Sunday, December 18, 2016

तो चहा कायम कोरला गेलाय

मी शाळेत चौथीत असतानाची गोष्ट.

असेच डिसेंबर महिन्यातले थंडीचे दिवस होते. कडाक्याची थंडी पडलेली होती. रेल्वेने मी एकटाच मामाच्या गावी चाललो होतो. एका मधल्या स्टेशनवर गाडी थांबलेली होती.

एक छोटा, फाटके कपडे घातलेला गरिब मुलगा तोंड दीनवाणे करून मला म्हणाला, "चहा प्यायला दहा पैसे द्याना. खूप थंडी वाजतेय."

खरंतर मीही खूप गारठलेलो होतो. मी वैतागून म्हटलं, "माझ्याकडे दहाच पैसे आहेत आणि मलाही चहा प्यायचाय."
तेव्हा रेल्वेतला कटींग चहा 20 पैशाला मिळायचा.

तो मुलगा पटकन पुढे आला, त्याने त्याच्या खिश्यात हात घातला, 10 पैसे काढले आणि मला म्हणाला, "दोस्ता, माझ्याकडेही दहाच पैसे आहेत. हे तू घे. तू तरी चहा पी."

मला खूप लागलं ते. मी ते पैसे घेतले नाहीत. 

त्याने मला बराच आग्रह केला.

मी त्याचे पैसे घेत नाही म्हटल्यावर त्याने परत माझ्याकडे पैसे मागितले.
मी माझे 10 पैसे त्याला देऊन टाकले.

त्याने शेजारच्या चहावाल्याकडून चहा विकत घेतला.

अर्धा चहा असलेला कप त्याने मला दिला नी कपातला निम्मा बशीत ओतून तो प्यायला."

इतकी वर्षं झाली या घटनेला पण हा चहा कायम कोरला गेलाय माझ्या डोक्यात आणि जिभेवरही!