Friday, February 24, 2017

आजच्या दिवसापुरता गणप्याचा गणपतराव

मताधिकार म्हणजे आपण या महान देशाचे मालक असल्याची जाणीव. मतदार यादीत नाव म्हणजे देशाच्या मालकीहक्काच्या 7/12 मध्ये नाव असल्याचा अभिमान.
1952 -- मालक म्हणायचे "काय गणप्या कसं?"
"मालक तुम्ही म्हणतान तसं", गणप्या म्हणायचा.
....................
2017-- मालक म्हणतात, " गणपतराव, आम्ही निवडणुकीला उभे आहोत, आमच्याकडं लक्ष असू द्या."
त्यावर गणप्या, ताठ मानेनं म्हणतय, "मालक इचार करावा लागंन. मिटींग घेताव आन मग ठरवताव आम्ही."
......................
आज आपली लोकशाही सिनिअर सिटीझन झाली. 1952 साली जानेवारीत पहिल्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या. या 65 वर्षात किती मोठा पल्ला गाठला या लोकशाहीने.
माझे आजोबा सांगायचे, पहिल्या निवडणुकीच्या वेळी निवडणुका कशा होतात, मताधिकार काय असतो, सार्‍याच गोष्टींचे अप्रुप होते. त्यापुर्वी ब्रिटीश भारतात फक्त राजे, महाराजे, सरदार, नबाब, आयकर भरणारे सावकार आणि पदवीधर यांनाच मताधिकार असल्याने त्या सर्वांची संख्या 1 टक्क्यापेक्षाही कमी असायची.
1952 ला मोठमोठे मालक लोक निवडणुकीला उभे होते. त्यांनी किल्ल्यांवरून, वाड्यांवरून,हवेल्या किंवा बंगल्यांवरून आदेश दिले की सारे गोरगरिब मतदार हात जोडून मालकांपुढे हजर व्हायचे. मालक म्हणायचे "काय गणप्या कसं?"
"मालक तुम्ही म्हणतान तसं", गणप्या म्हणायचा.
जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीनं सामान्य माणसाला काय दिलं?
आजही मालक आणि मालकीन उभे असतात. फरक इतकाच की त्यांच्या जोडीला, पालावरचे, शेतावरचे, पाड्यावरचे, फूटपाथवरचे असेही उभे असतात, आताशा ते गणप्याला बोलवून घेत नाहीत, तर ते किंवा त्या वस्तीत जातात, झोपडपट्टीत जातात, फाटक्या मतदारासमोर दोन्ही हात जोडून उभे राहतात आणि चेहर्‍यावर कृतक हासू आणून म्हणतात, " गणपतराव, आम्ही निवडणुकीला उभे आहोत, आमच्याकडं लक्ष असू द्या."
गणप्या, ताठ मानेनं म्हणतय, "मालक इचार करावा लागंन. मिटींग घेताव आन मग ठरवताव आम्ही."
...................
या लोकशाहीत अनेक त्रुटी, दोष, दांभिक गोष्टी आहेत, पण तरिही ज्या देशात एकाच देशात अनेक देश नांदतात, एकाच वेळेला 5000 वर्षांपुर्वीचा भारत, 1000 वर्षांपुर्वीचा भारत, आजचा भारत आणि 100 वर्षे पुढचा भारत असे भारत राहत असतात त्या देशात 130 कोटी लोकांना मणके असल्याचा प्रत्यय देणारा हाच एक दिवस असतो.
मताधिकार म्हणजे आपण या महान देशाचे मालक असल्याची जाणीव. मतदार यादीत नाव म्हणजे देशाच्या मालकीहक्काच्या 7/12 मध्ये नाव असल्याचा अभिमान.
संविधानाच्या कलम 326 अन्वये सर्व भारतीयांना सार्वत्रिक मताधिकार देणार्‍या डा.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल आदींना वंदन.......
..........................