Monday, April 3, 2017

गरिबीचा प्रश्न सुटत नाहीत-

भिक आणि मदतीतून गरिबीचा प्रश्न सुटत नाहीत-
शरद जोशींनी 11 भुमिहिनांना प्रत्येकी अडीच एकर सरकारी जमिन स्वप्रयत्नांनी मिळवून दिली. त्यांनी सामुदायिक शेती करावी यासाठी जोशींनी त्यांना तयार केले. बॅंक अधिकारी विहीरीसाठी आवश्यक ते कर्ज द्यायला तयार झाले. बांधबंदिस्तीचे सर्व साहित्य शासकीय योजनेतून मोफत द्यायला सरकारी अधिकारी तयार झाले. मात्र त्यांनी एक अट घातली. त्या 11 कुटुंबांनी मजुरी स्वत: करावी. शरद जोशी स्वत: त्यांच्यासोबत राबायला तयार झाले. प्रत्येक कुटुंबातून किमान दोघांनी व शरद जोशी अशा 23 जणांनी शेतावरच राहायला जायचे, दिवसभर काम करायचे व तिथेच राहायचे ठरले. दुसर्‍या दिवशी सकाळपासून कामाला सुरूवात करायचा निर्णय झाला.
दुसर्‍या दिवशी भल्या पहाटे निघून 40 किलोमीटर स्कूटर ताबडीत जोशी शेतावर पोचले तेव्हा एकही जण आलेला नव्हता. तास दोनतास वाट बघून जोशी स्वत: घरोघर फिरले. कसीबशी 22 ऎवजी अवघी 9 माणसं हाती लागली, त्यांना जीपमध्ये घालून जोशी शेतावर घेऊन गेले. जोशी स्वत: अंग मोडून कामाला लागले. सर्वांनी शेतातले दगडगोटे दिवसभर जमा केले. संध्याकाळी सगळ्यांनी कंदीलाच्या उजेडात भाकरी खाल्ल्या. जेवन झाल्यावर दोघांनी काहीतरी अडचणी काढल्या आणि आम्ही रात्रीचे आता घरी जातो, पण उद्या सकाळी प्रत्येक घरातल्या दोघांना पकडून सोबत घेऊन येतो असं सांगून ते निघून गेले.
उरलेले जोशींसोबत त्या उघड्या माळरानावर झोपले.
सकाळी उठून जोशी परत कामाला लागले. प्रत्यक्षात रात्री परत गेलेले तर गेलेच पण नवा कोणीही शेतातल्या कामाकडे फिरकला नाही. दरम्यान गावात कोणीतरी वारल्याचं कळताच कामावरचे सगळेच गावात पळाले. त्यांच्या त्या सामुदायिक शेतीवर घाम गाळायला एकटे शरद जोशी शिल्लक राहिले होते. 11 पैकी एकालाही जमिन कसण्यात रसच नव्हता. मिळालेली जमिन गिर्‍हाईक मिळालं की विकायची आणि भुमिहिन बनून नविन जमिन मिळवण्यासाठी प्रयत्न करायचा यातच ते गुंतले होते. दरम्यान शरद जोशींचे पदरचे 2 हजार रूपये यात खर्च झाले होते.
.................
[अंगारवाटा, शोध शरद जोशींचा,भानू काळे,उर्मी प्रकाशन,पुणे,डिसेंबर 2016, पृ.96 ते 98]