल, सोमनाथ वाघमोडे व अन्य.
First Published on October 23, 2015 12:51 pm
Web Title: Marathi Movie Khwada Review By Lokprabha
टॅग: Khwada,Marathi-Movies,Movie-Review,National-Award-Winner
.................
http://www.loksatta.com/manoranjan-news/review-of-marathi-movie-khwada-1154121/
मराठी चित्रपटांमध्ये अस्सल मातीतला सिनेमा हे बिरुद मिरविणारा नवा चित्रपट म्हणजे ‘ख्वाडा’ होय. ख्वाडा या शब्दाचा अर्थ ‘अडथळा’ असा आहे. त्याचबरोबर कुस्तीमध्येही खोडा घालतात तोही एक विशिष्ट अर्थ आहे. या दोन्ही अर्थाचे प्रतीक म्हणून या चित्रपटाचे शीर्षक बनले आहे. प्रत्येकालाच आयुष्यात काही ठोस असे ईप्सित साध्य करायचे असते त्यात अनेक अडथळे येतात, त्यावर मात करून पुढे जायचे असते. रूढार्थाने प्रत्येक चित्रपटात नायकाची किंवा अन्य महत्त्वाच्या व्यक्तिरेखांचा संघर्ष दाखविलेला असतो. या चित्रपटातही तो संघर्ष आहे. मेंढपाळ कुटुंबाचा हा संघर्ष हाच त्यांचा जगण्याचा भाग आहे हे चित्रपट अधोरेखित करतो. अतिशय अल्प संवाद आणि मेंढपाळांच्या बोलीभाषेतील संवादावर भर असलेला हा चित्रपट प्रत्येक चित्रचौकटीतून हळूहळू उलगडत जातो आणि चित्रपट पाहताना प्रेक्षकांची हळूहळू पकड घेत जातो आणि एका निर्णायक क्षणाला पोहोचतो. खरे तर अस्सल मातीतला सिनेमा असे वर्णन करता येईल.
स्वातंत्र्यानंतर इतकी वर्षे उलटून गेली तरीही मेंढपाळ समाजाचे वास्तव असे असू शकते हे कोणताही आक्रस्ताळेपणा न करता सहजपणे दाखविण्यात आले आहे हे या चित्रपटाचे वैशिष्टय़ म्हणावे लागेल. चित्रपटातली कऱ्हे कुटुंबाची परिस्थिती आजही असते हे प्रेक्षकाला नव्याने समजते आणि त्यामुळे चित्रपट प्रेक्षकाला अस्वस्थ करतो.
शशांक शेंडे आणि अनिल नगरकर या अभिनेत्यांव्यतिरिक्त बाळू, बाळूची आई, बाळूचा मोठा भाऊ पांडा व अन्य सर्व व्यक्तिरेखांसाठी निवडलेले कलावंत प्रेक्षकांसमोर प्रथमच पडद्यावर आले आहेत. लोकप्रिय कलावंत नसूनही चित्रपटाचे कथानक, संपूर्ण खुल्या आकाशाखाली केलेले छायालेखन, अतिशय उत्कृष्ट ध्वनिसंयोजन, समर्पक संगीत, पाश्र्वसंगीत, वेशभूषा, कला दिग्दर्शन यांतील उत्कृष्टतेची साथ लाभल्याने चित्रपट अपेक्षित परिणाम साधून प्रेक्षकाला सुरुवातीपासून शेवटापर्यंत खिळवून ठेवण्यात प्रचंड यशस्वी ठरतो.
रघू कऱ्हे हा मेंढपाळ कुटुंबाचा प्रमुख. चाळीस-पन्नास मेंढय़ा, रघू कऱ्हेची बायको, मोठा मुलगा, त्याची बायकामुले आणि धाकटा मुलगा बाळू असे बिऱ्हाड आहे. वन खात्याने जमीन घेतल्यामुळे कऱ्हे कुटुंबावर मेंढय़ांसाठी चाऱ्याच्या शोधात गावोगाव भटकण्याची वेळ येते. मेंढय़ांचा ‘वाडा’ घेऊन ते या गावातून त्या गावात स्थलांतर करतात. या स्थलांतरादरम्यान निरनिराळ्या गावात, गावाबाहेरच्या माळरानावर खुल्या आकाशाखाली वास्तव्य करतात, चूल मांडतात, मेंढय़ांची खरेदी-विक्री करतात, मेंढय़ांना न्हाऊमाखू, चारा खायला घालतात आणि पुढल्या प्रवासाला निघतात. मेंढपाळांचे जगणे, त्याचे मर्मभेदक चित्रण या चित्रपटात केले आहे.
