Friday, October 13, 2017

दिवाळी-


दिवाळीत भाताचं पिक भरात आलेलं असायचं. पाखरं तुटुन पडायची साळीवर. मालक फार खडूस होते. थोडा जरी उशीर झाला तरी दिवसाचा पगार कापायचे. त्यामुळं आई पहाटे लवकरच उठून उजाडायच्या आत राखणीला जायची. आम्ही भावंडं सकाळी उठलो की तिथं शेतावर जायचो. मोठा भाऊ पाखरं हाकलायचा गोफणीनं. आई बांधावर तीन दगडांची चूल मांडून पाणी तापवायची. दिवाळी म्हणजे मजा. अगदी चैन. आई स्वत: वर्षातले ते चारपाच दिवस आम्हाला शेताच्या बांधावर लाईफबॉय साबण लावून आंघोळ घालायची. घरात वर्षातून एकदाच लाईफबॉय साबण यायचा तो दिवाळीत.एरवी वर्षभर नदीत नाहीतर विहीरीवर आपली आपण आंघोळ करायची. साबण ना कपड्याला असायचा ना आंघोळीला. कपडे फारच मळले तर रिठ्यानं धुवायचे. शेताच्या बांधावर रिठ्याची झाडं असायची.
कथा कादंबर्‍यांत वाचायचो दिवाळीत उटणं, सुगंधी तेलं, मोती साबण असलं बरंच कायकाय भारी असायचं म्हणे लोकांकडे. फराळ हा शब्दही फक्त पुस्तकात वाचलेला. आमच्याकडं दिवाळी म्हणजे दोनचार दिवस चहासोबत शंकरपाळी. वर्षभर बिन दुधाचा कोरा चहा असायचा गुळाचा. दिवाळीत मात्र दुधाचा चहा मिळायचा. दोनचार वर्षातून कधीतरी आई करंज्याही करायची दिवाळीला. मोतीचुराचे लाडू मात्र आठ दहा वर्षात एकदाच केलेले आठवतात. लाडू चिवडा वगैरे लाड आपल्या गरिबाकरता नसतात असं आई सांगायची. ती सगळी पैसेवाल्यांची  थेरं असं ती म्हणायची. मी ज्या कबरस्थानात काम करायचो तिथं जर दिवाळीत अचानक एखादं प्रेत आलं तर मात्र खड्डा खोदायच्या मजुरीचे दोनतीन रूपये मिळायचे. मग आई त्याचा रवा विकत आणायची आणि रव्याचे लाडू करायची.
तुळशीचं लग्न झालं की संपली दिवाळी. मी खुप लहान असताना तुळशीच्या लग्नाच्या दिवशीच माझे वडील गेले. त्याआधी बरेच महिने ते आजारी होते. पण खाजगी दवाखाण्यात नेण्याजोगी आमची आर्थिक परिस्थिती नव्हती. आणि ससूणला नेलं की तिथले डॉक्टर औषधाचा डोस देऊन मारून टाकतात अशी आईला कुणीतरी भिती घातलेली होती. त्यामुळं औषधपाण्याविनाच ते गेले.
आमच्या झोपडपट्टीतल्या पत्र्याच्या खोलीत हातानं बनवलेला आकाशकंदील मात्र दरवर्षी नवा असायचा. तो बनवण्यात दोनतीन आठवडे सहज जायचे. रंगीत कागद विकत आणून बनवलेले ते आकाशकंदील वर्षवर्ष जपून ठेवायचो. त्यात संध्याकाळी पणती लावली की इतकं भारी दिसायचं. मातीचा किल्ला आणि त्यावरचे शिपाईसुद्धा हातानं बनवायचो. किल्ले फार जोरदार बनवायचो. एकदम हुबेहुब.
अंगणात 5 पणत्या लावल्या की रोषणाईच रोषणाई.

कधी गावी गेलो की माझी चुलती म्हणायची, चल रे हरी चहाला घरी. साखरेचा करते बाबा चहा तुला.
आमची शहरात खुप मजा असते असंही ती चुलतभावांना सांगायची. आरं, यांना काय बाबा, रोज रोज वराणभात मिळतो. महिन्या दोनमहिन्याला तेलच्याबी असत्यात. यांची लईच मज्या अस्तेय बाबा शेरात. मी म्हणायचो, नाही काकू. आमच्याकडं पण मिलो अस्तोय. हुलग्याच्या घुगर्‍या, शेंगोळी आणि हुलग्याच्याच भाकरी असतात. माडगंही असतंय. सकाळ,दुपार, संध्याकाळ तिन्हीत्रिकाळ हुलगे! ती म्हणायची, हे बघ, 2 वेळचं पोटाला मिळतंय ना? मंग बास झालं.

फटाके मला कधीच आवडले नाहीत. 2 वेळचं खायला मिळतंय हीच सगळ्यात मोठी चैन होती.
फटाके उडवणं म्हणजे पैशांचा धूर करणं. एक राजा नोटा जाळून त्यावर चहा करायचा म्हणे. फटाके वाजवणं हा मला तसलाच वेडपटपणा वाटायचा.
आयुष्यात एकदाही मला फटाका वाजवावासा वाटला नाही. कधी मित्रांनी आग्रह केला तरी मी फटाक्यांना हातही लावत नाही. उलट तो घाणेरडा आवाज ऎकला की माझं डोकं उठतं. होय, मला फटाक्यांचा तिरस्कार वाटतो. फटाक्यांच्या कारखान्यात लहानचिटुकली मुलं काम करतात. मध्यंतरी कारखाण्याला आग लागून शंभरेक बालकामगार मुलं जळून मेली. तरी लोकांना फटाके हवेतच.
फटाक्यांच्या त्या आवाजामुळं दिवाळीला आजकाल शहरात राहावसंच वाटत नाही. दूर कुठंतरी जंगलात किंवा खेड्यापाड्यात निघून जावं. एकाही दिवाळीला पुण्यात थांबायचं नाही असा मी नियमच केलेला.
पण आजकाल खेड्यातसुद्धा फटाक्यांची ती घाण पोचलीय.

मला अलिकडं दिवाळी हा सणच वाटत नाही.
ते एक भयंकर संकट वाटतं. त्या आवाजानं डोकं सटकतं.
काही लोक दागिने मोडून खातात तसे काही लोक गरीबी मोडून खातात.
त्यामुळेच मला लहाणपणचे हे अनुभव लिहावेसे वाटत नाहीत.
-प्रा. हरी नरके 

No comments:

Post a Comment