Sunday, March 19, 2017

सुपारीबाज, संवाद आणि सहिष्णूता

अतिशय समतोल लिहिले, सप्रमाण लिहिले, आक्रमकता टाळून, युक्तीवाद करीत मुद्देसूद लिहिले, विश्लेषणासाठी संयत सूर आणि नजर बाळगून लिहिले तरी, अशा पोस्टवर सामान्यपणे चार प्रकारच्या विरोधी प्रतिक्रिया येतातच.
1. तुम्ही त्यांच्याविरूद्ध [म्हणजे मुस्लीम] का लिहित नाही? तुमचा विरोध आम्हालाच का? तुम्ही काँग्रेसप्रेमी आहात. त्यांनी भ्रष्टाचार केला,त्यांनी चुका केल्या त्यावर का लिहित नाही?
2. ते लोकशाही मार्गाने निवडून आलेत. तुम्हाला जनादेश मान्य नाही का? तुम्ही लोकशाही मानता की नाही ?
3. तुम्ही सेक्युलर लोक ढोंगी आहात. तुम्हाला पोटशूळ उठलाय वगैरे.
4. व्यक्तीगत चिखलफेक करीत शिवराळ भाषेत लिहिलेला गलिच्छ मजकूर.
मतभेद, मतभिन्नता यांचं स्वागतच आहे. चर्चा जरूर व्हायला हवी.
पण ती मुद्द्यावर हवी. आणि तो मुद्दा मांडायची पद्धत/तर्‍हा पण महत्वाची.
ती सभ्य, सुसंस्कृत हवी.
मी मुस्लीम समाजाचा कधीही आणि कसलाही अनुनय केलेला नाही. त्या विषयावरही मी आवश्यकता असेल तर आणि संधी मिळेल तिथे निर्भयपणेच लिहिलेले आहे. मुस्लीम समाजातील अतिरेकी विचारधारेच्या संघटना आणि नेत्यांना मी कठोर विरोधच केलेला आहे. करीन.
मात्र आंधळ्या मुस्लीमविरोधाचा गंडा बांधलेला नाही. माझ्यावर बालपणापासून समता, स्वातंत्र्य, न्याय आणि बंधुतेचे संस्कार आहेत, द्वेषाचे आणि विखाराचे नाहीत. शालेयवयापासून हमीद दलवाई, नरहर कुरूंदकर, प्रा.गं.बा.सरदार, प्रा.राम बापट, डा.य.दि.फडके अशांच्या प्रभावाखाली वाढलोय. सहिष्णू आहे. कठोर चिकित्सा करतो. मात्र जळाऊ लाकडाच्या वखारी चालवित नाही.
भारतीय संविधान आणि धर्मशास्त्राचा अभ्यासक आहे. भांडारकर प्राच्य विद्या संशोधन संस्थेचा गेली अनेक वर्षे उपाध्यक्ष असल्याने धर्मशास्त्र या विषयाचे ज्ञान मी जडीबुटीवाल्यांकडून घेऊ इच्छित नाही. ते मी डा. रा.गो. भांडारकर, राजारामशास्त्री भागवत, भारतरत्न पां. वा.काणे, डा.रा.ना. दांडेकर, धर्मानंद कोसंबी आणि तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशींकडून घेतले आहे. घेत असतो.
राज्यघटनेने मला विवेकाचे स्वातंत्र्य दिलेले आहे. त्याच मार्गाने मी जातो. जाईन.
काँग्रेसचा मुर्दाडपणा, भ्रष्टाचार, अकार्यक्षमता आणि ढोंगी सेक्युलर बतावणी यांच्यावर मी घणाघाती टिकेचे आसूड ओढलेत. ओढीन. मी त्यांचा काडीमात्रही सहानुभुतीदार नाही.
लोकशाहीवादी आहे मी . राहीन. जनादेश मी मानतो. अर्थात भल्याबुर्‍या मार्गाने निवडून आलेले सर्वच पवित्र वगैरे असतात, असं मी मानत नाही. त्यांचेही सामाजिक परीक्षण व्हायला हवे असे मी मानतो. लोकप्रतिनिधींवर जनमताचा अंकुश हवा असेच मी मानतो. आगरकर म्हणतात तसं आम्ही विचारकलहाला घाबरत नाही, उलट त्याचं स्वागतच करतो.
आम्ही आदेशावर नाही विवेकावर चालतो.
तुम्ही ढोंगी, दांभिक वगैरे आहात असले हेत्वारोप करणारांना मी उत्तरे देत नाही. देणार नाही. त्यांना मला डिवचायचे असते, मुद्दे निरूत्तर करणारे असल्याने त्यांना बगल देऊन वितंडवाद घालायचा असतो, मारामारीच करायची असते.
व्यक्तीगत चिखलफेक करणारे, असभ्य, शिवराळ भाषेत लिहणारे आणि हेत्वारोप करणारे यांना का द्यायची उत्तरे?
काही लोक तर पगारी/पढवलेले/ सुपारी देऊन पाठवलेले असतात. अंगावर सोडलेले असतात. गावात जसे गावावरून ओवाळून टाकलेले वळू असतात किंवा
आजकाल टोलनाक्यावर जसे गुंड पाळलेले असतात तसे. अशा निर्बुद्ध गुडघ्यांशी चर्चा करण्यात मला अजिबात रस नाही.
