Thursday, March 9, 2017

पुणे मनपात प्रथमच भाजपाचा महापौर-


पुणे शहराची ओळख मध्यमवर्गीय, पांढरपेशांचं, बुद्धीजिवींचं शहर अशी आहे. सर्वाधिक महाविद्यालये असलेले, कला, साहित्य, संस्कृतीचे माहेरघर म्हणून पुण्याचा दबदबा आहे. पुण्यात महानगरपालिका स्थापन झाल्यापासून अर्धशतकानंतर प्रथमच भारतीय जनता पक्षाचा महापौर होतो आहे. जनसंघ किंवा भाजपाला अशी संधी आजवर मिळालेली नव्हती.
साधारणपणे प्रागतिक विचारांकडे कल असलेल्या या शहराने इतिहासात प्रथमच उजवीकडे ठळकपणे राजकीय कल दिलेला आहे. अर्थात दोन वर्षांपुर्वीच पुण्यातील सर्वच्या सर्व म्हणजे आठही आमदार भाजपाचे निवडून आले तेव्हाच मनपाचा निकाल काय लागणार हे कळून चुकले होते.
"राष्ट्रवादी" असेच नाव असलेला पक्ष आधी पुण्यात सत्तेवर होता आणि आता राष्ट्रवादाची लॅमिनेटेड प्रमाणपत्रे वाटण्याचा फक्त आपल्यालाच अधिकार आहे असे मानणारा भाजपा पक्ष सत्तेवर आला हे सत्तांतर आहे की सत्ता ताटातली वाटीत आणि वाटीतली ताटात जाणे आहे? शहरी नवमध्यमवर्गाच्या आकांक्षा ओळखण्यात राष्ट्रवादी कमी पडला आणि भाजपाला ते रसायन जमवता आले हे या बदलामागचे सुत्र आहे की पुणेकर बारामती पॅटर्नला कंटाळले होते हे सुत्र आहे ते बघावे लागेल.
1. आधी या शहराच्या नाड्या कलमाडी आणि नंतर पवार घराण्याकडे होत्या. खरे कारभारी मात्र सुरेश कलमाडी किंवा अजित पवारच होते. शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे, वंदना चव्हाण, धनकवडे, अनिल भोसले व प्रशांत जगताप असे चेहरे होते. आता त्याऎवजी संजय काकडे, अनिल शिरोळे, योगेश गोगावले, सौ. अनिल भोसले, मुक्ता टिळक आणि गिरिष बापट हे चेहरे आले. हे खरेच सत्तांतर आहे की झेंडा बदलला तरी सामाजिक रसायन तेच आहे?
2. काकासाहेब गाडगीळ, विठठलराव गाडगीळ, विठठल तुपे, आण्णा जोशी, प्रदीप रावत किंवा सुरेश कलमाडी यांनी या शहराचे संसदेत प्रतिनिधित्व प्रामुख्याने केले असले तरी आता प्रथमच पालिका ते पार्लमेंट म्हणजे दिल्ली, मुंबई,पुणे एकच झेंडा लागलेला आहे.
3. शरद पवारांच्या राजकीय कारकिर्दीला 50 वर्षे पुर्ण होणार्‍या वर्षातच नेमके सर्व पातळ्यांवरील सत्तेतून पवार घराणे उतरणीला का लागले असावे? पुणेच नाहीतर पिंपरी चिंचवड मनपातही स्थापनेनंतर प्रथमच भाजपाचा महापौर बसत असावा. एककाळ होता की सर्व पक्ष पवारच चालवतात असं त्यांचे भक्त आणि चेलेचपाटे सांगायचे. अर्थात आजही आपण पवार साहेबांचे बोट धरून राजकारणात आलो म्हणणारेच दिल्लीच्या तख्तावर आहेत हे अलाहिदा.
4. वसंतराव भागवत यांनी भाजपाला जो सामाजिक अभियांत्रिकीचा चेहरा दिला त्याला आलेली ही सत्तेची फळं आहेत की इकडचे लोक वारं पाहून तिकडं गेले किंवा पाठवले गेले म्हणुन झालेला हा बदल आहे?
5. तसाही खरा राजकीय बदल झालाय असं कसं म्हणणार? अजित पवारांच्या बौद्धीक/आर्थिक सल्लागारात आधी संजय काकडे, पुरूषोत्तम खेडेकर, सदानंद मोरे होते आता तेच देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरींचे सल्लागार झालेले आहेत. याला बदल म्हणायचा असलाच तर तो चाणक्यांनी आपले मोहरे बदललेत. याला बदल म्हणावे काय?
6. संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ, मराठा महासंघ, शिवसंग्राम, छावा या सार्‍या राष्ट्रवादीच्या रसदीवर चालणार्‍या सामाजिक/सांस्कृतिक/राजकीय संघटना होत्या हे उघड गुपित आहे.
2004, 2009,2014,2017 या सर्व निवडणुकांच्या तोंडावर खेळली गेलेली सर्व कार्डं, भांडारकर, मराठा आरक्षण, दादोजी कोंडदेव, बाबासाहेब पुरंदरे यांच्या महाराष्ट्रभूषणला विरोध, गडकरी पुतळा या सार्‍यांची सुत्रे बारामती होस्टेलवरून हालत होती हे एव्हाना सर्वांना कळून चुकलेले आहे.
7. भाजपा तोंडाने विकास आणि हिंदुत्व सांगतो, तर राष्ट्रवादीवाले दाखवायला विकास आणि सेक्युलर कार्डं चालवतात.पण यांच्यात खरंच या विषयांची कळकळ आहे की ही फक्त बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात आहे?
8. गेल्या 40 वर्षात या शहराच्या कारभार्‍यांच्या घरात दोन चाकी आणि चार चाकी वाहने विकण्याच्या एजन्सी असल्यानेच या शहराच्या सार्वजनिक वाहतुक व्यवस्थेचा बट्ट्याबोळ केला गेला हे खरे नाही काय?
9. निवडणुकीच्या तोंडावर पवार खेडेकरांचा सत्कार स्विकारायला जातात आणि खेडेकरांनी खरा इतिहास सांगितला असे प्रमाणपत्र त्यांना जाहीरपणे देतात ही पवारांच्या प्रागतिक चेहर्‍याला शोभणारीच कृती असणार!
10. संभाजी ब्रिगेडची राजकीय ताकद ओळखून पवार तिकडे गेले असतील तर मग संभाजी ब्रिगेडने या निवडणुकीत उभे केलेले सर्व उमेदवार आपल्या अनामत रकमा का गमावून बसले?
11. खेडेकरांच्या खर्‍या इतिहासाचे असंख्य नमुने मी अन्यत्र सोदाहरण दिलेले आहेत ते जाणकारांनी डोळ्याखालून अवश्य घालावेत.
एकच नमुना सांगून हे आवरते घेतो.
दादोजी कोंडदेव प्रकरणात राष्ट्रवादीच्या सरकारने ब्रिगेडच्या तक्रारीवरून त्याबाबतची सत्यशोधन समिती नेमली. समितीत 75 टक्के लोक ब्रिगेडचे पदाधिकारी घेतले आणि दादोजींशी नाते सांगणारे 25% घेतले.
या 75 टक्क्यांनी एकमताने दादोजीविरूद्ध अहवाल दिला म्हणून पवारांनी रातोरात दादोजींचा पुतळा कापला.
आता देवेंद्र फडणविसांनी गेल्या 25 वर्षात प्रथमच ओबीसी आयोगात अध्यक्षांसह मराठा मूकमोर्चेकरी मंडळींचा भरणा असा केलाय की मराठा आरक्षणाच्या बाजूनेच निकाल यावा.
असे आपसात मॅचफिक्सिंग करणारे लोक हे खरेच वेगवेगळे आहेत असे म्हणायचे?
भांडारकर, मराठा आरक्षण, दादोजी कोंडदेव, बाबासाहेब पुरंदरे यांच्या महाराष्ट्रभूषणला विरोध, गडकरी पुतळा, मराठा मूकमोर्चे यातून पवारांचे प्रागतिक राजकारण एकजातीय बनल्याचे लोकांना पटल्यानेच मध्यावर परंतु डावीकडे कल असलेले पुणेकर मतदार थेट मध्यावर परंतु उजवीकडे वळले आहेत काय? शोधावे लागेल.
येणारा काळच सांगेल की पुणेकरांच्या पदरात काय पडणार आहे.
.........................
[डिसक्लेमर - मला राजकारणातले छटाकभरही कळत नाही. सदैव पोलिटिकली "इनकरेक्ट" असण्याचा माझा विक्रम आजवर कोणीही मोडू शकलेले नाही.
सबब ही सर्व मांडणी चुकीची असल्याची 100% शक्यता आहे. म्हणुन मी या मांडणीशी सहमत असेनच असे नाही.]

No comments:

Post a Comment