Tuesday, March 28, 2017

उर्दू ही भारतात जन्मलेली महान भाषा आहे

हिंदु - मुस्लीम संबंध आणि सेक्युलर संविधान, भाग 5 :-
उर्दू ही भारतात जन्मलेली महान भाषा आहे
उर्दूचा जन्म भारतातला आहे. ही अतिशय गोड आणि काव्याला जवळची भाषाय. एखाद्याच्या प्रेमपत्रात एकही उर्दू शेर नसेल तर ते प्रेमपत्र कसलं?
ही भाषा अनेक भाषांच्या प्रभावातून तयार झालीय. त्यात पर्शियन, फारशी, अरेबिक, हिंदी, प्राकृत भाषा आणि संस्कृत यांचा समावेश आहे.
मात्र पाकिस्ताननं ही राष्ट्रभाषा म्हणून स्विकारली आणि दोन विचोइत्र गोष्टी घडल्या. एक -अनेक हिंदूंना ही भाषा पाकची म्हणुन दूरची वाटायला लागली. दोन- काही जुनाट विचारांच्या मुल्ला, मौलवींना ती भाषा अचानक जवळची वाटायला लागली.
खरं तर इस्लामची धर्मभाषा उर्दू नाही. कुराण अरेबिकमध्ये आहे, उर्दूमध्ये नाही.
पाकीस्तानचा जन्म धर्मराष्ट्र म्हणून झाला खरा पण अवघ्या वीसेक वर्षात पाकीस्तानची फाळणी झाली, ती भाषेच्या वादातून.
आजच्या बांगला देशाची राष्ट्रभाषा बंगाली आहे. आमार सोनार बांगलो.
महाराष्ट्रातील अनेक मुस्लीमांनी मराठीपेक्षाही उर्दू भाष आपली मातृभाषा असल्याचं जनगणनेत नोंदवलंय. खरंतर अनेकांना ती येत नाही. उर्दू माध्यमाच्या मदरशांना सरकारनं अधिक अनुदान द्यावं यासाठीही हा संघटित प्रयत्न असू शकतो.
राजकीय साठमारीत एखाद्या गोड भाषेचा गळा कसा आवळला जातो, त्याचं अतिशय चांगलं उदाहरण म्हणजे उर्दू होय.
भारतातल्या अनेक प्रांतातल्या मुस्लीमांना उर्दू येत नाही. उदा. केरळ, तमीळनाडू इ.
उर्दू साहित्यातले सर्वश्रेष्ठ प्रतिभावंत म्हणुन गालिब आणि प्रेमचंद यांची नावं घेतली जातात.
रामानंद सागर [रामायण मालिकेचे निर्माते, दिग्दर्शक] हे फार मोठे उर्दू लेखक होत. त्यांची "और इन्सान मर गया" ही अजरामर साहित्यकृती आहे.
राजेंद्र बेदी, विष्णु खरे, गुलजार, भीष्म सहानी, कृष्णचंद्र, हे जसे उर्दूतले महान साहित्यकार तसेच कवी महंमद इक्बाल, [सारे जहांसे अच्छा हिंदुस्ता हमारा वाले,]
साहीर लुधियान्वयी, कमाल अमरोही, ख्वाजा अहमद अब्बास, इस्मत चुगताई, कैफी आझमी, निदा फाजली, सआदत हसन मंटो, बसीर बद्र, जावेद अख्तर आणि आणखी कितीतरी हे या भाषेतले महत्वाचे प्रतिभावंत.
भाषेला अशा प्रकारे धर्माच्या चष्म्यातून बघणं किंवा केवळ ती पाकीस्तानची राष्ट्रभाषा आहे म्हणुन तिचा रागराग करणं म्हणजे आपल्याच लेकराला केवळ शेजार्‍यांनी नावाजलं म्हणुन त्याचा जळफळाट करण्यासारखं आहे.
मुद्दा एव्हढाच आहे की जसं उर्दूचा द्वेष करणं चुक तसंच उर्दूचा ओ की ठो माहित नसताना तिला मातृभाषा म्हणणंही चुकच होय.

No comments:

Post a Comment