जमीन वन खात्याने घेतल्यानंतर आता दहा वर्षे उलटून गेली तरी रघू कऱ्हे न्यायालयात खटला लढवितो आहे. मेंढय़ांचे पालनपोषण करणे, त्यांच्यासाठी चारा शोधत िहडणे यात रघू कऱ्हेचा मोठा मुलगा पांडा आणि धाकटा मुलगा बाळू नेहमीच व्यस्त असतात. त्यातच बाळूचे लग्न करण्याचा प्रस्ताव येतो आणि मुलगी बघण्याचा कार्यक्रम होतो, पसंती होते, तरी काही कारणास्तव लग्न मोडते म्हणजेच अडथळा येतो हा प्रसंग असो की कुस्तीमध्ये जिंकल्यानंतरही बाळूला सरपंचाकडून इनाम मिळण्याऐवजी मार खावा लागतो तो प्रसंग असो की सरपंच अशोक दादा पाटीलच्या गावाबाहेरील शेतात राहायला आल्यानंतर फुकटात चार-दोन मेंढय़ा त्याला द्याव्या लागतात तो प्रसंग असो अशा अनेक छोटय़ा छोटय़ा प्रसंगांतून अतिशय साधेपणाने परंतु नेमकेपणाने चित्रपटाचे शीर्षक उलगडून सांगितले आहे.
मेंढपाळ कुटुंबाचा प्रमुख रघू कऱ्हे वयोमान आणि अनुभवानुसार अधिक व्यवहारी झाला आहे. स्थलांतर करावे लागत असल्यामुळे त्या त्या गावच्या रितिरिवाजानुसार जपून राहावे, गावांतील थोरामोठय़ांशी संघर्ष टाळून पडती बाजू घेऊन मार्गक्रमणा करावी या मताचा आहे. तर कुस्तीगीर रांगडा तरुण असलेल्या बाळूचे मत याविरुद्ध आहे. कुणी अडीबाजी केली, उगाचच त्रास देत असेल तर त्याला धडा शिकवायला हवा असा त्याचा खाक्या आहे. परंतु वडिलांपुढे बाळू गप्प बसतो. मात्र पाणी डोक्यावरून जाते तेव्हा निर्णायक पाऊल उचलतो.
स्वातंत्र्यानंतर अनेक ठिकाणच्या ग्रामीण भागांतील नवीन समाजरचना, नवीन संरजामी वृत्ती आणि ज्यांच्यावर अन्याय होतोय असे समाज, त्यातील लोक, त्यांची मानसिकता अशा दोन्ही प्रकारच्या लोकांचे जगणे संथ परंतु, मर्मभेदी पद्धतीने एकेका चित्रचौकटींतून हळूहळू उलगडून सांगण्याचा प्रभावी प्रयत्न दिग्दर्शकाने केला आहे.
बाळू, रघू कऱ्हे, पांडा, अशोक दादा पाटील अशा सर्व प्रमुख व्यक्तिरेखा या व्यवस्थेचाच भाग आहेत हेच चित्रपट पाहताना प्रेक्षकावर ठसत जाते.
मेंढपाळ कुटुंबातील सर्व व्यक्तिरेखा दाखविताना आणि कथानकातील संघर्ष अधोरेखित करताना सबंध चित्रपटात सारे काही गहन-गंभीर वास्तव प्रसंग दाखविलेले नाहीत. तर बाळू हा ग्रामीण भागात राहणारा मेंढपाळ कुटुंबातील असला तरीही त्याचे लग्न ठरत असताना तो तंद्री लावून स्वप्नाळू बनतो हे सारे अकृत्रिमपणे आणि लाजवाब पद्धतीने प्रेक्षकांसमोर येत राहते.
