Tuesday, March 21, 2017

आपली बॅग आपल्याच हाती बरी..


कार्यक्रमाच्या संयोजकांच्या हातात आपली बॅग द्यायची नाही असा त्या दिवसापासून मी फायनल निर्णय घेतला.
आपण कुठेही व्याख्यानाला गेलो की रेल्वेस्टेशनवर आयोजक घ्यायला येतात. त्यांच्यासोबत काही अतिउत्साही स्वयंसेवक असतात. ते पहिली आपल्या हातातली बॅग ताब्यात घेतात. आपण कितीही नाही म्हटलं तरी ते असं काही खनपटीला बसतात की शेवटी बॅग द्यावीच लागते.
एकदा शिक्षक संघटनेचा राज्यव्यापी अधिवेशनाचा कार्यक्रम होता. स्टेशनवर मला घ्यायला शिक्षक नेते जीभौ आले होते.
त्यांच्यासोबत किमान 25 ते 30 तरी शिक्षक असतील.
हारतुरे झाले. एकाने तर खोबर्‍याच्या वाट्या आणि खारकांचा मोठ्ठा हार करून आणलेला. गंमतच सारी.
एकानं बॅग मागितली. मी नेहमीप्रमाणं नाही म्हटलं.
पदाधिकारी म्हणाले, "सर द्या की बॅग. काही मोठी रक्कम वगैरे आहे का बॅगेत?"
मी म्हटलं, " नाही हो. बॅग हलकी तर आहे. मला सवय आहे."
त्यांनी फारच आग्रह केला म्हणून बॅग दिली. बाहेर बर्‍याच कार, सुमो उभ्या होत्या. मला एकीत बसवलं गेलं. आमची वरात रेस्ट हाऊसला पोचली. रूम ताब्यात आली. रात्रभर प्रवास, जागरण झालेलं होतं. लवकर फ्रेश व्हावं म्हणुन बॅगेची चौकशी केली. तर बॅग नेमकी कोणी नेली होती तेच त्यांच्या त्यांच्यात नक्की ठरेना.
पदाधिकारी म्हणाले, " प्राब्लेमची काही अडचण नाय बघा. गेली बॅग तर गेली. आपण नविन घेऊ. कायकाय होतं बॅगेत ते सारं नवं घेऊ. आत्ता दोनेक तासात शहरातील दुकानं उघडली की समदं नवं घेऊन येतो. तुम्ही तोवर फ्रेश व्हा."
माझ्या नोट्स आणि पुस्तकं गेली म्हटल्यावर मी चिडलो. "तुम्ही एव्हढे ढीगभर लोक सोबत असताना अनोळखी माणूस माझी बॅग पळवतो म्हणजे काय?"
"त्याचं कायय की आपूण सगळे सेल्फी घेत होतो ना तव्हा तो माणूस सटकला असणार. आपुण शोधुत त्याला. मायला जातोय कुठं?"
बर्‍याच वेळानं एक शिक्षक घामाघुम होऊन धावत पळत आलेले. "माफ करा सर, तुमची बॅग माझ्या गाडीत ठेवली होती. पण सरांनी मला डायरेक्ट कार्यक्रमाच्या मंडपात पिटाळलं. तिकडं कामात मी विसरूनच गेलो बघा. आता थोड्यावेळापुर्वी संघटनेची पावतीपुस्तकं काढायला डिकी उघडली तर बघतो तो काय तुमची बॅग. माफ करा एकडाव."
दीड दोन तास मी ताटकळून गेलेलो. आत्ता त्या प्राथमिक शिक्षकावर वैतागून तरी काय करणार? बॅग मिळाली ना बस झालं.
कार्यक्रम छानच झाला. दुपारची ट्रेन होती. ती पकडून मला पुढं नागपूरला जायचं होतं.
परत पोचवायला आठदहा जण सोबत आले. मी माझी बॅग घट्ट पकडून ठेवलेली होती. द्या सर बॅग, मी घेतो, असा कितीही आग्रह झाला तरी मी ती कुणालाही दिली नाही.
आम्ही स्टेशनला पोचलो. प्लॅटफार्मवर पोचल्यावर पदाधिकारी म्हणाले, " सर, तुमच्या दोन्ही हातात बॅगा घेऊन कसे चढणार तुम्ही? द्या माझ्याकडं. मी कुठंही जात नाहीये. कार्यक्रमाचे स्मृतीचिन्ह, खोबर्‍याच्या वाट्या आणि खारकांचा मोठ्ठा हार, भेट मिळालेली पुस्तकं यामुळे दुसरी एक पिशवी सोबत घ्यावी लागली होती.
