Saturday, October 14, 2017

मित्राचे वडील- बाळासाहेब

माझं प्राथमिक शिक्षण पुणे महानगर पालिकेच्या मुंढव्याच्या शाळेत झालं. शाळेच्या शेजारी सेटलमेंट कॅंप आहे. ब्रिटीशांनी सतत गुन्हे करणार्‍या जातींना या सेटलमेंट कॅंपमध्ये बंदिस्त केलं होतं. तिथं त्यांच्यावर दररोज पोलीसांकडं हजेरी देण्याची सक्ती केलेली होती. अशाच एका सेटलमेंट कॅंपच्या संचालक म्हणून सुप्रसिद्ध लेखिका मालतीताई बेडेकर यांनी काम केलेलं होतं. त्या अनुभवावर आधारित कादंबरी त्यांनी 1950 साली लिहिली. "बळी". ती मराठीतली एक अतिशय महत्वाची कादंबरी आहे.
माझ्या शाळेला लागून हा कॅंप असल्यानं यातलीच 70-80 टक्के मुलं माझ्या वर्गात होती. पिढ्यानपिढ्या खिसे कापणं, दारू गाळणं, समोरच्याशी कमालीचं गोड बोलून त्याला हातोहात फसवणं यात ही मंडळी पटाईत असतात. गुन्हेगारीशास्त्रातले जणू पीएच.डी. झालेले तज्ञच.
त्याकाळात पीएमटी बसस्टॉपवर यांच्यापासून सावध राहा अशा सदरात खिसेकापूंचे फोटो लावलेले असायचे. एकदा बस यायला वेळ होता. सहज चाळा म्हणून मी ती नावं वाचत होतो. तर त्यात माझ्याशेजारी बसणार्‍या एका मुलाच्या आईवडीलांचे फोटो बघितले आणि मी हादरलोच.
माझी आई सांगायची, माणसानं एकवेळ उपाशी राहावं पण चोरी करू नये. कसल्याही कामाची लाज वाटू देऊ नये. त्यात कमीपणा नाही. कष्टाचं, मेहनतीचं कमवून खावं. कामानं माणूस मरत नसतो. मात्र चोरीत आणि लबाडीत इज्जत नाही. माणसानं जगायचं तर इज्जतअब्रूनं जगावं."
त्यामुळेच वयाच्या पाचव्या वर्षापासून मी कबरस्थानात बागकाम आणि साफसफाईचं काम करायचो.
तर मी ते फोटो बघून ठरवलं, उद्यापासून त्याला आपल्याशेजारी बसू द्यायचं नाही.
दुसर्‍या दिवशी तो आला नी नेहमीप्रमाणं माझ्याशेजारी बसला. मी त्याला त्याच्या आईवडीलांचे खिसेकापू म्हणून फोटो बघितल्याचं सांगितलं. त्यावर तो फुशारकीनं म्हणाला, तू नीट बघितलं नाहीस. त्यात माझ्या दोन भावांचे आणि तीन बहिणींचेसुद्धा फोटो आहेत. हे तो मला अशा पद्धतीनं सांगत होता की जणू त्याच्या भावाबहिणींनी ऑलिंपिकमध्ये गोल्डमेडल्स मिळवल्याबद्दल त्यांचे फोटो छापलेले होते. सहा महिन्यांपुर्वी मी त्याच्या घरी गेलो होतो तेव्हा मला त्याच्या आईवडीलांकडे बघून ते अट्टल खिसेकापू असतील अशी शंकासुद्धा आली नव्हती.
दरम्यान भटक्याविमुक्तांच्या नेत्यांचं लेखन वाचनात आलं. अनिल अवचटांचं माणसं वाचलं. कोणीही माणूस जन्मानं गुन्हेगार नसतो, परिस्थिती त्याला गुन्हेगार बनवते.प्रत्येक माणसाला सुधारण्याची संधी दिलीच पाहिजे या विचारांनी खुप प्रभावीत झालो.
पुढे मीही या चळवळीशी जोडला गेलो. अनेक आंदोलनं, मोर्चे, यात्रा, परिषदा यांच्या आयोजनात पुढाकार घेतला. नेत्यांची पुस्तकं प्रसिद्ध केली. त्यांना समाज मान्यता मिळावी, पुरस्कार मिळावेत म्हणून त्यांची वकीलीही केली. पण हे फार पुढचं झालं.

