Wednesday, October 11, 2017

माझी मुलगी - प्रमिती


आज जागतिक कन्यादिनाच्या निमित्ताने सकाळने आयोजित केलेल्या कार्यक्रमात मुली, आई, वडील यांनी उत्स्फुर्त अनुभवकथन केले. अनेकदा उपस्थितांचे डोळे पाणावले. यानिमित्ताने माझी मुलगी प्रमिती हिच्या बालपणापासुनच्या अनेक आठवणी डोळ्यापुढे तरळत होत्या. त्यातल्या या काही-
पालकांना आपल्या मुलांना पुण्यातल्या नामवंत शाळेत प्रवेश कसा मिळवायचा ही फार मोठी चिंता असते. असं म्हणतात की, लग्नाची तारीख ठरवायच्या आधी शाळाप्रवेशाची व्यवस्था करून मगच लग्न केलेलं बरं.
प्रमितीच्या शाळा प्रवेशाचा प्रश्न मात्र तिचा तिनंच लिलया सोडवला. तिला मराठी माध्यमाच्या नामवंत शाळेत घालायचं म्हणून आम्ही ती एक वर्षांची असतानाच पुणे शहरात, कोथरूडला राहायला गेलो. घराजवळच अभिनव विद्यालय ही नामवंत शाळा होती.
एकदा आम्ही तिघे, प्रमिती, तिची आई व मी एका लग्नाला गेलो होतो. सुप्रसिद्ध विचारवंत भालचंद्र फडके यांच्या मुलीचं सईचं लग्न होतं. लग्न लागल्यानंतर जेवायला थोडा वेळ होता. मंगल कार्यालयाच्या शेजारीच अण्णासाहेब उर्फ चिं.स. लाटकर यांचा बंगला होता. ते आम्हाला त्यांच्या घरी चहाला घेऊन गेले. प्रमिती तेव्हा सव्वा दोन वर्षांची होती. अण्णासाहेब तिला आपल्या मांडीवर घेऊन बसले होते. तिला त्यांनी नाव विचारलं. काय करतेस, कोणत्या शाळेत शिकतेस असंही विचारलं. त्यावर ती म्हणाली, मी अजून लहान असल्यानं शाळेत जात नाहीये. पण जून महिन्यापासून शाळेत जाणार आहे. ते म्हणाले, कोणत्या शाळेत जाणारेस? त्यावर ती पटकन म्हणाली, अभिनव विद्यालय. ते म्हणाले, का बरं तीच शाळा का? तर ती म्हणाली, तुम्हाला माहित नाही? ती पुण्यातली बेस्ट शाळा आहे. माझा मित्र अनिरुद्ध त्याच शाळेत जातो. ती शाळा माझ्या घरापासून जवळ आहे. मी ठरवलंय, त्याच शाळेत जायचं.
अण्णासाहेब खुष झाले. म्हणाले, तुला अभिनवमध्ये प्रवेश दिला. तू माझ्या शाळेची ब्रॅंड अ‍ॅंबॅसिडर होणार. तोवर आम्हाला कोणालाच कल्पना नव्हती की त्या शिक्षण संस्थेचे अण्णासाहेब लाटकर हेच अध्यक्ष होते. आम्ही सारे प्रचंड खुष झालो.
पण तरीही एक गंमत झालीच.
मी अधुनमधून अण्णासाहेबांना फोन करून प्रवेशाची आठवण करायचो. प्रवेशफॉर्मची चौकशी करायचो. ते म्हणायचे तू कशाला चिंता करतोस? मी शब्द दिलाय ना. सगळं नीट होईल.
आणि आम्हाला कळलं की येत्या सोमवारी शाळा सुरू होतेय. प्रवेश प्रक्रिया केव्हाच पुर्ण झालीय. मी अण्णासाहेबांना जाऊन भेटलो. ते म्हणाले, अरे येत्या सोमवारी आमची मराठी माध्यमाची शाळा सुरू होणारे. इंग्रजी माध्यमाला अद्याप अवकाश आहे. तुला इंग्रजी माध्यमात मुलीला घालयचंय ना? मी म्हणालो, नाही. तिला मराठी माध्यमात घालयचंय. ते म्हणाले, अरे बाबा तू मराठी साहित्यिक आहेस ना? सगळे मराठी साहित्यिक मराठीवर भाषणं जरूर ठोकतात पण आपल्या मुलांना न चुकता इंग्रजी माध्यमात घालतात.
आता मराठीचे प्रवेश संपलेत. तू तिला इंग्रजी माध्यमातच घाल.
मी मराठीसाठी अडून बसलो.
अण्णासाहेबांनी खुप प्रयत्न केले पण जागाच शिल्लक नव्हती. माझ्या नातीला प्रवेश हवाय. एक जागा कराच असं त्यांनी मुख्याध्यापिकेला सांगितलं.
मी दररोज सकाळी त्यांच्याकडे जाऊन बसायचो. एके दिवशी मुख्याध्यापिकेचा अण्णासाहेबांना फोन आला. एका मुलीच्या पालकांची बदली कलकत्त्याला झाल्यानं ते प्रवेश रद्द करायला आलेत. तुमच्या नातीला पाठवा.
मी 240 च्या स्पीडनं प्रमितीला घेऊन शाळेत पोचलो.
लगेच तिची प्रवेशपरीक्षा घेण्यात आली. त्यांनी विचारलेल्या पहिल्याच प्रश्नावर ती म्हणाली, तुम्हाला थोडक्यात उत्तर हवंय की सविस्तर?
त्या म्हणल्या आधी थोडक्यात सांग नी बरोबर आलं तर मग सविस्तर सांग.
सगळीच धमाल....
आणि प्रमितीला अभिनव मराठी माध्यमामध्ये बालवर्गात प्रवेश मिळाला....