बाळू, सरपंच अशोक दादा पाटील या दोन्ही व्यक्तिरेखा एकेक प्रवृत्ती दर्शवितात. पहिल्या दृश्यापासून ते अखंड चित्रपट पाहताना दिग्दर्शकाची पकड जाणवेल इतके प्रभावी दिग्दर्शन आहे. हळूहळू चित्रचौकटींतून उलगडत जाणाऱ्या या चित्रपटात मेंढपाळ कुटुंब, खुल्या आकाशाखाली बसलेले रघू कऱ्हेचे कुटुंब, मेंढय़ांचे चरणे, मेंढय़ांना आंघोळ घालणे, त्यांचे औषधपाणी करणे, बाळूचे व्यायाम करणे, नदीत डुबक्या मारणे असे छोटय़ा छोटय़ा प्रसंगांची त्यांच्या अंगभूत संथ लयीप्रमाणे चित्रपटाची लय सांभाळली आहे. त्यामुळे चित्रपट किंचित संथ लयीचा वाटत असला तरी प्रभावी ठरतो.
शशांक शेंडे यांनी रघू कऱ्हे अप्रतिम साकारला आहे. त्यांच्या आतापर्यंतच्या शहरी तसेच ग्रामीण बाजाच्या भूमिकांपेक्षा सर्वथा निराळ्या छटेची भूमिका करण्याची संधी त्यांना या चित्रपटात मिळाली असून त्या संधीचे त्यांनी सोने केले आहे. बाळू आणि सरपंच अशोक दादा पाटील यांच्या भूमिकांमधील अनुक्रमे भाऊसाहेब शिंदे आणि अनिल नगरकर यांनीही जीव ओतून काम केले आहे. भाऊसाहेब शिंदे यांचा हा पहिला चित्रपट आहे असे अजिबात प्रेक्षकाला जाणवणार नाही.
चंद्रशेखर मोरे प्रस्तुत
ख्वाडा
निर्माता – विठ्ठलराव नानासाहेब कऱ्हाडे, भाऊराव नानासाहेब कऱ्हाडे
सहनिर्माता – चंद्रकांत मारुती राऊत
लेखक-दिग्दर्शक – भाऊराव कऱ्हाडे
छायालेखक – वीरधवल पाटील
संगीत – रोहित नागभिडे
संकलक – रोहन पाटील
कला दिग्दर्शक – संदीप इनामके
ध्वनिसंयोजक – महावीर साबन्नावर
वेशभूषा – भाऊसाहेब शिंदे
कलावंत – भाऊसाहेब शिंदे, शशांक शेंडे, सुरेखा, अनिल नगरकर, प्रशांत इंगळे, चंद्रकांत धुमाळ, हेमंत कदम, लक्ष्मण मांढरे, इंद्रभान कऱ्हे, योगेश डिंबळे, वैशाली केंदळे, वैष्णवी धोरे, रसिका चव्हाण, ढोकळे मामा, रघुनाथ आंबेकर, सचिन मोरे, दीपक ओहळ, तांबे, स्नेहल भांगे, यशराज कऱ्हाडे, जागृती कुलाल, सोमनाथ वाघमोडे.
सुनील नांदगावकर – sunil.nandgaokar@expressindia.com
First Published on October 25, 2015 3:43 am
Web Title: Review Of Marathi Movie Khwada
टॅग: Khwada,Marathi-Movie-Khwada,National Award Winning Marathi Film Khwada
....................
http://www.loksatta.com/manoranjan-news/marathi-movie-khwada-2-1152155/
‘ख्वाडा’चे प्रदर्शन पाच वेळा स्थगित- भाऊराव कऱ्हाडे
सध्या राज्यात वेगवेगळ्या कारणांमुळे शेतकरी आत्महत्येचा पर्याय स्विकारत आहे.
