Monday, April 10, 2017

जोतीराव की ज्योतिबा?

अनेकजण आदरानं, आपुलकीनं "ज्योतिबा" असा उल्लेख करतात. त्याला माझा विरोध किंवा आक्षेप नाही. या नामोल्लेखाबाबत झालेला एक सांस्कृतिक संघर्ष आपल्याला केवळ माहित असावा यास्तव हे टिपण--- यामागे शिळ्या कढीला उत आणण्याचा किंवा कोणाला तरी टार्गेट करण्याचा हेतू नाही.
जोतीराव नेहमी आपली सही "जोती" किंवा "जोतीराव" अशीच करीत असत.
"ज्योतिबा" असा उल्लेख त्यांच्या अखंडात [ कवितेत ] अपवाद म्हणून एकदाच आलाय आणि तोही बहुधा मीटर जुळवण्यासाठी आला असावा.
अन्यथा ते कायम जोतीराव किंवा जोती असेच लिहित असत.
त्यामुळे डॉ. य.दि.फडके, डॉ. स.गं.मालशे, डॉ. बाबा आढाव किंवा माझ्या लेखनात तुम्हाला "ज्योतिबा" असे लिहिलेले दिसणार नाही. आम्ही नेहमी "जोतीराव" असेच लिहितो.
कृष्णशास्त्री चिपळूणकर हे महात्मा फुले यांचे घनिष्ठ मित्र होते. त्यांचा मुलगा विष्णुशास्त्री हा जोतीरावांच्या अंगाखांद्यांवर खेळलेला होता. परंतु पुढे त्यांनी आपल्या निबंधमाला या मासिकाच्या 44 आणि 48 व्या अंकात जोतीरावांवर कडवट टिका केली. त्यात त्यांनी जोतीरावांचा "मि.जोती"  असा उल्लेख केलाय.
"मि.जोती हे पोक्त आहेत असे ऎकतो," ही विष्णुशास्त्रींची भाषा त्यांच्या अहंकारातून आलेली होती. त्यांनी जोतीरावांना व्याकरण कसे येत नाही यावर आपली लेखणी झिजवली होती. त्यावेळी राज्यात भीषण दुष्काळ पडलेला होता, हजारो लोक अन्नपाण्याविना मरत होते आणि त्याबद्दल एक अवाक्षरही न लिहिता हे शास्त्रीबुवा व्याकरणावर प्रवचनं झोडत होते. त्याचवेळी जोतीराव - सावित्रीबाई मात्र एक हजार गरजू, गरिब मुलामुलींना दुष्काळातून वाचवून अन्नपाणी देण्याची व्यवस्था करीत होते. त्यांचे संगोपन करीत होते.
विष्णुशास्त्री हा आपल्या जिवलग मित्राचा मुलगा, आपल्याला मुलासारखाच असं मानून जोतीरावांनी विष्णुशास्त्रींना कधीही प्रत्युत्तर दिलं नाही. जोतीरावांचे जिवलग मित्र, न्या.रानडे, लोकहितवादी, भिडे, जोशी, वाळवेकर आणि गोवंडे यांना विष्णुशास्त्रींचे हे लेखन उद्दामपणाचे वाटले होते. त्यांना कुणालाही ते आवडले नव्हते. ते याबाबतीत जोतीरावांसोबत होते.
धोंडीबा, कोंडीबा, दगडोबा तसा हा "ज्योतिबा" असं विष्णुशास्त्रींचं म्हणणं. विष्णुशास्त्री आपल्या लेखात  "जोतीराव" असं सन्मानदर्शक नाव द्यायला आपला विरोध असल्याचं सुचित करतात आणि म्हणूनच हा संदर्भ लक्षात घेता डॉ. य.दि. फडकेसरांसह आम्ही सर्वजण त्यांना "जोतीराव"च  म्हणतो.
तुम्ही काय म्हणायचा हा सर्वस्वी तुमचा अधिकार आहे.
विष्णुशास्त्री हे फार मोठे विद्वान होते.फर्डे पत्रकार होते. त्यांची निबंधमालेतली कामगिरी खरोखरच अजोड होती. ते वयाच्या 32 व्या वर्षी अकाली गेले.
ते वारले तेव्हा त्यांनी आत्महत्त्या केल्याचा पोलीसांचा आरोप होता, अशावेळी जोतीरावांनी आपले सत्यशोधक मित्र डॉ.  वि. रा. घोले यांच्याकरवी मृत्यूचा दाखला द्यायला लावला आणि त्यांच्या शवाची होणारी विटंबना थांबवली.
विष्णुशास्त्रींना मराठी भाषेचे शिवाजी म्हणायची प्रथा आहे. अर्थात लोकमान्य, महात्मा या जशा लोकांनी दिलेल्या पदव्या आहेत तशी शिवाजी ही लोकांनी दिलेली पदवी नसून त्यांनी स्वत:च आपण मराठी भाषेचे शिवाजी आहोत अशी गर्जना केलेली होती. आणि गंमत म्हणजे मराठीच्या शिवाजीनं ही गर्जना मराठीतून न करता चक्क इंग्रजीतून केलेली होती.
असो.
-प्रा.हरी नरके.

No comments:

Post a Comment