त्या वर्गमित्राच्या वाढदिवसाला त्यानं वर्गातल्या आम्हा सर्वांना घरी बोलावलेलं. मी येत नाही, म्हणून त्यानं खुप आग्रहही केलेला. एकदा बघू तर खरं खिसेकापू कसे दिसतात म्हणून शेवटचं एकदा जावं म्हणून मी त्याच्या घरी गेलो. त्याचे वडील बाळासाहेब आमच्याशी खुप चांगलं वागले. आम्हाला सगळ्यांना त्यांनी बटाटेवडे खायला दिले. सरबत दिलं. एकुण डिट्टो भलीच माणसं म्हणायची!
मी थोडी भीड चेपल्यावर त्यांना विचारलं, ते असला घाणेरडा धंदा कशाला करतात? ते म्हणाले, हे बघ, मला पाच मुली, तीन मुलं. एव्हढं मोठं घर चालवायचं तर दुसरा कोणता धंदा करणार? आजकाल चांगल्या नोकर्‍या तरी कुठं मिळतात? तसा मी सरकारी नोकरीत होतो. पण लई पिट्ट्या पडायचा. लईच काम करावं लागायचं. मरायचा ना माणूस असल्या कष्टांनी. म्हणून सोडली नोकरी.
आता आम्हाला ना रानात शेत आहे ना गावात घर आहे. चोर्‍या करणं चांगलं नाही. पण त्याच्याशिवाय दुसरा शॉर्टकट तरी कुठंय? आता हे एक वाडवडीलांच्या कृपेनं मिळालेलं सरकारी घर आहे म्हणा. पण आता मुलींची लग्नं करायची तर खर्चाची सोय करायला नको? तसंही आमच्यात कोणीही सराईत खिसेकापू असल्याशिवाय मुलगा किंवा मुलगी देतच नाहीत. प्रॅक्टीकलच करून दाखवावं लागतं ना."
ते बोलण्यात अतिशय लाघवी आणि चतुर. दिसायचे अगदी डिट्टो ऋषीमुनीच. मी त्यांच्या शिक्षणाची चौकशी केली तर ते पदवीधर होते. त्यांना उत्तम अभिनय येत असणार. समोरच्या माणसावर एकदम छाप पाडायचे. "लहानपणी म्हणले, वडीलांबरोबर घरोघर ज्योतिष सांगायला जायचो. अंगणात वाळत घातलेले कपडे, राहणीमान, भाषा यावरून हेरायचं आणि अंदाजानं बोलत राहायचं. एकदोन बाण तरी नेमके लागतातच. लई मजबुती कमाई. बोलबच्चनगिरीचं ट्रेनिंग मात्र पाह्यजे. बेस्ट धंदा. पण लई फिराया लागायचं. पाय मोडून जायचं काम."

