Sunday, March 12, 2017

इरोम शर्मिलाचा पराभव आणि उद्विग्न चाहते

फेसबुकी मित्र मैत्रिणी इरोम शर्मिलाच्या पराभवाने उद्विग्न झालेत. माध्यमांनी तिच्या तयार केलेल्या प्रतिमेवर आपण सारे लट्टू आहोत. आपण शरमिंदा आहोत अशा पोस्टचा महापूर आलाय. मला तिच्या पराभवाचे जरूर दु:ख आहे. परंतु विवेक हरवून न बसता जरा शांतपणे या राजकीय प्रक्रियेचे विश्लेषण करू या. इरोमच्या त्यागाबद्दल नितांत आदर बाळगूनही काही गोष्टी आपण लक्षात का घेत नाही?

तिच्याकडे राज्याच्या विकासाचे कोणते संकल्पचित्र होते/आहे?
निवडणुक लढवणे आणि उपोषण करणे ह्या वेगवेगळ्या बाबी आहेत. एक व्यक्तीगत तर दुसरी समुहमनाशी संबंधित.

तिने उपोषण केले म्हणजे लोकांनी तिला निवडूनच द्यायला हवे होते हा आपला हट्ट आहे. त्याबद्दल तिला प्रसिद्धी, पुरस्कार, मानसन्मान मिळाले, पुढेही मिळतील. पण एका निवडणुकीत बाई हरल्या काय तर त्या इतक्या संतापल्या की डायरेक्ट राजकीय संन्यास घेण्याची घोषणा करून बसल्या.

मुळात त्या एक हट्टी आणि कज्जाखोर* बाई आहेत, हे सामाजिकदृष्ट्या त्यांचे महत्वाचे अंग. पण यात लोकांपासून सतत फटकून राहणे, सिनिकल असणे हाच आपला थोरपणा असल्याचा एक विक्षिप्त गुणधर्म असतो. लोकशाहीत निवडणुक व्यवस्थेचे स्वत:चे असे एक तंत्र आहे. त्याची किमान काही एक बांधणी लागते.
इरोमचे लोकांमध्ये किती आणि कसले काम आहे? किमान महिलांचा व्यापक पाठींबा तिच्यामागे होता/आहे काय? निवडणुकीपुर्वी तिने मतदारसंघ बांधलाय का? कार्यकर्त्यांची फळी उभी केलीय का?
लोकांमध्ये मिसळणे, त्यांच्याशी बोलून जनमत घडवणे, साथसंगत टिकवणे, व्यापक जनाधार निर्माण करणे असं तिनं काही केलंय का?

की केवळ लोकांपासून फटकून राहून माध्यमांमधून त्यागी, लढावू अशी प्रतिमा निर्माण केली की बास. सहानभुतीदारांचे मतांमध्ये परिवर्तन अशाने आपोआप होते काय? तुम्हाला मत दिलं नाही की सर्व लोक लगेच भ्रष्ट, जातीय, अडाणी वगैरे आहेत असं म्हणत त्यांना हिणवणं हेच मुळात लोकशाहीविरोधी होय.
हस्तीदंती बुद्धीवादाचा तो कळस असून हा टिपीकल नवमध्यमवर्गीय तुच्छतावाद होय. याचा अर्थ मतदारांमध्ये किंवा निवडणुक व्यवस्थेत काहीच दोष नाहीत असे माझे मत आहे असं दुसरं टोक गाठू नका.

शरद पवार यांची एक गोष्ट मला आवडते. सार्‍या देशात पवार हेच एकमेव असे नेते आहेत की ज्यांनी पराभवाबद्दल कधीही जनतेला जबाबदार धरलेले नाही. पराभवाचे आत्मपरिक्षण करून चुका दुरूस्त करणे हाच त्यावरचा एकमेव उपाय आहे. तुमच्या आदेशावर मतदार नाही चालणार. तुम्हाला त्यांची मतं हवी असतील तर लोकभावनेचा आदर करायला शिकलं पाहिजे. लोक गेले फाट्यावर असं वाटत असेल तर मग निवडणुक लढवण्याच्या फंदात कशाला पडता?

"माझ्या आंदोलनात मणिपूरच्या जनतेला रस नाही म्हणून मी उपोषण मागे घेतेय,"  असे त्या म्हणाल्या होत्या. मग त्याच लोकांकडून तुम्हाला मतं मिळतील असं समजणं हा भाबडेपणा तर आहेच, पण यामधून बाईंची राजकारणाविषयीची समज किती शालेय पातळीवरची आहे तेही स्पष्ट होतं.

केवळ माध्यमांमधून मिळणार्‍या माहितीच्या आधारे आपण एखाद्या नायक/नायिकेच्या किती प्रेमात पडायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न. निदान पराभवानं तरी त्यांची राजकीय समज परिपक्व व्हायला मदत होवो हीच सदिच्छा.
सामान्य मतदारांना असे गृहीत धरणे, मला मते देणे तुमच्यावर बंधनकारकच आहे, असला नैतिक गंड बाळगणे हे लोकशाहीत चालत नाही.

आजच्या आहे या भारतीय व्यवस्थेत असले गंडी, सिनिकल, आत्मसंतुष्ठ वा एकारलेले नेते/लोक निवडणुकीत पराभूत होणे मला फारसे आश्चर्यकारक वाटत नाही.
कृपया आता तरी हा राष्ट्रीय मातम/ शोक थांबवू या.
....................
* "कज्जाखोर" हा शब्द अवगुण याअर्थी मला अभिप्रेत नाही. ती प्रवाहासोबत वाहत जाणारी नाही. ती लढाऊपणा अंगी बाणलेली, तक्रार करण्याची रिस्क घेणारी निर्भय व्यक्ती आहे या अर्थाने हा शब्द इथे वापरलेला आहे. जी सर्वशक्तीमान सैन्याशी लढते अशी फायटर.



No comments:

Post a Comment