Wednesday, February 15, 2017

पुढच्या वेळी आलास की नक्की घरी ये!


टेल्को होस्टेलचे दिवस हा एक अविस्मरणीय काळ होता. मंतरलेले दिवसच.
1979 ते 1981 अशी दोन वर्षे अगदी धमाल गेली.
सिनियर मंडळी अगदीच फालतू कारणं सांगून त्रास द्यायची. रॅगिंग करायची. मी डायरेक्ट रेक्टरकडे तक्रार केली. इनामदार नावाचे कडक रेक्टर होते. त्यांनी सगळ्यांना रात्री एकत्र केलं आणि म्हणाले, हा म्हणतोय, सिनियर रॅगिंग करतात. काय रे खरच असं करता तुम्ही?
मला म्हणाले दाखव कोण कोण रॅगिंग करतो ते. प्रसंग फारच कठीण होता. पण आता माघार घेऊन चालणार नव्हतं.मी ती मुलं दाखवली. सरांनी त्यांना मुंबई-पुणे साफसफाईची पनिशमेंट लावली. मी टरकलो होतो.
ते आता माझा बदला घेतील म्हणुन.
तर दुसर्‍या दिवशी ते जवळ आले नी म्हणाले, काय यार तू पण. अशी तक्रार करतात व्हयरे! चल तुला आत्ता शिक्षा. दररोज सगळे पेपर वाचून काढायचे.
त्यांना काय माहित माझ्यासाठी मुळी ही शिक्षा नव्हतीच. मात्र महिनाभरात सारे एकमेकांशी गोळ्यामेळ्याने वागू लागले.
मला व्यायाम फारसा आवडायचा नाही. आमच्याकडे शिस्त अतिशय कडक .शिट्टी वाजली की धावतच मैदानावर जमलं पाहिजे. सकपाळ नावाचे मिल्ट्रीमॅन पिटीटीचर होते. माणूस करड्या शिस्तीचा. जाम तंगवायचे.
एकदा त्यांना मनपाला एक पत्र लिहायचं होतं. मी ते त्यांना लिहून दिलं. तेव्हापासून मला जमेल तशी सूट ते द्यायचे. मी त्यांची कार्यालयीन कामं सांभाळायचो. त्यानिमित्ताने रजिस्टरमध्ये घालून कथा कादंबर्‍यांची पुस्तकं वाचायचो.
माझा एक रूम पार्टनर मुंबईचा होता. खूप मनस्वी आणि बुद्धीमान होता. आईवडीलांचा एकुलता एक. त्याचे आईवडील पण खूपच मायाळू. भेटायला यायचे तेव्हा सर्व रूमपार्टनरसाठी मिठाई आणायचे.
माझं पुस्तकप्रेम बघून त्यानं एकदा मला त्याला प्रेमपत्र लिहून द्यायची गळ घातली. मी लिहून दिलं. मग काय माझ्याकडे ते नियमित कामच लागलं. तो फार हळवा होता.भाबडा होता.खूप जिव होता त्याचा तिच्यावर.
पण त्यांची जात वेगळी होती म्हणुन तिच्या आईवडीलांनी तिचं दुसर्‍याशी लग्न करून दिलं. तो खूप रडला. मीपण...
खुप लागलं त्याला ते. पुढच्या गुरूवारी तो मुंबईला घरी गेला.आईवडीलांना भेटला आणि त्याने त्यादिवशी लोकलखाली आत्महत्त्या केली. गिरिष कायमचा चटका लावून गेला.
माझा रूम पार्टनर कडूलकर चांगला कवी होता. त्याला आख्खे सुरेश भट पाठ होते. एकदा भटांची पुण्यात मैफिल असल्याची जाहीरात आम्ही वाचली. रेक्टरना भेटून परवानगी मागितली तर ते म्हणाले, अधिकृतपणे उत्तर म्हणाल तर नाही, पण तुम्ही असं करा गुरूवारी पुण्यात कंपनी बसने गेलात की परतताना बस चुकली असं फोनवरून कळवा. कार्यक्रम करून दहाच्या आत रूमवर या. मात्र त्यापेक्षा उशीर करू नका. आणि मुख्य म्हणजे बाहेरची काही तक्रार येता कामा नये. काही गडबड झाली तर मी परवानगी दिलेली नाही हे लक्षात ठेवा.