अलिकडेच एका कार्यक्रमात 40 वर्षांनी तो मित्र भेटला. म्हणाला, वडीलांची नुक्तीच पंच्याहत्तरी झाली. त्यांनी एव्हढ्यांचे खिसे कापले पण कोणालाही डाऊट नाय. मी मात्र आपला एस.टी.त कंडक्टर आहे. माझं त्यांच्याशी पटत नाय. बाकी माझे भाऊ बहिणी आईवडीलांचाच वारसा चालवतात.
आता मी सेटलमेंट कॅंपमध्ये राहत नाही. केशवनगरला राहतो. मला दोन मुलं आहेत. ये एकदा घरी.
पुढं बोलताना म्हणाला, " पुढं मग वडलांना आमच्यातलेच एक समाजसेवक भेटले. ते म्हणले, एव्हढं कष्ट करूने माण्सानं. शहरातल्या लोकांनी लै पाप केल्यालं अस्तंय. त्यांनी तरी कुठं इमानदारीनं कमावलेलं अस्तंय? त्यांचं मन त्यांना खात अस्तंय. आपून माण्साचा बारीक आभ्यास करायचा. गोड बोलून आज्जाद गळा कापायचा. त्यांच्या चांगुलपणाचा फायदा घ्यायची टॅक्ट मातर जमायला पाह्यजे. त्ये एरागबाळाचं कामच नाय. आता रिस्क कोणत्या धंद्यात नसते? आपून त्यांना पुण्य करायचा चान्स द्यायचा. एकदम गोरगरीब असल्याचं मस्त नाटाक करायचं. गरीब माणूस म्हणलं, की शिकल्याली माण्सं लई हालत्यात. आपुण फाट्का शर्टच घालून जायचं. समाजसेवक असल्याची मजबूत बतावणी करायची. मायंदाळ कमाई होतीया. बख्खळ पुरस्कारबी मिळत्यात. मंग, पोलीसांची काय टाप हाय हात लावायची? सोंग मातर आज्जाद जमलं पाह्यजे."
त्यांनी माझ्या धाकट्या बहिणीला वकीलच केलंय. ती त्यांच्याच धंद्यातली एक्सपर्ट हाये. अगदी लेडी डॉनच! नेहमी पेपरात नाव अस्तंय त्या बापलेकीचं."
तो पुढं असंही म्हणाला, " त्यांचं ते ज्ञान माझ्या उपयोगाचं नव्हतं. त्यांचा रस्ता वेगळा. माझा रस्ता वेगळा. मी पुन्हा त्या घरी गेलो नाही."
मला आठवलं, पिंपरी चिंचवडच्या महापौर पदावर याच समाजातले एक सद्गृहस्थ निवडले गेले होते. आता या मागास समाजाला न्याय मिळेल अशी आशा निर्माण झाली होती. एकदा त्यांच्या घरी त्यांना भेटायला एका पत्रकारमित्रासोबत गेलो असताना घरातून कुजलेल्या गुळाचा आणि नवसागराचा वास येत असल्याचा भास झाला. त्यांच्या चहालाही कसलातरी वास येत होता. जरा नीट बघितल्यावर लक्षात आलं की महापौर महोदयांच्या स्वयंपाकघरात मोठी हातभट्टी लावलेली होती.
मी त्यांना म्हटलं, अहो महापौर, आता तरी हे बंद करा. तुमच्या पदाला शोभत नाही. तर ते अभिमानानं म्हणाले, मी उद्या पंतप्रधान जरी झालो ना तरी बापजाद्यांचा दारू गाळण्याचा धंदा आपण सोडणार नाही. पदावर असल्यामुळं पोलीसांची रेड पडू शकत नाही.
माझे मित्र सुरेश खोपडेसाहेब पुणे जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक असताना त्यांनी या दारू गाळणार्‍या मंडळींनी हा धंदा सोडावा नी पर्यायी दुसरं सन्मानजनक काम करून जगावं असा प्रकल्प हाती घेतला. त्याला दारूण अपयश आलं, कारण हातभट्टीच्या,खिसे कापण्याच्या, या धंद्यात कष्ट कमी, कमाई मजबूत.
"साह्येब, मानसन्मान काय चुलीत घालायचाय का? आपल्याला कष्टबिष्ट सांगू नका. मेहनतीचं काम आपल्या शंभर पिढ्यांनी केलं नाही. भिक मागणं, खिसे कापणं, चोर्‍या करणं, दरोडे घालणं यात आपण मास्टर हावोत. आपल्याला कामधंदा जमणार नाही. दिवसभर घाम गाळून कमाई जेव्हढी होते तेव्हढी तर आमचं लहान मुलसुद्धा पंधरा मिन्टात कमावतं. पैसे कमावण्याचा शॉर्टकट हाताशी असताना असली मेहनतीची अवदसा हवी कशाला?" असं काही लोक त्यांना डायरेक्ट विचारायचे.
मुंढव्याच्या शाळेतले एक शिक्षक गेल्या वर्षी सांगत होते, नरकेसर, काही म्हणा, आपण तर हात जोडले बाबा. कितीही प्रयत्न करा. तळमळीनं सांगा. एखाददुसरा अपवाद वगळता या लोकांचं येरे माझ्या मागल्याच चालूय. कुणाला ओळख सांगताना मी मुंढव्याचा आहे म्हटलं की, बसमधला शेजारचा तो माणूस आधी सरकून, जपून बसतो. आपलं पाकीट आधी तपासतो. सतत त्याचं लक्ष त्याच्या पाकीटावर असतं. अगदी लहानलहान मुलंसुद्धा किती सराईत खिसेकापू असावीत?"
ते म्हणाले, "एक अधिकारी तक्रार घेऊन आले. म्हणाले, तुमच्या शाळेतल्या मुलानं माझं पाकीट हातोहात मारलं."
विचारा कसं काय?
" मी माझ्या मोटरसायकलवरून चाललो होतो. रस्त्यात एक लहान शाळकरी मुलगा लिफ्ट मागत होता. खुप उन होतं. बसचा पत्ता नव्हता. मी माणुसकी दाखवायला गेलो. त्याला मागं बसवलं. शाळेजवळ आल्यावर तो उतरला. पुढं एका हॉटेलात मी चहा प्यायला गेलो. पैसे द्यायला पाकीट बघितलं तर पाकीट गुल झालेलं. आजच माझा पगार झाला होता हो."
शिक्षक म्हणाले, त्याला मी वर्गांवरून फिरवलं. त्या भल्या माणसानं त्या मुलाला एका वर्गात बसलेलं बरोबर ओळखलं. चेक केलं तर त्या पाचवीच्या मुलाच्या दप्तरात ते पैशांनी भरलेलं पाकीट सापडलं. आता बोला."
"त्याच्या पालकांना बोलावून समज दिली तर ते पालक उलटं म्हणाले, " पण त्यानं याला लिफ्ट दिलीच कशाला? पहिलं कळायला नको?"
-प्रा.हरी नरके

No comments:

Post a Comment