अनाऊंसमेंट झाली. आम्ही गप्पा मारत होतो. गाडी आली. आमचा डबा बरोबर आम्ही उभे होतो तिथेच आला. लोक उतरले. जीभौंनी माझ्या बॅगा दरवाजातून आत टाकल्या. मला बसवलं की गाडी लगेच निघाली.
माझा सीट नंबर शोधत गेलो तर तिकडे एक माणूस आधीच बसलेला होता. तो म्हणाला, "हे रेल्वेवाले लब्बाड आहेत. एकाच सीट नंबरचं तिकीट दोघांना मुळात देतातच कसं?"
टीसीची वाट बघत मी थांबून राहिलो. शेजारचा एकजण म्हणाला, " टेका तुमचं बूड तोवर. या टीशीवाल्यांचं काय खरं नसतय. आला तं येतोय. नायतर बसा बोंबलत."
मी वाईच टेकलो. तर टीसी आलाच. मी त्याला माझी अडचण सांगितली. तो म्हणाला, "खरं म्हणजे असं व्हायला नको. पण कायय की होते कधीतरी अशी चुक. मी करतो तुमची पर्यायी व्यवस्था."
चांगला होता बिचारा.
त्यानं माझ्याकडे तिकीट मागितलं. पाह्यलं. मला परत दिलं. म्हणाला, "बसा मी आलोच व्यवस्था करून."
पण लगेच तो परत आला. त्यानं माझ्याकडे परत तिकिट मागितलं. तिकीटाकडं बघत तो हसायलाच लागला. मला म्हणाला, "तुम्हाला जायचंय कुठं?"
मी म्हटलं, "नागपुरला." तो म्हणाला, "सर ही गाडी नागपुरला जात नाही. ही दिल्लीला जाते. भुसावळवरून हिचा ट्रॅक बदलतो. तुम्ही चुकीच्या गाडीत बसलाय."
बापरे!
ह्या मास्तर मंडळींनी पुन्हा घोळ केला होता. घाईगडबडीत मला चुकीच्याच गाडीत बसवलं बेट्यांनी.
पण आपलीही चुक आहेच ना. आपण गाडीवरचं नाव, गाडीनंबर का नाही बघितला? पण अनाऊन्समेंट तर आपल्याच गाडीची झाली होती. काय चुकलं नेमकं?
आता काय करायचं?
टीसी म्हणाला, "काळजी करू नका. भुसावळला उतरा. तुमची गाडी मागनं येतेच आहे."
मला काळजी ही की जळगावला पॅसेंजर आला नाही म्हणून त्या टीसीनं समजा माझा बर्थ वेटींगवरच्या दुसर्‍याच पॅसेंजरला दिला, तर झाली का पंचायत?
मी पदाधिकार्‍यांना फोन केला. ते म्हणाले, " हौ ना, तुमच्यावाली गाडी हल्ली ना हल्ली तोवर त्याच प्लॅटफार्मवर मागनं गाडी आली. तवाच माह्यावाल्या लक्षात आलं की भौ गडबड झाल्याली हाय. मंग तिकडंच थांबून त्या टिसीवाल्याला भेटून अशानं असं झाल्यालं है. मिस्टेक जरा सांबाळून घ्या म्हणलं. तुमच्यावाली जागा मोकळीच ठेवायला सांगितली. काळजीचं काम नाय. तुम्ही भुसावळले उतरून घ्या. मागनं तुमच्यावाली गाडी येऊन राहिली."
मी म्हटलं, "तुमच्या लक्षात आल्यावर मला लगेच फोन करून का नाही कळवलं तुम्ही?"
ते शांतपणे म्हणाले, "त्याचं असंय की हिकडून भुसावळला गाडी पोचाले किती टाइम लागतो, ते आम्हाला बिल्कुल माहितीए. आधी सांगून तुमची बीपीशुगर वाढणार. तुम्ही गाडीतून तर उडी मारू शकत नाय. मी दोन मिंटात फोन करणारच होतो. सर आपलं समदं परफेक्ट प्लॅनिंग असतंया."

No comments:

Post a Comment