Friday, February 26, 2016

अभिजात दर्जासाठी लोक चळवळ हवी
1. बारा वर्षांपूर्वी केंद्र सरकारने तामीळ भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला. त्यानंतर संस्कृत, तेलगु, कन्नड, मल्याळम् आणि उडीया या भाषांनी हा दर्जा पटकावला. अमृतातेही पैजा जिंकणारी मराठी ही जगातली दहाव्या क्रमांकाची भाषा आहे. मराठीला हा दर्जा मिळावा यासाठी महाराष्ट्र सरकारने नियुक्त केलेल्या रंगनाथ पठारे समितीने सखोल संशोधन करून सुमारे पाचशे पृष्ठांचा अहवाल तीन वर्षांपुर्वी सादर केला. केंद्र सरकारचे या दर्ज्यासंदर्भातील चारही निकष ती पूर्ण करते याचे असंख्य पुरावे त्यात सादर करण्यात आलेले आहेत. साहित्य अकादमीच्या भाषातज्ञांच्या समितीने एकमताने हा अहवाल संमत केला व हा दर्जा मराठीला तात्काळ द्यावा अशी शिफारस केंद्र सरकारला केली त्याला 1 वर्ष उलटून गेले आहे.

2. जी भाषा रोजगार देते तीच टिकते. उदा. इंग्रजी. अभिजाततेच्या दर्जानंतर केंद्राकडून महाराष्ट्राला दरवर्षी सुमारे ५०० कोटी रुपये मिळतील. सध्या महाराष्ट्र सरकारने मराठी भाषेसाठी केवळ २५ कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे. ही रक्कम अतिशय तोकडी आहे. त्यात तब्बल २० पटीने वाढ होईल. मराठी 800 विद्यापीठांमध्ये शिकवली जाईल. वाचनसंस्कृती, साहित्यप्रकाशन आणि ग्रंथविश्वाला मोठा हातभार लागेल. मराठी शिकणे, शिकवणे, साहित्य प्रकाशित करणे, त्याचे सर्व जागतिक भाषामध्ये अनुवाद करणे या प्रक्रियांना प्रोत्साहन मिळेल. मराठीच्या ५२ बोलीभाषांचा सर्वांगाने अभ्यास होईल. मराठी ज्ञानभाषा म्हणून विकसित होईल.

3. मराठी बोलणारे लोक आज देशाच्या ३६ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात आणि जगातल्या १०० देशांमध्ये महत्त्वाच्या पदांवर कार्यरत आहेत. ही फक्त एका प्रांताची भाषा नसून, ती महत्त्वाची राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय भाषा आहे. मराठीत दरवर्षी सुमारे अडीच हजार पुस्तके प्रकाशित होतात. कोश वाङमयाच्या बाबतीत मराठी जगातली दुसरी समृद्ध भाषा आहे. मराठीतील विनोदी व वैचारिक साहित्य जागतिक तोडीचे आहे. मराठीत दरवर्षी पाचशे दिवाळी अंक निघतात आणि छोटीमोठी सुमारे दोनशे पन्नास साहित्य संमेलने होतात. नामवंत खाजगी प्रकाशन संस्था आणि सरकारी प्रकाशने, पाठ्यपुस्तके, धार्मिक, ललित आणि वैचारिक ग्रंथ यांची वार्षिक उलाढाल सुमारे अडीचशे कोटी रुपयांपर्यंत आहे. बालभारती ही जगातील सर्वात मोठी प्रकाशन संस्था असून ती दरवर्षी नऊ कोटी पुस्तके विकते. देशातील एकूण ग्रंथालयांपैकी २५ टक्के ग्रंथालये एकट्या महाराष्ट्रात आहेत. लोकराज्य हे भारतातले नंबर एकचे मासिक आहे. मराठीतील अनेक वृतपत्रे देशातील आघाडीची वर्तमानपत्रे आहेत.

4. अभिजाततेचा सर्वाधिक महत्त्वाचा निकष आहे, भाषेची आणि साहित्याची श्रेष्ठता. भाषेचे वय सांगणारे लिखित दस्तावेज दीड ते दोन हजार वर्षांचे असावेत, भाषिक आणि वाङमयीन परंपरा स्वतंत्र आणि स्वयंभू असावी, प्राचीन भाषा आणि तिचे आधुनिक रूप यांच्यात खंड असला तरी त्यात नाते असावे हे सर्व निकष मराठी पूर्ण करते.

5. पाच प्रकारची कामे या दर्जामुळे मार्गी लागतील. 52 बोलीभाषांचे संशोधन, संपादन आणि संकलन यांना गती मिळेल. मराठीत आजवर एक लाखांपेक्षा अधिक ग्रंथ प्रकाशित झालेले आहेत. त्यातील अभिजात ग्रंथ जगातील किमान १०० भाषांमध्ये अनुवादीत केले जातील. जगातील सर्व अभिजात ग्रंथ मराठीत आणले जातील. सर्व मराठी पुस्तके रास्त/अल्प किमतीला मिळतील. विद्यार्थी, संस्था, अभ्यासक यांना भरघोष शिष्यवृत्ती देऊन मराठीच्या विकासासाठी येईल. मराठी शाळांचा दर्जा सुधारणे, मराठीतून शिकलेल्या यशस्वी लोकांच्या यशोगाथा समाजासमोर मांडून मराठीचा न्यूनगंड कमी करणे, साहित्य संस्था, व्यक्ती यांना सर्वप्रकारचे बळ देणे आणि पर्यायाने मराठीचा प्रचार, प्रसार वाढवणे, मराठीचे गोमटे व्हावे यासाठी हा दर्जा आवश्यक आहे.

चला यासाठी लोक चळवळ उभी करूया. हा दर्जा तात्काळ देण्यासाठी केंद्र सरकारवर लोकशक्तीचा दबाव आणूया.
.........................
-- प्रा. हरी नरके
समन्वयक - अभिजात मराठी भाषा समिती.