आमचा एक वयाने मोठा एफ.टी.ए. [सिनियर] म्हणाला, काळजी करू नका, रात्री माझ्या रूमवर राहा. सकाळी कंपनी बसने सुममध्ये हजर.
आम्ही चौघे कार्यक्रमाला गेलो. भटांनी त्या दिवशी बहार आणली. कार्यक्रम इतका रंगला की बस्स. संपायला रात्रीचा एक वाजला. आमचं वेळेकडं लक्षच नव्हतं.
कार्यक्रम संपल्यावरच भानावर आलो. ज्याच्या घरी मुक्कामी जायचं होतं, तो ऎनवेळी म्हणला, एक अडचण आहे यार. आमच्या घरी रंगकाम काढलय. त्यामुळं तुम्ही आता दुसरीकडे व्यवस्था बघा. आम्ही हादरलो. आता रात्रीचं 1 वाजता कुठे जाणार?
कडल्या म्हणला, चला चालत शिवाजीनगरला जाऊ. जी मिळेल ती गाडी घेऊ अन सरळ होस्टेलला जाऊ.
शिवाजीनगरला गेलो तर शेवटची गाडी गेली असून आता तीनसाडेतीनतास गाडीच नसल्याचं समजलं. मग काय आम्ही रेल्वेच्या प्लॅटफार्मवरच मैफिल जमवली. कडल्यानं आख्खी रात्र सुरेश भट, बा.भ.बोरकर, ग्रेस, आरती प्रभू असे सारे कवी साक्षात आमच्या भेटीला आणले. पहिली लोकल घेऊन आम्ही पिंपरीला आणि तिथून होस्टेलला विनोबा भावे एक्सप्रेसने पोचलो तर गेटवरच सकपाळ सर! काय रे एव्हढ्या पहाटे कुठे फिरताय?
आम्ही टरकलो.
मी म्हणलं, सर ते सुरेश भट आलेते ना तर त्यांना भेटायला गेल्तो. तेही भटांचे फॅन होते. म्हणाले, तिकिटं दाखवा. आम्ही तिकिटं दाखवली. म्हणाले,पळा आणि कुठे वाच्यता करू नका. आणि हो, पुन्हा कार्यक्रम असेल तर मला पण सांगा. मी पण येतो.
पुढे तोच तो आमचा सिनियर मला नेहमी म्हणायचा, अरे यार घरी ये एकदा तुझं ते बी.ए.चं सुवर्णपदक घेऊन. माझी मुलगी भारी हुशार आहे. तिला मी तुझ्या सुवर्णपदकाबद्दल बोललो तर म्हणाली, मला बघायचय.
तो पुन्हा पुन्हा आग्रह करीत होता, पण जाणं काही झालं नाही.
एकदा गुरूवारी आप्पा बळवंत चौकात मी पुस्तकं घेताना त्यानं मला पाहिलं. आम्ही बोलतबोलत शनिवारवाड्यापर्यंत चालत आलो.
मी म्हटलं, अरे पण तू इकडे कसा?
म्हणाला, वर बघ, ती तिसर्‍या मजल्यावरची कपडे वाळत घातलेली खिडकी दिसतेय ना ते माझं घर. त्यानंतर सुमारे तासभर तो माझ्याशी उन्हात गप्पा मारत उभा होता. उन्हाचा चटका फारच जाणवायला लागला, तसं मी म्हटलं, चल मी निघतो आता. तर तो म्हणाला, असं म्हणतोस, बराय मग. पुढच्या वेळी आलास की नक्की घरी ये!!
............................