Tuesday, March 28, 2017

हिंदु - मुस्लीम संबंध आणि सेक्युलर संविधान, भाग,1

हिंदु - मुस्लीम संबंध आणि सेक्युलर संविधान, भाग,1 :-
उत्तरप्रदेशात योगी आदित्यनाथ यांची मुख्यमंत्रीपदी नियुक्ती आणि मा. सर्वोच्च न्यायालयाने बाबरी मशीद विवाद चर्चेने सोडवावा अशा सुचना दिल्यानंतर या चर्चेला पुन्हा तोंड फुटले आहे.
यात हमखास आढळणारी गोष्ट म्हणजे धर्मवादी जोरात [आक्रमक] आणि सेक्युलर [गारठलेले] बचावात्मक पवित्र्यात दिसत आहेत.
1. खरं म्हणजे हिंदु आणि मुस्लीम यांच्यातला हा गुंता किमान 1400 वर्षांचा आहे. किमान 800 वर्षांची मुस्लीम राज्यकर्त्यांची राजवट, इस्लाम हा बंदिस्त धर्म असणं, उर्दू भाषा, शरियत, 1857 चे युद्ध, इंग्रजांचे फोडा आणि झोडा राजकारण, त्यामुळे 1893 पासून घडवण्यात आलेल्या धार्मिक दंगली, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, महमद अली जिना, सर सय्यद अहमद, मौलाना आझाद, डा. बाबासाहेब आंबेडकर, सरदार वल्लभभाई पटेल आणि विनायक दामोदर सावरकर व गोलवलकर गुरूजी यांच्या भुमिका, पाकीस्तानची निर्मिती, फाळणीच्या वेळी झालेल्या दंगली, कत्तली, जम्मू - काश्मीरचा प्रश्न, दहशतवाद, 370 कलम, एकसारखा नागरी कायदा, जुबानी तलाक, चार लग्नं, कांग्रेस पक्षाने आजवर व्होट बॅंकेच्या राजकारणासाठी वापरलेला आणि बदनाम केलेला "सेक्युलर" विचार, पाकीस्तानचे भारतावर असलेले "अतिविशेष प्रेम", आजवर झालेली भारत पाक युद्धे, हमीद दलवाईंचे मुस्लीम सत्यशोधक आंदोलन, शाहबानो खटला आणि इतर अनेक पैलू आहेत. भारत हा "गंगाजमुना तहजीब" म्हणजे विविधता, समन्वय आणि बंधुतेचा सन्मान करणारा देश आहे.तीच आमची खरी संस्कृती आहे.
आज त्यातल्या फक्त एका पैलूवर चर्चा करणार आहे. बाकीचे पैलू आपण नंतर क्रमश: बघू...
हिंदू समाजाची विभागणी ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र अशा चार वर्णात आणि 4635 जाती/जमातींमध्ये झालेली आहे.
मुस्लीम समाजातही शिया, सुन्नी, अहमदिया आणि इतर असे भेद आहेतच.
पण भारतीय मुस्लीम समाजात आणखी चार महत्वाचे घटक आहेत.
1. अश्रफ - अ - जे स्वत:ला बाहेरून आलेले उच्चकुलीन मानतात असे, इराक,इराण, अफगाणिस्तान, वा अन्य देशातून आलेले आणि नबाब, बादशहा, अमीर, उमराव म्हणून प्रतिष्ठा व मानमरातब असलेले, [ज्यांची लोकसंख्या भारतीय मुस्लीमांच्या संख्येत 1% पेक्षा कमी आहे.]
2. अश्रफ - ब - हिंदूंमधील ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांच्यातून धर्मांतर करून मुस्लीम झालेले, [ज्यांची लोकसंख्या भारतीय मुस्लीमांच्या संख्येत 2% पेक्षा कमी आहे.]
3. अजलफ - हिंदूंमधील शूद्र वर्णातून धर्मांतरीत झालेले,
4. अर्जल - हिंदूंमधील अतिशूद्र किंवा दलित, आदीवासी यांच्यामधून मुस्लीम झालेले,
सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे क्र.3 व 4 यांची लोकसंख्या भारतीय मुस्लीमात 97% + आहे. मात्र गेल्या 70 वर्षात या समुहांमधून केवळ 20% नेतृत्व उभे राहिले. या उलट 3% पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या क्र.1 व 2 मधून मात्र 80% पेक्षा अधिक नेतृत्व उभे राहिले.
परिणामी मुस्लीम लिडरशीप कायमच इस्लाम खतरेमें असल्याचा बागुलबुवा करीत राहिली.
शिक्षण, आरोग्य, रोजगार आणि सुरक्षितता हे मुस्लीम समाजाचे खरे अग्रक्रमाचे प्रश्न आहेत. शिवाय विविध प्रादेशिक आणि भाषक संस्कृतींचा तिथल्या मुस्लीमांवरचा प्रभावसुद्धा महत्वाचा घटक आहेच. त्यांच्याकडे मात्र या उच्चभृ नेतृत्वाने जाणीवपुर्वक दुर्लक्ष केले.
क्रमश: --