प्रतिनिधी, नाशिक | October 20, 2015 08:03 am
सध्या राज्यात वेगवेगळ्या कारणांमुळे शेतकरी आत्महत्येचा पर्याय स्विकारत आहे. मी मूळ शेतकरी आहे. माझ्या जवळ जमीन ठेवुन आत्महत्या करण्यापेक्षा ती विकून काहीतरी सृजनात्मक निर्मिती करेल या विचाराने आपण बागायती जमीन विकली. त्या रकमेतून ‘ख्वाडा’ चित्रपटाची निर्मिती केली असून दिवाळी नंतर दुसऱ्या चित्रपटावर काम सुरू करणार असल्याचे दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांनी सांगितले.
चंद्रशेखर मोरे प्रस्तुत आणि भाऊराव कऱ्हाडे लिखीत, दिग्दर्शित १३ विविध पुरस्कारांनी नावाजलेला ख्वाडा मराठी चित्रपट दसऱ्याच्या मुहूर्तावर राज्यात रसिकांच्या भेटीस येत आहे. या पाश्र्वभूमीवर, सोमवारी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शशांक शेंडे, नवोदित कलाकार भाऊसाहेब शिंदे आणि अनिल नगरकर, मोरे यावेळी उपस्थित होते. चित्रपटाला विविध पुरस्कार प्राप्त झाले. त्याच कालावधीत वेगवेगळे राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट पडद्यावर येत होते. त्यामुळे चित्रपटाच्या भाऊगर्दीत आपला चित्रपट नको म्हणून आम्ही चित्रपट प्रदर्शन लांबणीवर टाकले. त्यात निधीही पुरेसा उपलब्ध होऊ शकला नाही तसेच अन्य काही कारणांमुळे पाच वेळा चित्रपट पुढे ढकलला गेला. चित्रपटात सर्व नवखे कलाकार असले तरी मातीत राबणारे आहे. यातील एकाही कलाकाराने रंगभूषा केलेली नाही. कलाकाराला विषय समजावा, भूमिकेचे विविध आयाम लक्षात यावे यासाठी प्रत्यक्ष चित्रीकरण ज्या ठिकाणी करायचे आहे, त्या ठिकाणी जाऊन दोन महिने कार्यशाळा घेतली. त्यामुळे ग्रामीण भागातील जीवनमान, बोलीभाषा याचा अभ्यास त्यांना करता आला.
दुसरीकडे आपसूक त्यांची त्वचा काळंवडल्याने वेगळ्या रंगभूषेची गरज पडली नाही. यातील नायक व खलनायक ग्रामीण भागातील असले तरी अभिनेत्री रसिका चव्हाण ही मुंबईची आहे. चित्रपटात तिला एकही संवाद नाही. तिने जो काही संवाद साधला तो डोळे आणि देहबोलीच्या माध्यमातून. एकही संवाद तिच्या तोंडी नसतांना तिची भूमिका लक्षात राहण्यासारखी असल्याचे कऱ्हाडे यांनी सांगितले. शिंदे यांनी शेतकऱ्यांसमोर सध्या नैसर्गिक तसेच मानवनिर्मित विविध संकटे उभी असल्याचे सांगितले. त्यातून बाहेर पडतांना आत्महत्येचा अवलंब करण्यापेक्षा मी शेतकरी आहे, मी लढणार असे म्हणून तो स्थलांतराचा पर्याय निवडतो. मात्र स्थलांतराने प्रश्न सुटतात असे नाही तर नव्याने वेगळ्या प्रश्नांची मालिका समोर उभी राहते. याच मालिकेचे प्रतिनिधीत्व करणारे मेंढपाळ कुटूंब चित्रपटात दाखविण्यात आले आहे.
चित्रपटात वैष्णवी ढेरे, योगेश डिंबळे, चंद्रकांत धुमाळ, प्रशांत इंगळे, वैशाली केंदळे यांच्यासह अन्य कलाकारांनी विविध भूमिका साकारल्या आहेत.
First Published on October 20, 2015 8:03 am
Web Title: Marathi Movie Khwada 2
टॅग: Khwada,Marathi-Movie,Nashik
...............................

No comments:

Post a Comment