Wednesday, February 15, 2017

शांताबाई...मला शांताबाईंचं लेखन खूप आवडायचं. त्यांनी केलेला अनुवाद "चौघीजणी" तर मला खूपच आवडलेला.

कमलताई आणि शांताबाई सख्ख्या मैतरणी.

एकदा कमलताईंनी मला शांताबाईंच्या पेन्शनचं काम अडलेलं सांगितलं. मी शांताबाईंना भेटून माहिती घेतली तर त्या मुंबईच्या एम.डी. महाविद्यालयात प्राध्यापक होत्या. निवृत्त होऊन दहाबारा वर्षे होऊनही त्यांना पेन्शन मिळत नव्हती. त्या म्हणाल्या, "मी हेलपाटे मारून वैतागलेय. ते लोक परतपरत पैसे मागतात. माझी केस सरळ असून मी परत पैसे का द्यावेत?"

मी म्हटलं, "काय सांगताय? तुमच्या सारख्या प्रसिद्ध लेखिकेकडे ते लोक पैसे मागतायत? परत मागतायेत म्हणजे एकदा पैसे देऊन झालेत?"

त्या म्हणल्या, "अरे होना. माझे एक सहकारी म्हणाले, बाई सगळ्याच पेन्शनधारकांना पैसे हे द्यावेच लागतात. नाहीतर कामच होणार नाही."

"माझे हे सहकारी मोठे लेखक, मी म्हटलं तुम्हीच हे पैसे घ्या आणि द्या त्यांना काय ते एकदाचे करा. मी त्यांना पैसे दिले. पण तरीही माझं काम काही झालंच नाही."

त्यावेळी कुमुद बन्सल या शिक्षण सचिव होत्या. मी त्यांना भेटून शांताबाईंची केस सांगितली. कागदपत्रे दाखवली.

कुमुदताईंनी स्वत: ए.जीं.शी बोलल्या. त्या म्हणाल्या राज्यातल्या एव्हढ्या मोठ्या व्यक्तीचं काम तुम्ही लोकांनी करू नये हे फारच खेदजनक आहे." त्यांनी तांत्रिक अडचणी सोडवल्या.

शांताबाईंना पेन्शन मिळू लागली. त्यांना नियमित उत्पन्नाचे दुसरे साधन नव्हते.

त्या जाम खूष झाल्या. मला त्यांनी मी नको नको म्हणत असताना स्वत: भजी करून खायला घातली.

त्या काळात मे महिन्यात पुण्यात मॅजेस्टीक गप्पांचा कार्यक्रम जोरदार व्हायचा.
शेवटच्या दिवशी निवडक लोकांना आमरस पुरीचं जेवन असायचं.

त्या दिवशी पुण्यात रिक्षावाल्यांचा संप होता.

शांताबाईंना एका लेखिकेने सोडलं मॅजेस्टीकवर. पण पुढे त्या लग्नाला गेल्या. आता परत कसं जायचं याची शांताबाईंना काळजी लागलेली. मी म्हणलो, मी सोडतो माझ्या स्कूटरवरून." त्या म्हणल्या " नको रे बाबा. मला स्कूटरची फार भिती वाटते. एकदा मी स्कूटरवरून पडले. तेव्हापासून मी स्कूटरचा धसका घेतलाय. मी बसत नाही."

मी म्हणलं, "तुम्ही काळजी करू नका. मी खूप जपून आणि हळूहळू नेतो."
त्या काही तयार होईनात. मग मी काही मागे हटेना.

शेवटी त्या कशाबशा तयार झाल्या.त्यांनी सतरा अटी घातल्या. मी आपला प्रत्येक अटीला हो म्हणत होतो.

