Friday, February 24, 2017

"सिंगल मिंगल"

"सिंगल मिंगल" - आजच्या तरूणाईचे भोवंडून टाकणारे चित्रण
"सिंगल मिंगल", ही प्रा. श्रीरंजन आवटे यांची पहिलीच पण कलदार मुद्रा असलेली कादंबरी. 208 पृष्ठांच्या दर्जेदार निर्मितीमुल्ये असलेल्या कादंबरीचे प्रकाशक आहेत मराठीतले आघाडीचे राजहंस प्रकाशन.
नायक कैवल्य हा दुसर्‍या वर्षात शिकणारा महाविद्यालयीन विद्यार्थी आहे. त्याचे समकालीन युवा भावविश्व चित्रशैलीत ही कादंबरी टिपत जाते.
त्याचे प्रेम जिच्यावर आहे ती महाविद्यालयीन तरूणी रेवा, तिचे अनेक प्रियकर, या सर्वांच्या मित्रपरिवारातील विविध जिंदादिल व्यक्ती आणि वल्ली, त्यांचे प्रेमविश्व असा फार मोठा पट ही कादंबरी कवेत घ्यायचा प्रयत्न करते आणि चांगल्यापैकी निभावतेही. आजच्या नव्या जनरेशनची स्पंदनं किती खोलवर पकडत जाते सिंगल मिंगल.
सध्याच्या अत्याधुनिक जगातील महानगरी तरूणाई, सोशल मिडीया, महाविद्यालयीन जगत, त्यांचे वादविवाद, त्यांचा प्राधान्यक्रम, सामाजिक प्रश्नांबद्दलचे भान आणि खळाळते तारूण्य, विकार, व्यसनं असं सगळं जगणं खोलवर चित्रित करणारी ही ठसठसीत कलाकृती. आजच्या महाविद्यालयीन तरूणांची चिडचिड, त्यांचे टोकदार स्वभाव, कारेपणा, कामजिज्ञासा, त्यांची भन्नाट,बेछूट भाषा यांचे अनेकपदरी जग ही कादंबरी वाचकाच्या पुढ्यात आणून खुले करते.
नवखेपणाच्या काही मोजक्या खुणा सोडल्या तर अतिशय प्रवाही, वाचनीय, अनेकदा भिडणारा आणि काहीवेळा भोवंडून टाकणारा घटनाक्रम हे या कादंबरीचे वैशिष्ट्य.
तरूणाईच्या जगाचे अतिशय धीट आणि टोकदार वास्तव यात असल्याने त्यात येणारे लैंगिक जीवनाचे संदर्भ अटळच होत.
मात्र कादंबरीची सुरूवात आणि शेवट अकारणच जास्त गडद झालाय असे वाटते. त्यातून या कादंबरीबद्दल एक सनसनाटी कादंबरी असा ग्रह होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे तरूण पिढी कदाचित या कादंबरीकडे पटकन वळेलही पण त्यामुळे लेखकावर काहीसे भडक लेखन करणारा असा शिक्का मारला जाण्याची भिती मला वाटते. प्रत्यक्ष कादंबरीत येणारी सखोलता आणि समग्र जीवनदृष्टी वरवरची नसून ती आरपार अस्वस्थता निर्माण करणारी आहे.
या कादंबरीचा बुद्धीमान नायक कैवल्य याची तगमग, प्रेमातली तडफड, दोस्तान्यातली भंकस, युवा अशोषी, प्रेमातील गुरूत्वाकर्षण, देहगंध हे सगळे लेखकाने अस्सलपणे चिमटीत पकडले आहे. हा साराच भाग अतिशय थेट भिडणारा असून तो मुळातूनच वाचायला हवा.या पहिल्याच लेखनात आवटेंनी त्यांची गुणवत्ता दाखवली असून त्यांच्याकडून आगामी काळात महत्वाचे लेखन होऊ शकेल अशी आश्वासकता या कृतीतून प्रगट होते. हे सारे रसायन अवश्य अनुभवावे इतके दमदार आहे.
आजच्या तरूणाईचे अलवार जग टिपणारी ही कलाकृती अस्वस्थ करून सोडते.
प्रा. श्रीरंजन आवटे यांनी या पहिल्याच कादंबरीद्वारे फार मोठ्या अपेक्षा निर्माण केलेल्या आहेत.

No comments:

Post a Comment