* ती दीड वर्षांची असताना फादर दिब्रिटो आमच्या घरी आले होते. त्यांनी तिला उचलून कडेवर घेतलं आणि तुझं नाव काय? असं विचारलं. तिनं नाव सांगितलं आणि ती त्यांच्या चेहर्‍याकडं बघू लागली. ते म्हणाले, काय झालं? बाळ, माझं काही चुकलं का?
ती म्हणाली, तुमच्यात दुसर्‍यांना नाव विचारायची पद्धत असते मग स्वत:चं नाव सांगायची पद्धत का नसते? मी एक बघितलंय, मोठी माणसं दरवेळी बाळ तुझं नाव काय हाच प्रश्न का विचारतात? त्यांना बाकीचं काहीच का विचारता येत नाही?
ते चमकले. म्हणाले, माझं नाव दिब्रिटो. यापुढे मी लहान मुलाला पहिला प्रश्न तुझं नाव काय असा कधीही विचारणार नाही.
ती म्हणाली, या नावाचा अर्थ काय?...
असे तिचे प्रश्न संपतच नसत.
* ती लहान असताना निळू फुले, डॉ. श्रीराम लागू, गोविंद नामदेव, सुषमा देशपांडे, सदाशिव अमरापूरकर, डॉ. जब्बार पटेल, अतुल पेठे असे अनेक ख्यातनाम अभिनेते, अभिनेत्री, दिग्दर्शक आमच्या घरी येत असत. आम्ही त्यांच्या घरी जात असू. यातनंच बहुधा अभिनेत्री व्हायचं बीज तिच्यात रूजलं असावं.
विद्यापीठाच्या नाट्यशास्त्राच्या प्रवेश परीक्षेत आणि पदवी परीक्षेत ती पहिली आली.
ललित कलाच्या विभागप्रमुख डॉ. शुभांगी बहुलीकरमॅडम मला नेहमी म्हणायच्या, "सर, तुमची मुलगी उद्याची स्मिता पाटील आहे बघा."
"तू माझा सांगाती" ही मालिका तिच्या व्यक्तीगत प्रयत्नांनी तिनं मिळवली. अल्पावधीत अनेक जाणकारांची पसंती तिच्या अभिनयाला मिळाली.
* मी सार्वजनिक जीवनात गेली 35-40 वर्षे कार्यरत आहे. सतत दौरे करूनही वेळेअभावी अनेकांची निमंत्रणं मला स्विकारता येत नाहीत. एक कार्यकर्ता सलग तीनचार वर्षे फोन करायचा. पत्र लिहायचा. पण मला त्याच्या कार्यक्रमाला जाणं जमलं नव्हतं. यावर्षी त्याचा फोन आला तेव्हा मी संकोचून त्याला म्हटलं, काळजी करू नको, यावर्षी मी तुला नक्की वेळ देतो. सांग कुठली तारीख हवी?
त्यावर तो म्हणाला, त्याचं कायय नरकेसर, यावर्षी तुमची तारीख नकोय. तुमच्या मार्फत आम्हाला प्रमितीताईंची तारीख हवीय. तुम्ही तेव्हढं जमवून द्याच.
* जवळचे मित्र मला गंमतीनं म्हणतात, आता यापुढे प्रमितीचे बाबा म्हणून तुला तुझी ओळख सांगावी लागेल. तयारी ठेव बाबा. त्यांना काय माहित अशा गुणी आणि बुद्धीमान पण चोखंदळ मुलीचा बाप असणं किती भाग्याचं असतं ते!
- प्रा. हरी नरके

No comments:

Post a Comment