Saturday, December 31, 2016

आणि विखेंनी कुलगुरूंचे शिर्डीचे खासदारकीचे तिकीट अलगद कापले

कुलगुरूसाहेब तुम्हाला शेतीतले ** ही कळत नाही --
दिवंगत बाळासाहेब विखे हे अत्यंत कर्तबगार, मृदू, अभ्यासू आणि लोकसंग्राहक व्यक्तीमत्व होते.
ग्रामीण भागात य माणसाने अतिशय मोठे विश्व निर्माण केले होते.
विखे वादविवाद स्पर्धा, व्याख्यानमाला, साहित्य पुरस्कार या निमित्ताने त्यांच्याशी अनेकदा जवळून संबंध आला.
1. एकदा त्यांच्यासोबत प्रवास करीत असताना त्यांनी कार एका गावातील आठवडी बाजारात थांबवली.
गाडीतून उतरून घासाघीस करून भरपूर ताजा भाजीपाला खरेदी केला.
एक केंद्रीय राज्यमंत्री असा बाजारहाट करताना बघणे हा मस्त अनुभव होता.
मी त्यांना विचारले, नेहमी तुम्हीच बाजारहाट करता?
ते हसले आणि म्हणाले, " मी सलग 8 दिवस घराबाहेर होतो, सर. आता घरी गेलो की आमची कारभारीण चिडणार. पण नवर्‍याने आठवणीने असा ताजा भाजीपाला आणलेला बघून ती खूष होणार. तिचा राग कुठच्याकुठे पळून जाणार."
आणि झालेही तसेच. आम्ही त्यांच्या घरी पोचलो. त्यांच्या पत्नी रागावलेल्या आहेत, हे त्यांच्या देहबोलीवरून कळत होतं. मात्र जसा का त्यांनी पोतंभर भाजीपाला नवर्‍यानं आणलेला बघितला, त्या अपार खूष झाल्या. कुठंही गेले तरी नवर्‍याला घराची आठवण असते या भावनेने त्या खूश झाल्याचे उघड दिसत होते.
2. पुणे विद्यापिठाला मध्यंतरी एक बोलभांड आणि बेरकी कुलगुरू लाभले होते. ते त्यावेळच्या पंतप्रधानांच्या आपण किती जवळचे आहोत असा देखावा बेमालूमपणे करायचे. [ आता ते विद्यमान पं.प्र.च्या जवळचे असल्याचे सांगत असतात.]
त्यांना पुण्याचे खासदार व्हायचे होते. त्यांनी पुण्यात एका वर्षात साडेतीनशे सार्वजनिक कार्यक्रम घेतले. ते विद्यापिठात नसायचेच.
विद्यापिठाच्या कामासाठी त्यांना भेटायचे असेल तर एखाद्या मुतारीच्या किंवा कसल्या तरी उद्घाटनाला जावे लागायचे. तिथे ते हमकास भेटायचे.
तथापि पुण्यात कलमाडींमुळे डाळ न शिजल्याने त्यांनी विखेंच्या मतदारसंघात, शिर्डीला, खासदार व्हायचे ठरवले. विद्यापिठाच्या एका प्राध्यापकांच्यामार्फत कुलगुरू महोदयांनी विखेंना जेवायला बोलावले.
विखेंसमोर शेतकरी आत्महत्त्या या विषयावर प्रवचन द्यायला कुलगुरूंनी सुरूवात केली. खरे तर विखेंचा या विषयातला दांडगा अभ्यास होता. तास दीडतास कुलगुरूंची पोपटपंची ऎकून विखेंचा संयम सुटला.
त्यांनी संयतपणे कुलगुरूंच्या विधानातील अनेक भंपक गोष्टींमधील तर्कदुष्टता दाखवायचा प्रयत्न केला. परंतु "आपण जागतिक किर्तीचे अर्थशास्त्रज्ञ आहोत. विखे तुम्हाला शेतीतले काहीही कळत नाही" वगैरे बडबड कुलगुरूंनी सुरू करताच विखे उठले, म्हणाले," सर, आम्ही अडाणी असलो तरी शेती आमच्या रक्तात आहे. कुलगुरू, तुम्हाला शेतीतले ** ही कळत नाही. तुमचे जेवण नको,पण ही भंकस आवरा." आणि विखे ताडताड निघून गेले.
आणि पुढे विखेंनी कुलगुरूंचे शिर्डीचे खासदारकीचे तिकीट अलगद कापले.
......................