Tuesday, March 28, 2017

एकेक किलो वजनाचे मोठठे मोठठे असंख्य टोमॅटो

एकेक किलो वजनाचे मोठठे मोठठे असंख्य टोमॅटो
एका राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आपल्या मंत्रीमंडळातील सहकार्‍यांना घेऊन गारपिटीची पाहणी करायला गेले होते. एका शेतकर्‍याची ते आस्थेवाईकपणे विचारपूस करीत असतात.
" अरे वा, छान टोमॅटो लावलाय तुम्ही. मला खुप आवडतात टोमॅटो. मी दररोज खातो. मी आता थेट अमेरिकेत टोमॅटो निर्यात करण्याचा निर्णय घेणार आहे. आपण त्याला युरिया, सुफला झालंच तर नेटवर मी बघतो आणि अधिकार्‍यांना तशा सुचना देतो, लागेल ते खत घालू, त्याच्या जोरावर ह्या झाडाला प्रत्येकी एकेक किलो वजनाचे मोठठे मोठठे असंख्य टोमॅटो येतील अशी व्यवस्था करू. कालच माझं केंद्रीय कृषीमंत्री आणि मा. पंतप्रधान यांच्याशी बोलणं झालंय. ते शेतकर्‍यांच्या पाठीशी आहेत. ते ट्रंपसाहेबांशी चर्चा करणारेत. मला सांगा, यावर तुमचं काय मत आहे?"
शेतकरी म्हणाला, " साहेब, आम्ही अडाणी माणसं, आम्हास्नी काय कळतंया? हा आता एव्हढं मात्र खरं की या झाडाला अगदी माह्यावाल्या हाडांचं जरी खत घातलं ना तरी त्याला टमाटे काय यायचं नाहीती."
"काय बोलताय? आमच्या राज्यात काय अशक्य आहे? कालच कॅबिनेटमध्ये आम्ही तसा निर्णय घेतलेला आहे, का नाही येणार टोमॅटो?"
"त्याचं कायंय की, शीएमसाह्यब, हे वांग्याचं रोपटं हाय!"
..................
ओळखा पाहू हे डिजिटल सीएम कोणत्या राज्याचे सीएम असतील?
....................
आपला देश आणि राज्य कृषीप्रधान आहे, मात्र देशाच्या आणि राज्याच्या प्रधानांना कृषीचं ज्ञान आहे का? असा प्रश्न प्रमोद महाजन विचारायचे, यानिमित्तानं त्याची आठवण झाली.
.....................

No comments:

Post a Comment