Sunday, April 9, 2017

आणि महात्मा फुले यांची जन्मतारीख सापडली -महात्मा फुले यांची जन्मतारीख माहित नसल्यानं अनेक वर्षे त्यांची फक्त पुण्यतिथी [ 28 नोव्हेंबर ] केली जायची.
1969 साली महात्मा फुले समग्र वाड्मयाच्या प्रस्तावनेत संपादक धनंजय कीर आणि स.गं.मालसे यांनी फुल्यांच्या जन्माची एक आठवण नमूद केलेली होती. शनिवारवाड्याला लागलेली आग या घटनेच्या आधारे त्यांनी फुले यांचा जन्म 20 फेब्रुवारी 1828 ला झाला असावा अशी एक शक्यता नोंदवून ठेवली होती. त्याबाबत मी त्या दोघांशी प्रत्यक्ष भेटून चर्चा केलेली होती.
तथापि फुल्यांच्या सर्वच चरित्रकारांनी फुले जन्मवर्ष 1827 दिलेले असल्यानं ही नोंद सदोष वाटत होती.
माझं "महात्मा फुले यांची बदनामी : एक सत्यशोधन" हे पुस्तक 1989 ला प्रकाशित झालं. त्यातून कमलताई विचारे यांचा माझा परिचय झाला. सत्यशोधक केशवराव विचारे यांच्या त्या सुनबाई. त्यांच्याकडच्या दुर्मिळ कागदपत्रांमध्ये सातत्यानं शोध घेताना 1891 साली सावित्रीबाई फुले यांच्या हस्ते प्रकाशित झालेलं "महात्मा फुले यांचे अमर जीवन" हे चरित्र मिळालं.
कॉ. गोविंद पानसरे यांचे पणजोबा नारायण बाबाजी पानसरे यांनी लिहिलेले हे चरित्र अतिशय मौलिक आणि विश्वासार्ह आहे.
त्यांच्या हस्ताक्षरातील काही पत्रंही मिळाली. 
या चरित्रात पानसरेंनी महात्मा फुले यांची 11 एप्रिल 1827 ही जन्मतारीख दिलेली सापडली.
महात्मा फुले यांच्या जन्माची नेमकी तारीख मिळाली तो क्षण युरेका ! युरेका! चा क्षण होता.
डॅा. य. दि. फडकेसर, डॅा. बाबा आढाव, डॅा. भा. ल. भोळेसर या सार्‍यांशी बोललो. खात्री करून झाल्यावर मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं.
फुले जन्मतारखेबाबत म.टा. आणि इतर वर्तमानपत्रात लेख लिहिले. शासकीय समितीची मान्यतेची सर्व प्रक्रिया पुर्ण करून घेतली.
सर्व शासकीय पुस्तकं आणि दस्तावेजात ही तारीख नोंदवली. मुख्य म्हणजे विधानभवनातील फुले पुतळ्याखालीही ही नोंद करून घेतली.
म. फुले यांची तोवर सर्वत्र झळकलेली रंगीत तैलचित्रं अतिशय बटबटीत होती. गोपीनाथराव पालकर आणि विजय व सरोजा परूळकर यांच्या सहकार्यानं महात्मा फुले यांच्या काचेच्या अस्सल निगेटिव्हवरून त्यांचा अस्सल कृष्णधवल फोटो विकसित करण्यात यश आलं. त्यासाठी अनेकांचं सहकार्य मिळालं. 28 नोव्हेंबर 1992 ला शासनातर्फे या अस्सल कृष्णधवल छायाचित्राचे प्रकाशन करून त्यावर ही तारीख नोंदवली. सदर फोटो मोठा करून फुलेवाड्यात लावला.
सातत्याने गेली 25 वर्षे प्रयत्न केल्यानंतर आता कुठं म.फुले जयंती साजरी होऊ लागलेली आहे.
एखादं चांगलं काम रुजायला किती काळ लोटावा लागतो. खुप पाठपुरावा करावा लागतो. पण सत्य आणि कळकळ असेल तर यश मिळतं.
-प्रा. हरी नरके
महात्मा जोतीराव फुले यांचे अस्सल निगेटिव्हवरून विकसित केलेले कृष्णधवल छायाचित्र.