Friday, January 13, 2017

मानवी भावभावनांची प्रभावी गुंफन करणारा चित्रपट महोत्सव

1..........

PIFF, 15th Edition, 12 to 19 Jan. 2017
पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, 12 जाने. ते 19 जाने. 2017
जगभरातले दर्जेदार असे ताजे [ 2015/2016 सालातले ] निवडक चित्रपट पाहण्याची सुवर्णसंधी म्हणजे हा चित्रपट महोत्सव असतो.
या वर्षीच्या महोत्सवाची सुरूवात "Thank You for Bombing" दिग्दर्शक Barbara Eder, Switzerland या चित्रपटाने झाली. प्रसिद्ध पत्रकार होण्याची तीव्र इच्छा असलेली लाना ही टिव्ही चॅनलसाठी काबूलमधून अफगाणिस्थानच्या युद्धाचे वार्तांकन करीत असते. इवाल्ड आणि काल या दोन पुरूष पत्रकारांनाही तिथे काम करण्याची संधी मिळते. हे तिघे तीन वेगवेगळ्या साहसातून जाताना त्यांच्यावर ओढवलेली जीवघेणी परिस्थिती चित्रित करणारा हा चित्रपट अंगावर काटा आणणारा आहे. अफगाणी अतिरेकी उन्मादाचे आणि युद्धजन्य संहाराचे जे चित्रण या चित्रपटात येते ते युद्धाविषयी घृणा निर्माण करणारे आहे. वाहिन्यांमधली जीवघेणी स्पर्धा आणि त्यासाठी लढवल्या जाणार्‍या क्लूप्त्या यांचे चित्रण करताना या तीन पत्रकारांना ज्या भीषण अनुभवांना सामोरे जावे लागते ते प्रत्यक्ष अनुभवायला लावणारा अतिशय दर्जेदार चित्रपट.

1. Rauf, Dir.Boris Kaya & Soner Caner, Turkey, कोवळ्या वयातल्या पहिल्या प्रेमाची हळूवार कहाणी मांडणारा अतिशय गोड सिनेमा. 11 वर्षाचा रौफ त्याच्यापेक्षा वयाने मोठ्या [20 वर्षे] वयाच्या झानाच्या प्रेमात पडलाय. ती त्याच्या मालकाची मुलगी आहे. तो तिथे कोफीन बनवण्याचे काम करत असतो. झानाला पिंक कलरचा स्कार्फ त्याला भेट द्यायचा असतो. त्यासाठी गावचा अख्खा बाजार तो पालथा घालतो. त्याला तसा स्कार्फ मिळत नाही. त्याची आजी त्याला सांगते, दूर एका डोंगरावर पिंक रंगाची सुंदर फुले असतात. या हळुवार प्रेमकहाणीचा शेवट शोकांत आहे. झानाचा मृत्यू झाल्यावर हा पोरगा जिवाच्या कराराने डोंगरावर जातो आणि गाडीभर फुलं आणून तिच्या कोफीनवर उधळतो. फॅंड्रीचा अगदी वेगळा पण तरल अनुभव.

2. Playground, Dir.Bartosz M Kowalski, Poland, तीन वेगवेगळया कौटुंबिक पार्श्वभुमीवरील 3 मुले एकत्र शिकत असतात. एकजण आपल्या आजारी आणि पंगु वडीलांची मनोभावे सेवा करणारा आहे,पण त्याच्या मनात हिंसा भरून राहिलेली आहे. दुसरा मुलगा आपल्या धाकट्या भावाला अतिशय क्रुरपणे वागवणारा आहे. मुलगी मात्र अतिशय आत्ममग्न आहे. भित्री आहे. हे दोघे तिचे जे भयानक रॅगिंग करतात ते अंगावर येणारे आहे. त्यांच्या पदवी शिक्षणाच्या शेवटच्या दिवशी या मुलांमधली आक्रमकता, हिंसा आणि गुन्हेगारीची मानसिकता यांचा स्फोट होताना दिसतो. पाश्चात्य जगातील तरूणाईतली हिंसकता कल्पकतेने आणि प्रतिकात्मतेने  मांडणारा एक महत्वाचा चित्रपट.

3. The Innocents, Dir. Anne Fontaine,France, दुसर्‍या महायुद्धात रशियन सैनिकांनी एका चर्चमधील अनेक नन्सवर बलात्कार केलेले असतात. त्या गरोदर असतात. रेडक्रासमध्ये काम करणारी एक नर्स या नन्सची बाळंतपणे करते. धार्मिक गैरसमजुतींमुळे मुख्य नन्स त्या नवजात बालकांची उघड्यावर त्यांना सोडून देऊन एकप्रकारे हत्त्या करते. कोवळ्या बाळांपासून ताटातूट झालेल्या या नन्सची कुतरओढ, नर्सचे धैर्य आणि माणुसकी याचा भव्य पट उलगडत जातो. शेवटी त्या नर्सच्या प्रयत्नाने गावातल्या सगळ्या बेवारस मुलांना नन्सच्यारूपाने आया मिळतात. लादलेले मातृत्व, धार्मिक संस्कार आणि माणुसकी यांची हळूवार गुंफन करणारा उत्तम चित्रपट. एका सत्यकथेवर आधारलेला हा चित्रपट काळजाला हात घालतो.

4. Godless, Dir. Ralitza Petrova, Bulgaria, बल्गेरिया या पाश्चात्य देशामध्ये सिनियर सिटीजन्ससाठी शासनाने त्यांची सामाजिक सुरक्षा बघण्यासाठी नेमलेली एक नर्स ड्रगच्या आहारी गेलेली असल्याने ती सिनियर सिटीझन्सची आयकार्डे चोरून त्याचा गैरवापर करीत असते. तिचे वागणे चारित्र्यहीन असते. ती सुखाच्या शोधात अनेक चुकीची पावले टाकीत जाते. गुन्हेगारीच्या रस्त्यावर तिची होणारी घसरण, ह्या मार्गावर कधीही शांतता आणि सुख असू शकत नाही यांची प्रतिकात्मक कथा प्रभावीपणे सांगणारा सुंदर चित्रपट.
...........................

No comments:

Post a Comment