त्यांचा स्कूटरवर बसण्याचा एक कार्यक्रमच झाला. त्या बसताना खूप घाबरत होत्या. कितीतरी वेळ त्या उभ्याच होत्या. मी स्कूटर स्टॅंडवर लावली. त्यांना बसवलं. मग स्कूटर स्टार्ट केली तर त्या ओरडायला लागल्या. रस्त्यातले आजुबाजूचे लोक बघायला लागले. त्यांना वाटलं, मी कोणातरी अनोळखी वृद्ध बाईला पळवूनच नेतोय. प्रसंग अनावस्था होता. मी म्हणलं, "शांताबाई, अशानं लोक मला मारतील ना!"

मग त्या हसायला लागल्या. लोकांना म्हणाल्या, "काय बघताय? तमाशा आहे काय? चला निघा. माझा मुलगाय हा!"

मी शून्याच्या स्पीडनं स्कूटर चालवत होतो. शांताबाई मला घट्ट धरून बसल्या होत्या. त्यांची भिती काही जाईना.

मी म्हणलं, "शांताबाई, नविन काय वाचताय?" ही जादू लागू पडली. त्या बोलायला लागल्या की रसवंती बाहेर पडायची. त्या सांगत राहिल्या आणि त्यांची भिती केव्हा आणि कुठे पळाली ते त्यांनाही कळलं नाही.

मला म्हणाल्या, "शनिपारावर थांबव गाडी. मी दुकानातून काही नवी पुस्तकं घेते. मला त्यांनी नवं कायकाय वाचलस म्हणून विचारलं. मी त्यांना एक होता कार्व्हर भन्नाट असल्याचं बोललो. आणखीही काही नावं सांगितली. आम्ही पुस्तक दुकानात गेलो. त्या कादंबर्‍या, कथासंग्रह, कवितासंग्रहाची नावं सांगू लागल्या. मी त्यांना कार्व्हरचा परत परत आग्रह धरत होतो, पण त्या काही बधेनात. मला राग आला. त्या म्हणाल्या, " आता माझं वय झालं. अरे या वयात आता लाईट वाचते मी. वैचारिक अगदी नको वाटतं."

मी म्हणालो, " अहो ते छानय. अजिबात जड नाही. नक्की आवडेल तुम्हाला." मग केवळ मला बरं वाटावं म्हणून त्यांनी कार्व्हर घेतलं.

आम्ही शून्याच्या स्पीडनं निघालो. सुमारे तासाभराने आम्ही त्यांच्या सातारा रोडच्या घरी पोचलो.
त्यांचा भाऊ दारातच त्यांची वाट बघत होता. तो धावतच आला.

शांताबाईंना माझ्या स्कूटरवरून उतरताना बघून ते जाम भडकले. "तुला काही अक्कल आहे की नाही, पडलीबिडली असतीस म्हणजे?" ते ओरडू लागले. शांताबाई आपल्या गालातल्या गालात हसत होत्या. म्हणाल्या, "पण नाही पडले ना? यानं अगदी जपून आणलं." तरिही त्यांच्या भावाची सरबत्ती काही थांबेना.

मला म्हणाले, कुठे राहता तुम्ही?

मी म्हणालो, पिंपरीला.

म्हणाले, किती उलटं यावं लागलं यांना, सातारा रोडला. शांता, तुला काय कळतं की नाही.

चला आता जेवन करूनच जा.

आमचं जेवन झालेलं होतं.

त्यांचा राग गेलेला बघून मी सटकलो.

पुढच्या आठवड्यात त्यांची भेट झाली तेव्हा आवर्जून म्हणाल्या, अरे ते कार्व्हर फारच गोड आहे. काय मस्त लिहिलय तिनं. मला खूप म्हणजे खूपच आवडलं बघ."

म्हणाल्या, "मी तुझ्या स्कूटरवर बसले होते हे माझ्या ओळखीतल्या कोण्णाकोण्णाला खरं म्हणून वाटतच नाही. मी श्रीपुंना सांगितलं तर त्यांना वाटतं मी फेकतेय. आता तूच मला सांग मी बसले होते की नाही तुझ्या स्कूटरवर? मी आता तुझीच साक्ष काढणार आहे. आणि खरंखरं सांग, मी कुठे घाबरले होते? उगीचच मला नावं ठेवतात. भित्री म्हणून!"