प्रतिक्रिया पण यांना इतरांनी लिहून दिलेल्या असतात. त्यात कानामात्रा वेलांटीचाही फरक नसतो. एकाला ब्लॉक केले की मिन्टात दुसरा तीच प्रतिक्रिया पेस्ट करतो. असल्या सुपारीबाजांशी वाद घालण्यात काय हशील? त्यांना सरळ ब्लॉक केलेले उत्तम. निदान मी तरी करतो. मग कोणी त्याला असहिष्णुता म्हणो की विखार म्हणो.
ते संविधानच्या आधारे निवडून जरी आले असले तरी ते संविधानाला मानणारे नाहीत. ते हिंसक आणि भ्रष्टबुद्धीचे लोक आहेत. त्यांच्यामुळे आपला देश उलट्या पावलांचा प्रवास करतोय. ते संविधानाला मानणारे असते तर त्यांनी हिंसाचार केला नसता. त्यांची धृवीकरणाची विचारधारा संविधानाशी सुसंगत नाहीये.
यांच्या धर्मवादी मांडणीमुळे हिंदुंचा तरी विकास कसा होईल? आपल्याला आधुनिक बनायचेय की परत द्वापारयुगात जायचेय? मला हा उलट्या पावलांचा प्रवास वाटतो. यात आपलेच नुकसान आहे.
आम्ही आपल्याच समाजावर अधिक टिका का करतो? तर आम्हाला असे वाटते की, आज आपला समाज जो इथपर्यंत आलाय त्यामागे या कुपमंडुकांचा शून्य वाटा आहे. यांनी त्या त्या काळात प्रागतिक विचार करणारांचा अमाप छळच केलेला आहे. मी प्रामाणिकपणे सांगतो, की आपल्या संतांनी, समाजसुधारकांनी, समाजक्रांतिकारकांनी आपल्याला आधुनिक बनवले, सहिष्णू बनवले. ती पुण्याई वाया जाऊ नये यासाठी या एकांगी, बुद्धीविरोधी, तर्कविरोधी, संविधानविरोधी शक्तीवर आम्ही टिका करणारच. तो आमचा संवैधानिक हक्क आहे. आम्हाला कुपमंडुक बनून आत्मघात/आत्मनाश करायचा नाहीये.
आम्ही सेक्युलर का आहोत?
कारण आपला धर्म कितीही महान वगैरे असला तरी धर्मानं लाभार्थी आणि शोषित अशी समाजाची विभागणी केलीय. स्त्रिया, दलित, आदीवासी, शूद्र, कष्टकरी यांच्या नजरेने बघा, त्यांचे कायम शोषणच झालेय. तुम्ही वर्चस्वाच्या नजरेने बघत असल्याने धर्माच्या सर्वच बाबींचे समर्थन करीत आहात. धर्माच्या काही बाबींचे उदात्तीकरण करायचे आणि शोषितांबद्दल मौन बाळगायचे असा दुटप्पीपणा फार झाला. बास झाला. देशात धर्माचे कायदे लागू केले तर सर्वाधिक अन्याय स्त्रिया, दलित, आदिवासी आणि बलुतेदार - अलुतेदार, शूद्र यांच्यावर होईल. आणि म्हणून आम्ही धर्माचे कायदे लागू करण्याच्या विरोधात आहोत. होय म्हणूनच आम्ही सेक्युलर आहोत.
एकच लक्षात ठेवा आम्ही संत तुकारामांचे वारसदार आहोत. "सत्य असत्याशी मन केले ग्वाही! मानियले नाही बहुमता!"
"इतर आपली स्तुती करतात का निंदा यापेक्षा आपल्याला जे मनापासून व तीव्रतेनं करावसं वाटतं ते निष्ठेने करा." -- मोझार्ट
.......................
भुवन, आपल्या अंगणात झाडलोट करीत होता. स्वच्छता करीत होता.
शेजारच्या सोहनकाकांनी त्याला छॆडलं. म्हणाले, " अरे, शेजारच्या वसाहतीत बघा किती अस्वच्छता आहे. त्याविरूद्ध आधी मोहीम हाती घ्या. त्यांना शिकवा स्वच्छतेचं महत्व. उठसुठ आपल्याच अंगणावर तुमचा डोळा. तिकडं सफाई करायची आहे का तुमच्यात हिम्मत?"
भुवन म्हणाला, " काका, माझं घर मीच साफ करणार ना? सफाईची सुरूवात स्वत:पासूनच व्हायला हवी. स्वत:च्या अंगाला घाण असेल तर स्वत:च आंघोळ करायला हवी नाही का? आजारी पडलात तर डाक्टरांना म्हणता का, मलाच काय औषध देता? शेजार्‍यांना द्या. माझं काय मी तसाच बरा होईन, नाही ना? जो आजारी त्यालाच औषध तसंच आमच्या घरादारातली घाण आम्हीच आधी हटवायला नको? पंतप्रधानांनीसुद्धा भारतातच स्वच्छता अभियान हाती घेतलं ना? की बांगलादेश, पाकीस्तान, अफगाणिस्थान, नेपाळ, श्रीलंका आणि भुतानला घेतलं?
कोणतीही चांगली सुरूवात स्वत:पासूनच व्हायला हवी. समजलं?"

No comments:

Post a Comment